मडगाव येथून मुंबईला निघालेल्या कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमधील २४ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याने रेल्वे चिपळूण स्थानकात थांबवावी लागली. बाधित प्रवाशांना चिपळूणमधील इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली.
अद्ययावत सुविधा असलेली देशातील सर्वांत वेगवान तेजस एक्स्प्रेस दर रविवारी मडगावहून सीएसएमटीकडे (मुंबई) रवाना होते. कालही तेजस आपल्या नियोजित वेळेनुसार मुंबईच्या दिशेने निघाली होती. मात्र, चिपळूणच्या जवळपास पोहोचताच या रेलगाडीने प्रवास करणार्या अनेक प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. रेल्वे प्रशासनाने पुरविलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची प्रवाशांची तक्रार होती. अस्वस्थ वाटणार्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने तेजस चिपळूण रेल्वे स्थानकावर पोहोचताच थांबवण्यात आली. सुरुवातीला पाचसहा प्रवाशांना चिपळूण शहरातील इस्पितळामध्ये हलविण्यात आले. मात्र, हळूहळू अनेक प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल केलेल्या प्रवाशांची संख्या २४ वर पोचली.
सर्व प्रवाशावर चिपळूण इस्पितळात उपचार केल्यानंतर सर्व प्रवाशांना कोणताही धोका नसल्याचे इस्पितळातील डॉक्टरांनी सांगितले. तेजस एक्स्प्रेस ताशी २०० किमी वेगाने धावते. तेजसच्या प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी रेल्वेला ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च आला आहे. या एक्स्प्रेसचे डबे ऑटोमेटिक असून डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्चिंग अशा अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. अशा अत्याधुनिक सुविधायुक्त एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

