पणजी महापालिका बाजार संकुलातील बेकायदेशीर दुकानांसंबंधी महापालिका आयुक्तांनी चौकशी करून जो अहवाल सादर केला होता त्या अहवालाची एक प्रत आपणाला द्यावी, अशी मागणी या प्रकरणी चौकशी करणारे दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायदंडाधिकारी एन. डी. अगरवाल यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांनी या बाजार संकुलातील बेकायदेशीर दुकानांसंबंधी चौकशी केली होती व संकुलातील ९५ टक्के दुकाने ही बेकायदेशीर आहेत असे त्यांना चौकशीत आढळून आले होते. ही बाब आपण या प्रकरणाची चौकशी करताना आपल्या नजरेस आणून देण्यात आली नव्हती असे स्पष्ट करून निदान आता तरी आपणाला या अहवालाची एक प्रत द्यावी. म्हणजे आपणाला चौकशी पूर्ण करण्यास त्याची मदत होऊ शकेल, असे अगरवाल यांनी पत्रातून नमूद केले आहे. ही दुकाने आता ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनाच देऊन ती कायदेशीर करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला असल्याचे आपणाला कळलेले असून तसे असेल तर त्याचीही एक प्रत आपणाला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अगरवाल यांनी पत्रातून केली आहे.