तृणमूलकडून आता ‘युवा शक्ती कार्ड’

0
10

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल कॉंग्रेस पक्षाने राज्यातील महिलांसाठी आणलेल्या गृहलक्ष्मी कार्ड योजनेपाठोपाठ आता युवा मतदारांसाठी ‘युवा शक्ती कार्ड’ची घोषणा काल केली.

स्वत:चा उद्योगधंदा सुरू करू इच्छिणार्‍या राज्यातील युवा वर्गासाठी ४ टक्के व्याज दराने २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक आश्‍वासनाचा हा एक भाग असून, पक्षाने यापूर्वी प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला मासिक ५ हजार रुपये एवढी रक्कम गृहलक्ष्मी कार्ड योजनेखाली देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पक्षाने महिलांचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुरुवात केलेली असून, आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी त्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पक्षांकडून देण्यात आली होती.

आता तृणमूलने आपला मोर्चा युवा मतदारांकडे वळवला असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी युवा शक्ती कार्डची घोषणा केली आहे.