तुये येथे परिचारिकेवर भरदिवसा चाकू हल्ला

0
1

प्रेमप्रकरणाच्या संशयातून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर जेरबंद

पेडणे तालुक्यातील तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका महिला परिचारिकेवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात परिचारिकेच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी कोरगाव येथील गौतम देविदास (25) या संशयिताला अटक केली आहे. या हल्ल्यामागे प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीच्या विरोधात यापूर्वीही संबंधित परिचारिकेचा पाठलाग करणे, तिला त्रास देणे व आरोग्य केंद्र परिसरात वारंवार येऊन तिच्यावर नजर ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती.

दबा धरून हल्ला
सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसला होता. ड्युटी संपवून परिचारिका घरी जाण्यासाठी बाहेर पडताच त्याने अचानक धारदार चाकूने सलग चार ते पाच वार केले. हल्ल्यात परिचारिका रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. घटनेच्या वेळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत संशयित आरोपीला पकडून ठेवले. त्यानंतर पेडणे पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. स्थानिकांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.

खुनी हल्ल्याचा गुन्हा
गंभीर जखमी परिचारिकेला प्राथमिक उपचारानंतर बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले. पेडणे पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध खुनी हल्ल्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीच्या तक्रारी व संशयित आरोपीची पार्श्वभूमी यांचा तपास सुरू आहे.

परिचारिका गंभीर जखमी
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परिचारिकेवर प्रथम तुये सामुदायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बांबोळी येथे हलविण्यात आले.