भारतामध्ये कोट्यवधींची आर्थिक अफरातफर करून ब्रिटनमध्ये वर्षानुवर्षे सुखाने मौजमजा करीत आलेला ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा एक व्हिडिओ नुकताच बाहेर आला. ‘आम्ही भारताचे सर्वांत मोठे फरारी गुन्हेगार आहोत’ असे हा मोदी त्यात मोठ्या ताठ्याने सांगतो आहे. जणू भारत सरकारची आणि भारतीयांची जाहीर खिल्लीच जणू तो त्यातून उडवतो आहे. हा ललित मोदी देश सोडून ब्रिटनमध्ये पळाला 2010 साली. आता त्याला पंधरा वर्षे झाली तरी भारत सरकार त्याचा केसही वाकडा करू शकलेले नाही. दुसरा विजय मल्ल्या. तो भारतातून पळाला अगदी विद्यमान नरेंद्र मोदी सरकारच्या नाकावर टिच्चून 2016 साली. नीरव मोदी हा देखील मोदी सरकारच्याच कारकिर्दीत पळाला 2018 साली. तेव्हापासून हे सगळे फरारी गुन्हेगार ब्रिटनमध्ये ऐषारामात राहून भारताला वाकुल्या दाखवत राहिले होते. सुदैवाने नीरव मोदीचा ठावठिकाणा एका पत्रकाराला लागला आणि त्याला शेवटी गजाआड व्हावे लागले. परंतु त्याचे भारताकडे प्रत्यार्पण अजूनही रखडले आहे. विजय मल्ल्या ब्रिटनमध्ये गेला तेव्हा आपण फरारी नसून भारतात परतणार आहोत असे त्याने जाहीर केले होते. परंतु न्यायालयाने वारंवार समन्स जारी करूनही तो परतलेला नाही. नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने त्याला तंबी दिली की तो प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर झाल्याखेरीज त्याच्या अर्जावर विचार होणार नाही. हे प्रकरण कोणते, तर मल्ल्याने भारत सरकारच्या 2018 च्या आर्थिक गुन्हेगार कायद्यालाच न्यायालयात आव्हान दिलेले आहे. म्हणजे हे महाशय स्वतः विदेशात सुखाने राहणार, तेथून भारतीय न्यायालयात येथील कायद्याला आव्हान देणार आणि परदेशात ऐषाराम करीत आपल्या वाढदिवसाच्या पार्ट्या देत देशाला वाकुल्या दाखवणार! खरे तर त्याच्याविरुद्ध ब्रिटनच्या न्यायालयात भारत सरकारने दाखल केलेल्या प्रत्यार्पणाच्या अर्जावरील त्याची सर्व अपिले न्यायालयांनी 2020 मध्येच निकालात काढली आहेत. परंतु आता त्याने एका गोपनीय कायदेशीर प्रकरणाचे निमित्त करून आपले प्रत्यार्पण रोखण्यात यश मिळवलेले आहे. तेथे सध्या मल्ल्या राजकीय शरण मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या आहेत. नीरव मोदी त्याचे सर्व जामीन अर्ज फेटाळले गेल्याने तेथील तुरुंगात आहे खरा, परंतु त्याचेही अंतिम अपील तीन वर्षांपूर्वीच संपले आहे. आता तो ‘नवे पुरावे’ देऊन पुन्हा नव्याने आपले प्रकरण खोलू पाहतो आहे. त्यावरची सुनावणी पुढील वर्षी मार्चमध्ये होणार आहे. तिसरा ललित मोदी. करबुडवेगिरीपासून आर्थिक हेराफेरीचे आरोप असलेल्या ललितने वानुटू नामक देशाचे नागरिकत्व पटकावले आहे. शिवाय आपल्याला न्यायालयाने दोषी धरलेले नाही असा त्याचा युक्तिवाद आहे. त्यामुळे गेली पंधरा वर्षे तो भारताला वाकुल्या दाखवत छानछोकीत राहतो आहे. ताज्या व्हिडिओतून तर त्याने भारत सरकारलाच आव्हान दिलेले आहे. एखादे छोटे कर्ज बुडाले तर गरीबाच्या घरादारावर जप्ती येते आणि येथे हे दीडशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या ललितपासून बाराहजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरवपर्यंतचे गुन्हेगार विदेशात सुखाने राहू शकतात ते कशाच्या जोरावर? ब्रिटनमधील कायदे गुंतागुंतीचे आहेत, तेथे मानवाधिकारांना फार महत्त्व दिले जाते, भारतातील तुरुंगातील दुःस्थिती हे निमित्त पुढे केले जाते वगैरे खरे असले, तरी सार्वभौम भारत सरकार ही जाहीर टवाळी बघत स्वस्थ बसणार काय? भारत सरकारने ब्रिटनमध्ये सुखाने राहणाऱ्या ह्या आर्थिक गुन्हेगारांना अगदी युद्धपातळीवर भारतात आणण्यासाठी आणि न्यायदेवतेपुढे उभे करून त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावावी. त्यासाठी प्रत्यार्पणासंदर्भातील जटील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी विदेश मंत्रालयांतर्गत विशेष कृती दल स्थापावे. ब्रिटन सरकारशी प्रत्यार्पण करार तर कधीपासून आहे, परंतु तरीही प्रत्यार्पणात जे तांत्रिक अडथळे आणले जात आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या सरकारवर राजनैतिक दबाव उत्पन्न करण्यास सरकार का कचरते आहे? तिथे तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान होऊन गेले. तरीही हे गुन्हेगार काही आपण भारतात आणू शकलो नाही. ते सुखाने राहत आहेत, पार्ट्या करीत आहेत आणि आता तर व्हिडिओद्वारे वाकुल्या दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे ह्या ललितचे लालित्य, मल्ल्याची मुक्ताफळे आणि नीरवची नाटके आता खूप झाली. ह्यांना लवकरात लवकर परत आणा. त्यासाठी आकाशपाताळ एक करा, पण जो न्याय इथल्या गोरगरीबांना लावला जातो तोच ह्या कोट्यवधींच्या लुटारूंना लागू आहे हे सिद्ध करा. नुसत्या घोषणा आता पुरे झाल्या. जनता ह्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार ह्याची वाट पाहते आहे.

