तृणमूलकडून गृहनिर्माण हक्क योजनेचे आश्‍वासन

0
13

येऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मतदारांवर आश्‍वासनांची खैरात करण्याचे आपले सत्र चालूच ठेवताना काल मतदारांसाठी गृहनिर्माण हक्क योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत तृणमूल कॉंग्रेस व मगो युतीने आपले सरकार राज्यात सत्तेवर आल्यास सरकार स्थापनेपासून २५० दिवसांच्या आत वरील योजनेची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे काल स्पष्ट केले.

‘म्हजें घर, मालकी हक्क’ असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. या योजनेखाली गोमंतकीयांना ते राहत असलेल्या त्यांच्या घराचे जमीन हक्क वरील योजनेखाली देण्यात येणार असल्याचे तृणमूल कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे. १९७६ सालापासून राज्यात राहणार्‍या गोमंतकीयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे तृणमूलने स्पष्ट केले आहे.

त्याशिवाय ज्यांची स्वतःची घरे नाहीत अशा ५० हजार गृहहिन गोमंतकीयांसाठी ५० हजार घरे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे पक्षाने म्हटले आहे. तृणमूलने यापूर्वी महिलांसाठी लक्ष्मी कार्ड योजना व युवकांसाठी युवा शक्ती कार्ड योजना जाहीर केली होती.