Home बातम्या तुलसीमहात्म्य

तुलसीमहात्म्य

0

– सौ. पौर्णिमा केरकर

 सालस, सात्त्विक, निरलस वृत्तीची वृंदा ही मत्सरी, कपटी वृत्तीच्या जालंधराची पत्नी. तिचे पातिव्रत्यच एवढे मोठे की त्याच्या जोरावर तोच अधिकाधिक उन्मत्त होत जातो. दिवसेंदिवस सर्वांसाठीच त्रासदायक होत जाणार्‍या जालंधरला कसेही करून थांबवायलाच हवे या विचाराने भगवान विष्णू जालंधराच्या रूपात वृंदेचे पातिव्रत्य भंग करतो. वृंदेला जेव्हा हे कळते तेव्हा ती त्याला तू शाळिग्राम होशील असा शाप देते. विष्णूही तिला शाप देतो की तू तुळशीचे रोप बनून दारात उभी राहशील. अशा या तुळशीचा आणि शाळिग्रामचा विवाह कार्तिक शुद्ध द्वादशीला संपन्न होतो.

शाळिग्राम म्हणजेच भगवान विष्णू असे मानले जाते. विष्णूला तुलशीपत्र वाहिले जाते. तुळशीच्या पानांची माळ घालून त्याची श्रद्धेने पूजा केली जाते. तुळस, तुलसी ही देवतांच्या केसांपासून निर्माण झाली आहे असेही काही दंतकथांतून दृष्टीस पडते.

अवघ्या विश्‍वाशी एकरूप होऊन जगण्याची, समरस होण्याची वृत्ती लोकमानसाने नेहमीच अंगिकारली होती. चराचर सृष्टीत परमेश्‍वर भरून राहिलेला आहे हे तत्त्वच मुळी लोकमानसाच्या अंतःकरणात, लोकसंस्कृतीत अगदी खोलवर रुतलेले होते. त्यामुळेच अनेक वस्तू, पशु-पक्षी, कृमी-किटक, झाडे-पेडे, पाने-फुले या सर्वांतच त्याने परमेश्‍वराचा अंश बघितला. त्यांच्याशी निगडीत अनेक कथानके निर्माण केली. यालाच धरून मग पुढे गणेशाला दुर्वा, शंकराला बेल, हरितालिकेला तेरडा, वटसावित्रीचा वड, दसर्‍यासाठी आपटा आणि विष्णू, कृष्ण व सावळ्या विठ्ठलासाठी तुळस प्रिय असे मानले गेलेले आहे. आजही आपल्या आवडत्या दैवतांप्रतीची ही श्रद्धा टिकून आहे.

हातीत टाळ, गळीत माळ

नाचत पंढरे जाऊया

पैशाचे तुळशी आमी घेऊया

विठ्ठला देवा वाहूया

असे म्हणत वारीत डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन स्त्रिया आजही सहभागी होताना दिसतात. एक पातिव्रता, भक्त आणि विष्णूची प्रिया म्हणून तिला जे स्थान बहाल केलेले आहे ते सर्वसामान्य समाजजीवनात तिला असलेल्या अढळपदामुळेच प्राप्त झालेले आहे. प्रत्येक हिंदूच्या दारातील अंगणात तुळशीवृंदावन असते. अंगणाची शोभा वाढविणारे तर ते आहेच, त्याबरोबरीने अनेक धार्मिक श्रद्धा त्याच्याशी निगडीत आहेत. लोकसंस्कृतीतील स्त्रियांचा दर दिवस उजाडायचा तोच मुळी या तुळशीवृंदावनाच्या साक्षीने. अंगणातील केर, सडासारवण करून तुळशीत पाणी घालूनच इतर कामांना सुरुवात व्हायची. तिच्याशी एवढे सख्य या स्त्रियांचे जुळले तरी कसे? हे एक न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. पण शतके उलटली तरीसुद्धा तिच्याविषयी वाटत असलेली श्रद्धा आजही अंतःकरणात स्थिरावलेली दिसते. तुळशीला केलेला नमस्कार सर्व देवांना पोचतो असे मानण्याची धारणा त्यामागे आहे. शिवाय ‘जेथे तुळशीचे पान तेथे वसे नारायण’ अशी श्रद्धाही मनात जागी आहे.

सकाळच्या प्रहरी राम राम म्हणत उठून तुळशीला भेटावे, आपल्या मनीचे गुज तिच्याशी बोलावे असेच वारंवार वाटत राहावे अशीच तिची स्थिती. तीच तिची काशी आणि तिचे पंढरपूर. तिच्याशी हितगुज केले की तिला वाटायचे आपण काशीला, पंढरपूरला पोहोचले आहे. एरव्ही दैनंदिनच्या संसाराच्या रहाटगाड्यातून तिचा पाय उंबरठ्याबाहेर पडतच नव्हता. अशी ही तुळसबाई साधीसुधी, काळीसावळी पण सदा सतेज, प्रसन्न म्हणूनच पंढरपूरच्या विठ्ठलाला तिने वेड लावले. वारीला जाणार्‍या प्रत्येकालाच तिचे फार मोठे अप्रूप वाटत आलेले आहे.

पंढरीला जाती संग नेती मी आईबापाला

पाणी तुळशीच्या रोपाला

पंढरपुरात सगळी पंढरी हिरवीगार

तुळशी बनाला आला बहार

वारकर्‍यांच्या हृदयात तर पंढरेचा पांडुरंग वसलेला आहेच, तेच स्थान तुळशीलासुद्धा असलेले दिसते. अशी ही सालंकृत तुळस विठ्ठलाची लाडकी तशीच लोकसंस्कृतीतील स्त्रियांचीसुद्धा तेवढीच जवळची. कारण विठ्ठलाला जेवढी तुळस प्रिय तेवढीच या स्त्रीमनाना तुळस आणि पंढरेचा पांडुरंग प्रिय आहे.

पंढरी मिया केली, माझ्या पाठीच्या पालवान

इठोबा बाप म्हणे लेक आली दुर्बळीन

तुळशी वृंदावनासमोर बसून दिवाळीच्या गीती म्हणतानासुद्धा या मालनीला पुनर्जन्म जेव्हा हवा असतो तेव्हा तो तुळशीच्याच रूपातील हवा ही इच्छा ती प्रकट करते- ‘येईन तुळशी जन्मा. सासुरवाशीनी अगदी न चुकता आपल्याला पाणी घालतील आणि परमेश्‍वराचीसुद्धा मी लाडकी होईन.’ एरव्ही सांसारिक कटकटी सहन करताना जीव मेटाकुटीला येतो. कितीही कष्ट उपसले तरीसुद्धा वाट्याला दुःखभोग काही सुटलेले नाहीत. त्यामुळे तुळशीला जरी एका दिवसाचे सौभाग्य असले तरीसुद्धा तिचे पावित्र्य टिकून राहते. अहेवाचे लेणे शेवटी स्त्रियांना तिच्याचकडे मागावे लागते.

दारातले तुळशी गे, पानन् पान फुलशी गे

गळ्यातल्या मण्यासाठी किती लोक वनवासी गे

असे मागणे तिच्याजवळ मागताना या मालनीला कधी थकायला झाले नाही. ‘दारी तुळस हिरवीगार, तिला माझा नमस्कार’ असे म्हणून सदोदित तिच्यासमोर नतमस्तकच होत आलेली आहे. धालो खेळताना तुळसमातेला गार्‍हाणे घालून म्हणते-

तांबड्या शेल्याचा बत्तीस वाल्याचा

तारू कोणाचा गे-

तारू तारू विठ्ठल देवाचा गे

दस्त फिराक आला गे

दारीया उतरला गे

मांडार खेळाक आला गे…

मांडावर खेळायला येण्यासाठी पंढरीचा विठोबा साखळीच्या तारीवर उतरतो, त्यामुळे-

साखळकारा भयण भावानो मारा चार वाले गा

त्या विठ्ठलाक पैलाडी पावया गा..

अशी हाक दिली जाते. अशी ही दारातली तुळस रानीवनी विखुरलेली, परंतु आमच्या वाडवडिलांनी तिला अंगणात आणून लावली असे मोठेपणही मिरविले जाते-

तुळस माऊली नको हिंडूस रानाईत

जागा देते मी अंगणात

माझ्या अंगणात बाई, तुळशीला करा कट्टा

पाप गेले चारी वाटा

माझ्या अंगणात तुळशीबाईचा चवरंग

तिच्या दर्शनाला वाड्या येताल पांडुरंगा

याचसाठी ते मोठेपण असते. रानावनातली तुळस अंगणी लावल्यानंतर तिच्या नैमित्तिक दर्शनाने पापहरण होते. संपत्ती, सौभाग्य प्राप्त होते ही तिच्या मनाची धारणा. तिची सलगी ही तुळशीसाठी याच कारणाने आहे. लोकसंस्कृतीतील लोकगीतांचा बहुतांश भाग हा स्त्रियांनी व्यापलेला आहे. त्यात तिची पहाट ही तुळशीपासूनच सुरुवात होते. ‘पहिली माझी ओवी ग दारातल्या तुळशीला’ हीच तिची सुरुवात.

कोणे एके काळी म्हणे एका राजाला एक आवडती व एक नावडती बायको असते. आवडतीच्या हेकापायी नावडतीला घरातून बाहेर हाकलले जाते. रडत-कुढत ती बिचारी रानोमाळ हिंडते. सुरुवातीलाच रानात लक्ष वेधून घेते ते तिथे असलेले परंतु पाण्याअभावी सुकून गेलेले तुळशीचे रोप. नावडतीला त्या रोपाची दया येते. बाजूलाच असलेल्या ओहोळाचे पसा-पसाभर पाणी आणून ती ते रोप शिंपते. तशीच पुढे जाताना तिला विविध रोपे भेटतात. त्यांचे संगोपन करतच ती पुढे जाते. स्वतःचा घात करण्याचा तिचा विचार बदलतो. ती माघारी वळते. प्रत्येक रोप तिला काही ना काही तरी वस्तू देते. तुळशीचे रोपसुद्धा याला अपवाद नसते. परंतु या तिच्या कृतीमुळे तिला तिचे पूर्वीचे अस्तित्व प्राप्त होते. तुळशीचे रोपच तिचे तारणहार बनते. कथा काल्पनिक, दंतकथा, ज्यात सत्याचा अंश कितपत आहे हे ठरविणेसुद्धा कळीचा मुद्दा होऊ शकतो. परंतु ती या कष्टकरी स्त्रीजीवनाशी इतकी समरस झालेली आहे की त्यापासून ती स्वतःला विलग करू शकत नाही.

आयतार पूजनाची तिची सुरुवात ही तुळशीवृंदावनात फुलपत्री वाहूनच सुरू केलेली असायची. कार्तिक द्वादशीचे तिचे जोडे म्हणून कापसाच्या वाती जाळून पतीच्या आयुष्याची व आरोग्याची कामना करणार्‍या व्रताला तुळसच साक्षीदार असते. धालो असो नाहीतर धिल्लो, कातयो नाहीतर गीती, यासाठी तिची सोबत करणारी हीच तुळसमाया असते. म्हणून धालोत्सवाची तयारी करताना तुळशीची पेडी घालण्यासाठी खणून माती आणण्यापासून ते धालोच्या पातीला उभे राहीपर्यंतचा प्रवास गीतातून अधोरेखित केलेला आहे. कातयोमध्ये तर तुळशीचे विविध विभ्रम रेखाटणारे गीत विलोभनीय असेच आहे. तुळस अधिक झळाळून, सळसळून उठते ती कार्तिक मासातच. नुकताच पडून गेलेला पाऊस मातीचा ओलसरपणा घेऊन ती परिपुष्ट होते की द्वादशीला होणार्‍या तिच्या एक दिवसाच्या अहेवपणासाठी ती उत्सुक असते हे सांगणे तसे कठीणच. पण ती भागीरती बनून त्याला खुणावतेच. तोसुद्धा गोसावी बनून येतो. लौकिक अर्थाने ही भागीरती कोणाची तरी पत्नी असते. सून, जाऊ असते. पण तिच्या ध्याना-मनात पांडुरंगच वसलेला-

सकाळच्या रे पारी, नि पांडुरंग दारी

दिशात भिक्षा म्हणून रे साद केला

सुपाचे इडनी भरल्यो साळी दाळी

सवर्णाचा सूप चुडीयाचो हात

घ्यावो गुरुजी भिक्षा का समेस्ताची हो रामा

पलंगार न्हिदलेल्या भागीरतीच्या मावा

भागीरत सून रे दान दी माका

भागीरत सून रे मोठी भागीयाची

आनी कशी दान देऊ रे गोसायाक

दीर-जावाकडेही भागीरतीसाठी मागणे केले जाते. पती मात्र तिचे दान गोसाव्याला करतो. वाटेत तिला पांडुरंगाचे दर्शन घडते.

पुढे पांडुरंग आनी मागा भागीरथ

ती दोगा चालली रे पंढरेक…

परंतु एकदा गोसाव्याबरोबर गेलेली ती, तिला मात्र परत त्या घरात जागा मिळत नाही.

तुळशीच्या माळा, माळा पैशाला येतात इस

सावळ्या पांडुरंगा, गळ्या घालता खाली बस

देवदेवतांचे मानवीकरण करून त्यांना आपल्या समान पातळीवर आणताना लोकमानसाचा, त्यातही स्त्रीमनाचा ताण बराच हलका होत जातो. आई, बाप, गणगोत, नातेवाईक कोणीही नसलेली ही तुळस काळीसावळी तरीही श्रीविष्णूची प्रिया बनते. त्याचेच रूप असलेल्या सावळ्या विठ्ठलाची सखी होते हासुद्धा या लोकसंस्कृतीचाच आविष्कार आहे. तुळस वाटेवरील रोप, बुडाशी माती, तरीही लोकमानसात एवढी लोकप्रिय हे न उलगडणारे कोडे आहे. तिचे आयुर्वेदिक गुणधर्म तर सर्वज्ञातच आहेत. गोव्यात तर बाटाबाटीच्या वेळी सक्तीने ख्रिश्‍चन केलेल्या लोकमानसाच्या दारातही तुळशीवृंदावन होते. ते सक्तीने नष्ट करायला लावले. त्याची जागा क्रॉसने घेतली तरीही आठवणीतील त्याची जागा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुळस पोरकी, तिला कोणीच नाही. व्यवहारातील तुळसीचे नाते जन्मापासून मृत्यूपर्यंतचे आहे. तुळशीपत्रातून तोंडात घातलेले पाणी मुक्ती देणारे ठरते असे मानले जाते. कान टोचले असता ते बंद होता कामा नये म्हणून तुळशीची काडी कानात घातली जाते. पाने तर औषधी गुणधर्माने युक्तच आहेत. तुळळीची पाने देवाला लावून अंगसंग घलविला जातो.

तुळशीची ही नानाविध रूपे लोकमानसाने अनुभवली. स्त्रियांनी तर त्यांच्याशी समरसत्वच पत्करले. ती साधीभोळी म्हणून आपलीशी वाटली. पंढरपूरचा विठ्ठलही तिला आपला वाटतो. त्याच्याप्रतीची भावना व्यक्त करण्यासाठी मग तुळस पुढे येते. देवाशी तिचे जुळलेले नाते तिला आनंद देणारे ठरते खरे, परंतु एकाच दिवसाचे अहेवपण मात्र तिला कायमस्वरूपी खंत देते. कार्तिकी एकादशीचे तिचे हे वेगळेपण स्त्रियांनी ध्यानी-मनी साठवलेले आहे. तिच्याचसाठी, तिच्या बरोबरीने तिला डोक्यावर ठेवून हजारो मैलांचा प्रवास करून त्या चंद्रभागेतीरी विटेवरीउभा कटेवरी हात असलेल्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घेण्यासाठी शेकडो वर्षे उलटली तरीही न थकता चालताहेत…