ज्या ठिकाणी विद्यालये आहेत अशा शैक्षणिक परिसराला अमलीपदार्थमुक्त विभाग ठरवण्यासंबंधी शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकासंबंधी चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम कुणी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. अमलीपदार्थमुक्त विभागासंबंधीचे हे परिपत्रक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या तसेच राष्ट्रीय अमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित आहे व त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ती जागृती घडवून आणणे हा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. अमलीपदार्थांचा धोका रोखण्यासाठी सरकार शिक्षण संस्था, पालक व समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांना अमलीपदार्थांच्या व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोव्यात अमलीपदार्थांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याचे चित्र निर्माण करून राज्याची प्रतिमा मलिन करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
अमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्याचा अमलीपदार्थविरोधी विभाग सक्षमपणे काम करीत असून, कित्येक जणांना पकडले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. शाळा परिसरात अथवा शाळेच्या आवारात अमलीपदार्थांसंबंधीच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास कारवाई व प्रतिबंधक उपाययोजना करता यावी, यासाठी वरील परिपत्रक काढण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

