गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विकास देयेकर याच्याविरोधात एका अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात काही दिवसांपूर्वी गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला सेवेतून निलंबितही करण्यात आले होते; मात्र, अद्याप त्या पोलीस निरीक्षकाला अटक का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे पोलीस तपासाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्या पोलीस निरीक्षकाला अटक केली जात नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी त्या पोलीस निरीक्षकांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तथापि, त्या पोलीस निरीक्षकाला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टिन्स यांनी तपासातील विलंबाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देयेकर याला त्वरित अटक करून कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप यांनी देखील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकास देयेकरला अटक न झाल्यास आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

