तोतया पोलीस बनून आठ लाख लंपास

0
18

पर्वरी महामार्गावरील हुंदाई शोरूमसमोर पोलीस असल्याचे भासवून पीकअप चालकाकडून सुमारे आठ लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला असून पर्वरी पोलीस संशयित आरोपींच्या मागावर आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी दि. 12 रोजी सकाळी 8.30 वाजता पर्वरीहून म्हापसामार्गे महाराष्ट्रात जाताना महामार्गावरील हुंदाई शोरूमसमोर पीकअप चालक (केए 28 एए 1045) आणि त्याचा साथीदार यांना अडवून 35 ते 40 वयोगटातील चार अज्ञात संशयितांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले.

त्यांनी पीकअपची तपासणी करण्याचा बहाणा केला. त्यावेळी त्यांनी पीकअपमधील काळ्या बॅगेतील सुमारे आठ लाख रुपये एवढी रक्कम लंपास केली व चोरट्यांनी घटनास्थळावरून मोटारसायकलने पोबारा केला. पीकअप चालक सुनील सुब्राव कांबळे (सोलापूर, महाराष्ट्र) याने पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पर्वरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.