तृणमूल प्रवेश ही मोठी घोडचूक

0
5

>> आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उपरती

आपण तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, ही मोठी घोडचूक होती. तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कुडतरी येथील आपले पाठिराखे, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. आता लोकांच्या भल्यासाठी आपण पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. यापुढे कॉंग्रेस सोडून दुसर्‍या पक्षात जाण्याची चूक पुन्हा करणार नाही. आपण मतदारांची माफी मागतो, असे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल मडगावातील पत्रकार परिषदेत सांगितले.
आपले मित्र, हितचिंतक, कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तृणमूल या बाहेरच्या पक्षाला गोव्यात का आणता असा सवाल केला. त्यामुळे मतांचे विभाजन होईल. तसेच त्यांनी तृणमूलचा त्याग करून पुन्हा कॉंग्रेस पक्षात येण्याचा सल्ला दिला, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

गोव्यासाठी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कॉंग्रेसमध्ये राहून निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य करीन. केवळ वीस दिवसांत आपण तृणमूलचा अनुभव घेतला, त्यांचा अनागोंदी कारभार पाहिला. हा पक्ष गोवा व गोमंतकीयांच्या भल्याचा नसल्याचे आपणाला अवघ्या काही दिवसांत समजले, असेही ते म्हणाले.