तेरेखोल नदीवर सिडनी हार्बर पद्धतीचा पूल बांधून सरकार एका भू-माफियाला मदत करू पहात असल्याचे सांगून येथील हॉटेल प्रकल्प व पूल म्हणजे भाजप सरकारचा एक फार मोठा घोटाळा असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
गोल्फ कोर्सचा समावेश असलेल्या प्रकल्पासाठी ३४५ एकर जमीन वरील हॉटेल मालकाच्या घशात घालण्याच्या प्रकल्पास कॉंग्रेस पक्षाचा विरोध असल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे तेरेखोल येथील रहिवाशांना बळजबरीने तेथून हाकलून लावण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोल्फ कोर्स प्रकल्पाचा अधिक फायदा महाराष्ट्र राज्यालाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार गोमंतकीयांच्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रकल्पांकडेच लक्ष केंद्रित करीत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके, रेनकोट आदी साहित्यही मिळाले नसल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले.