मंदार सुर्लकर अपहरण आणि खून प्रकरण
हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सरकारची धाव
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या मंदार सुर्लकर अपहरण आणि खून प्रकरणातील तीन दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या आदेशाला राज्य सरकारने काल सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
मंदार सुर्लकर याचे 2006 मध्ये अपहरण करून नंतर त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील शिक्षा भोगत असलेल्या रायन पिंटो, रोहन धुंगट, शंकर तिवारी या तिघांची मुदतपूर्व सुटका करण्याचा आदेश 6 ऑगस्ट रोजी गोवा खंडपीठाने दिला होता. गोवा सरकारने या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मंदार सुर्लकर खून प्रकरणातील दोषींच्या मुदतपूर्व सुटका करण्याच्या आदेशाला आवाहन देणारी ‘विशेष याचिका’ सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली.
6 ऑगस्टच्या आदेशानुसार होणारी दोषींची सुटका ही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल आणि त्याबाबतच्या आदेशांच्या अधीन असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
रायन पिंटोची सुटका
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या 6 ऑगस्टच्या आदेशानुसार, मंदार सुर्लकर खून प्रकरणातील दोषी रायन पिंटो यांची कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका काल करण्यात आली. या प्रकरणातील दोन दोषी रोहन धुंगट आणि शंकर तिवारी हे सध्या पॅरोलवर बाहेर आहेत. त्या दोघांना कारागृह प्रशासनासमोर हजर राहण्यास आणि त्यांच्या अधिकृत सुटकेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या दोघांची मंगळवारी अधिकृतपणे सुटका केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाला देण्यात
आली.

