तेजपालप्रकरणी रॉबर्ट निरोंकडून गोवा पोलिसांना उत्तर

0
58
गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजिलेल्या विचार महोत्सवा दरम्यान आपल्या सोबतीला एक महिला होती, असे उत्तर या महोत्सवात निमंत्रित म्हणून उपस्थित राहिलेले हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट दि निरो यांनी गोवा क्राईम ब्रँचला दिले आहे.
आपल्यावर तरुण तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पत्रकार असलेल्या सदर महिलेने केला होता.

त्या अनुषंगाने गोवा क्राईम ब्रँचने रॉबर्ट दि निरो यांना प्रश्‍नावली पाठवली होती. त्या प्रश्‍नावलीला त्यांनी आपल्या न्यूयॉर्कमधील वकिलामार्फत उत्तर दिले असल्याची माहिती राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांनी दिली. मात्र त्यांनी निरो यांनी दिलेल्या उत्तराची अधिक माहिती उघड करण्यास नकार दिला.
गोवा पोलिसांनी गेल्या जानेवारीत निरो यांना वरील प्रकरणासंदर्भात प्रश्‍नावली पाठवली होती. या प्रकरणी तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. विचार महोत्सवा दरम्यान निरो व त्यांच्या मुलीला सदर हॉटेलमधील त्यांच्या खोलीत सोडून येताना लिफ्टमध्ये दोन वेळा तेजपाल यांनी सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचार व विनयभंग अशा स्वरुपाचेही आरोप तेजपाल यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. ६ मार्च २०१४ रोजी क्राईम ब्रँचने पणजीतील द्रुतगती न्यायालयात अर्ज करून या प्रकरणी पुरवणी आरोपपत्रात विदेशी साक्षीदाराची साक्ष समाविष्ट करण्यासाठी वेळ मागितला होता. सध्या तेजपाल सडा तुरुंगात असून त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.