‘त्या’ छप्पराची दुरुस्ती नाहीच : महापौर

0
75
पणजी महापालिका बाजार प्रकल्पातील दुकानदार महापालिकेला भाड्यापोटी एक पैसाही देत नसून त्यामुळे इमारतीचे गळती लागलेले छप्पर एक कोटी रु. खर्चून दुरुस्त करणे महापालिकेला शक्य नसल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यानी काल सांगितले.

 पणजी महापालिका बाजार प्रकल्पाचे गळती लागलेले छप्पर महापालिका दुरुस्त करणार आहे काय, असे पत्रकारांनी विचारले तेव्हा मुळीच नाही असे फुर्तादो म्हणाले. ते दुरुस्त करण्यासाठी एक कोटी रु. एवढा खर्च असून तेवढा पैसा नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पातील बेकायदेशीर गाळेवाले महापालिकेला भाड्यापोटी एकही पैसा देत नाहीत. गेली सुमारे १०-१२ वर्षे या लोकांनी भाडेपट्टी भरलेली नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने कसे व का म्हणून या प्रकल्पाचे छप्पर दुरुस्त करावे, असा सवाल फुर्तादो यांनी पत्रकारांना केला. जोपर्यंत या मार्केट प्रकल्पातील बेकायदेशीर गोष्टींचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत महापालिकेच्या तिसर्‍या टप्प्यातील मार्केट प्रकल्पाचे काम हाती घेतले जाऊ नये, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.