तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांचा रालोआला पाठिंबा

0
9

तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पाठिंबा दर्शवलला आहे. सदर बंडखोर खासदार ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’मध्ये (एनसीपी) सामील होणार आहेत. रविवारी दिल्लीत अनेक बंडखोर खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्याआधी, त्यांनी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानीही एक बैठक घेतली. या बैठकीनंतर, बंडखोर खासदार काकोली घोष आणि सुदीप बंडोपाध्याय यांनी, 20 खासदार एनसीपीमध्ये विलीन होतील. त्यांचा गट आता राष्ट्रीय हितासाठी काम करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआला पाठिंबा देईल अशी माहिती दिली.

दरम्यान, ममता गटातील खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनीही लोकसभेच्या सभापतींची भेट घेत, तृणमूल काँग्रेस म्हणजे केवळ खासदार आणि आमदारांचा समूह नसून ममता बॅनर्जी यांनी उभी केलेली पक्षसंघटना आहे. त्यामुळे त्यांचाच गट हा ‘खरा’ तृणमूल काँग्रेसचा गट असल्याचा दावा केला. तृणमूलचे 28 लोकसभा खासदार आहेत. पक्षाचे राज्यसभेतही 13 खासदार आहेत, ज्यापैकी चौघांनी आधीच पक्ष आणि आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. याव्यतिरिक्त, 80 पैकी 60 हून अधिक आमदारांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे.