पेट्रोलियम मंत्री मोईलींचा दावा
भारताच्या पेट्रोलियम मंत्र्यांना तेल आयातदारांच्या लॉबींकडून धमकावण्यात येते असे सांगून, नैसर्गिक गॅसच्या किमतीत मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव दिल्याबद्दल रोषाला सामोरे जावे लागत असलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी सर्वांना धक्का दिला. तेल आयातीचे १६० यूएसडी अब्ज डॉलर्स बील कमी होऊ नये म्हणून या धमक्या येत असल्याचे ते म्हणाले.
मोईली यांनी सांगितले की, देशात तेलसाठ्यांचा शोध घेतला जाऊ नये व आयातच चालू राहावी यासाठी प्रयत्न होतात. नोकरशाहीकडूनही अडथळे निर्माण केले जातात. एक लॉबी अशी आहे जे कच्च्या तेलाची आयात चालू ठेवण्यासाठी भारताच्या पेट्रोलियम मंत्र्यांना धमकावण्याचेही काम करतात. मंत्र्यांना वारंवार धमक्या दिल्या जातात. यासंबंधी निर्णय प्रक्रिया बंद पाडण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात.
दरम्यान, ‘मोईलींना कोणी धमकावू शकत नाही’ अशी पुस्तीही त्यांनी शेवटी जोडली.
दरम्यान, विरोधकांनी मात्र तेलमंत्र्यांचा हा दावा बकवास असल्याचे सांगितले. सीपीआय नेते गुरुदास दासगुप्ता यांनी आरोप केला की, गॅस किमतीत वाढ करून मंत्री रिलायन्स इंडस्ट्रीजला लाभ करून देण्यासाठीच मंत्री अशा कथा रचत आहेत. भारतात फक्त सरकारी मालकीच्या कंपन्याच तेल आयात करतात, असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप काळातील माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी आपणास कधीच धमक्यांना सामोरे जावे लागले नाही, असे स्पष्ट केले. आता मोईलींनी या लॉबींची नावे जाहीर करावीत ज्यांनी त्यांना किंवा कॉंग्रेस काळातील पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, एस. जयपाल रेड्डी किंवा मणी शंकर अय्यर यांच्यावर दबाव आणला होता.