– विष्णू सूर्या वाघ
आपल्या भोवतालच्या या संपूर्ण सृष्टीचं चलन-वलन विशिष्ट नियमांनुसारच होत असतं. हे नियम सृष्टीच्या प्रारंभापासून आहेत. पण ते समजून घ्यायला मानवाला हजारो वर्षं लागली. उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वात प्रथम न्यूटनच्या लक्षात आला. पण न्यूटनच्या आधीसुद्धा गुरुत्वाकर्षण होतंच. झाडावरची फळं जमिनीवरच पडत होती. पण ती वर जाण्याऐवजी खालीच
आपल्या आत्मशक्तीच्या बाबतीतही असंच घडलंय. फारच थोड्या लोकांना तिच्या ‘असण्याची’ जाणीव झालीय. ज्यांनी या आत्मशक्तीला ओळखलं, जागृत केलं त्यांना जीवनात अनेक अद्भुत, अपूर्व गोष्टी करता आल्या. सर्वसामान्य माणसं याला चमत्कार समजू लागली. वास्तविक यात चमत्काराचा अजिबात भाग नाही. ही आत्मशक्ती अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील जादूई दिव्यातून बाहेर येणार्या जीनीसारखी आहे. दिवा घासला तरच जीनी बाहेर येतो, त्याप्रमाणं आपलं अंतर्मन (ज्याला इंग्रजीत आपण सब-कॉन्शस माईंड म्हणतो) घासूनपुसून लख्ख केलं तरच आपल्या मनातली स्वप्नं साकार करण्यासाठी आत्मशक्तीचा जीनी हात जोडून उभा राहतो आणि तुम्ही फर्मावाल त्या आज्ञेचं पालन करतो.
आत्मशक्ती ही गुप्तधनासारखी
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत एक सुंदर दृष्टांत दिलाय. आत्मसुखाला पारखा झालेला माणूस कसा असतो ते सांगण्यासाठी ज्ञानदेव एक रुपक वापरतात. एक माणूस एका जागेवर बसून भीक मागतोय. कधीकाळी त्याचे पूर्वज खूप श्रीमंत होते. पण काळाच्या ओघात श्रीमंती गेली आणि गरिबी आली. हा माणूस तर इतका कफल्लक झाला की त्याला उपजीविकेसाठी चक्क भीक मागावी लागली. जिथे एकेकाळी त्याचं टोलेजंग घर होतं त्याच जागी एका खडकावर बसून तो भीक मागतोय.
पण त्या दुर्दैवी माणसाला जरादेखील कल्पना नाही की ज्या दगडावर बसून आपण भीक मागतोय त्याच दगडाखाली अवघ्या काही हातांवर त्याच्या पूर्वजांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे पुरून ठेवले आहेत. वास्तविक त्या धनावर त्याचीच मालकी आहे, पण बिचार्याच्या स्वप्नातही नाही की ते धन वाडवडिलांनी अडचणीच्या वेळी कामी यावं म्हणून पुरून ठेवलं आहे!
आपली आत्मशक्ती ही त्या गुप्तधनासारखी आहे. तिच्या मुळाशी जाण्याचं सोडून आपण भलत्याच गोष्टींच्या पाठी धावत चाललोय. परिणामी उद्वेग, वैफल्य आणि हताशपणा याशिवाय काहीच पदरी पडत नाही. आपल्या जमिनीत राब-राब राबूनही काहीच पिकत नाही, ही ओसाड, पडीक जमीन काय कामाची असं म्हणून एखाद्यानं ती विकून टाकावी आणि ज्यानं विकत घेतली त्यालाच नेमकी त्या जमिनीत हिर्यांची खाण सापडावी असा प्रकार आपल्या बाबतीत घडत असतो. जे आत्मशक्तीला आवाहन करतात ते यशस्वी होतात. तिच्याकडे पाठ फिरवतात ते अपयशाच्या खाईतच लोळत राहतात.
सकारात्मक श्रद्धेचा अभाव!
ऑरिसन स्वेट मार्डन हा जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ अशा लोकांबद्दल म्हणतो ः
जीवनात अपयशी होणारे बहुतेक लोक हे पराभूत मनोवृत्तीची शिकार झालेले असतात. आपण काही करू शकतो हा विश्वासच त्याच्या ठायी असत नाही. संघर्ष करण्याच्या वृत्तीचा त्यांच्यात पूर्ण अभाव असतो. त्यामुळं ते यशस्वी होण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. पाण्यात गटांगळ्या खाणार्या माणसानं नुसते हात-पाय मारले तरी तो पोहून पैलतीर गाठू शकतो. पण आपण आता बुडणारच ही भीती त्याच्या मनात घर करून राहिली असेल तर त्याला पोहायला कसं जमणार?
एखादी गोष्ट आपल्याला जमणारच नाही हा दृष्टिकोन बाळगल्यानंतर त्या माणसासाठी कुणीच काही करू शकत नाही. अशा पराभूत मनोवृत्तीमुळेच कोट्यवधी माणसे गरिबी, दुःख, दैन्य यांच्या दुष्टचक्रात अडकतात. हे दुष्टचक्र भेदून आपण वर येऊ शकतो असा विश्वास त्यांना अजिबात वाटत नाही!
पण जी माणसं शूर असतात, प्रतिकूल परिस्थितीवरही मात करण्याची जिद्द बाळगतात, आपण कधी ना कधी सफल होऊच अशी अढळ श्रद्धा ज्यांच्या मनात असते व त्या दिशेनंच ज्यांचे निरंतर प्रयत्न चाललेले असतात त्यांच्याच पायाशी यश लोळण घेतं.
तुमच्या अंगात अशा सकारात्मक श्रद्धेचा अभाव असेल तर आजपासूनच कामाला लागा. आत्मविश्वासाचं रोपटं तुमच्या अंतःकरणात रुजवा. न थकता, न कंटाळता त्याची निगराणी करा. खत-पाणी घालून ते वाढवा. एक ना एक दिवस त्याचा वटवृक्ष झाल्यावाचून राहणार नाही. हे सामर्थ्य ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्याच दिवशी तुकाराम महाराजांच्या ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी’ या ओळींचा अर्थ तुमच्या लक्षात येऊ शकेल!
आत्मविश्वास हीच किल्ली
चुंबकीय शक्ती असलेला लोखंडाचा लहान तुकडाही आपणापेक्षा वजनाने दसपट अधिक लोखंड उचलू शकतो. पण ही चुंबकीय शक्ती नसेल तर त्याला पीसाइतकं हलकं वजनसुद्धा उचलता येत नाही. याचप्रमाणे आत्मविश्वासानं भारलेला मनुष्य कुठलीही कल्पना सत्यात उतरवू शकतो आणि आत्मविश्वास नसलेला माणूस सहज होण्याजोगं कामही करू शकत नाही. यशस्वी आणि अपयशी माणसांमध्ये हाच फरक आहे!
एखाद्या गोष्टीसंबंधी नको तितका विचार करण्यासाठी आपण किती वेळ खर्च करतो याचा हिशेब तुम्ही कधी मांडलाय का? काय करावं, कसं करावं, नक्की कुठली वाट पकडावी, तिथे यश मिळेल का? न मिळाल्यास त्याचा काय परिणाम होईल असे अनेक संभ्रम आपल्या मनात दर दिवशी, दर क्षणी निर्माण होत असतात. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं तुकोबांनी म्हटलं आहे. आम्ही मात्र रात्रंदिवस चिंता करीत बसतो. यातूनच संभ्रमाची, शंका-कुशंकांची भुतावळ उठून उभी राहते. तिला हाकलून लावायचं असेल, मन भयमुक्त करायचं असेल तर गरज आहे एकाच गोष्टीची ः आत्मविश्वास… प्रचंड आत्मविश्वास!
आपल्या अवतीभवती अनेक आव्हाने असतात. संकटांचे डोंगर उभे असतात. पण त्यांचा सामना करायचं सोडून आपण बसतो नशिबाला बोल लावत! बोटं मोडतो नियतीच्या नावानं! म्हणतो- माझं नशीबच तसं होतं! आव्हानांचा मुकाबला टाळण्यासाठी कधीकधी आपण आपल्या दृष्टीने सुरक्षित वाटेल असा मार्ग पत्करतो. पण सर्वाधिक खड्डे त्याच वाटेवर असतात हे आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा आपणाला कुठे जायचंय नि कसं जायचंय हे आधी पक्कं करा नि मगच चालायला लागा. रस्ते अनेक असतात, पण त्यातला कुठला पकडावा म्हणजे आपलं इस्पित गाठता येईल याचं तारतम्य तुम्ही वापरायचं असतं.
शंभरातली केवळ पाच माणसं यशस्वी होतात. ९५ टक्के लोक नशिबाला बोल लावत कण्हत- कुंथत जगतात. यशस्वी आणि अयशस्वी माणसांमध्ये असा कुठला फरक असतो? अशी कुठली वस्तू असते जी यशाला त्यांच्या पारड्यात टाकते? संधी? नियती? साधनसामग्री? प्रशिक्षण? मुळीच नाही. यश किंवा अपयश यांना कारणीभूत असतो तो त्याकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन!
काटे हवेत की फुलं?
गुलाबाच्या झाडाला काटे असतात. त्याच झाडावर सुवासिक गुलाबाचं फूल उमलतं. तुम्हाला फुलाचा सुगंध हवा की काट्याची टोचणी याचा निर्णय मात्र पूर्णपणे तुमच्या हाती असतो.
यशस्वी माणूस वेगळं काहीच करत नाही. तो संधीची वाट पाहतो. ती नजरेच्या टप्प्यात येताच तिच्यावर झडप घालतो आणि प्रगतीची एक पायरी वर चढतो. अपयशाची भीतीही त्याच्या मनाला शिवत नाही. त्याला दिसते केवळ संधी. मग ती पटकावण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करण्याची तो धडपड करतो. याउलट अपयशी माणसांची कथा आहे. त्यांनाही संधी खुणावत असते. पण त्यांचा निर्णय होत नाही. ही संधी आपण घ्यावी की नाही, यात फायदा होईल की तोटा, माझ्या वाट्याला स्तुती येईल की मी निंदानालस्तीचा धनी होईन असे अनेक प्रश्न त्याच्या मस्तकात रुंजी घालू लागतात. या द्विधा मनःस्थितीची परिणती व्हायची तीच होते- तो अखेरपर्यंत कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही!
काही वर्षांनंतर हा माणूस आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करताना हताशपणे म्हणतो ः ‘अरेरे… त्या संधीचा मी फायदा उठवला असता तर! पण तोपर्यंत पश्चात्ताप करण्याची वेळ निघून गेलेली असते.’
असा पश्चात्ताप करण्याची पाळी आपणावर येऊ नये असं तुम्हाला वाटतंय ना? मग आजपासून, आतापासून तुमची मनोवृत्ती बदलण्याचा निर्धार करा. तुमचं भविष्य पूर्णतया तुमच्या हातात आहे. तुमच्या अंतर्मनात तुम्हाला हवं ते देऊ शकणारी आत्मशक्ती आहे आणि या आत्मशक्तीचं नातं थेट विश्वाचं चलनवलन करणार्या अमर्याद ऊर्जाशक्तीशी जोडलं गेलं आहे. ही विश्वशक्ती तुमच्यातील आत्मशक्तीला कुठलंही वरदान देऊ शकते. ती प्रसन्न झाली तर कशाचीही उणीव तुम्हाला जाणवणार नाही. पैसा, धन, संपत्ती, यश, कीर्ती, प्रसिद्धी सगळी सुखं हात जोडून तुमच्या पायाशी धावत येतील.
एकलव्य हा जंगलात राहणार्या एका भिल्ल राजाचा मुलगा. तो जंगलात जन्मला, जंगलातच वाढला. सुसंस्कृत मानवी समाजाचे संस्कार त्याच्यापासून कोसो मैल दूर होते. एकलव्याचा बाप भिल्लांचा राजा होता. राजा म्हणजे नावापुरताच. खरं म्हणजे तो होता भिल्लांच्या एका टोळीचा प्रमुख. हे भिल्लं किंवा निषाद पुढारलेल्या मानवांच्या दृष्टीनं बहिष्कृतच होते.
एकलव्याला धनुर्विद्या शिकण्याची खूप हौस होती. जंगलातच वाढल्यामुळे तीर-कमठा चालवण्यात त्याचा हातखंडा होता. पण शहरातले राजपुत्र जे धनुष्य-बाण चालवत ते शिकण्याची त्याची इच्छा होती. म्हणून एक दिवस तो गुरूच्या शोधार्थ निघाला. चालत चालत हस्तिनापूरपर्यंत आला. तिथं त्याला कळलं की कुरुवंशाच्या राजपुत्रांना धनुर्विद्या शिकवण्याचं काम द्रोणाचार्य नावाच्या एका श्रेष्ठ गुरूंवर सोपवण्यात आलं आहे. या द्रोणाचार्यांकडे जाऊन आपणही शिकावं असं एकलव्याच्या मनात आलं आणि तो गुरू द्रोणांना भेटायला गेला. ‘आपण मला धनुर्विद्या शिकवाल का?’ असा प्रश्नही त्याने नम्रपणे विचारला. गुरू द्रोणांनी त्याची थट्टा केली. नालस्ती केली. मी राजकुमारांचा गुरू होऊ शकतो, रानटी भिल्लांच्या कारट्यांचा नाही, असं ते म्हणाले. शिवाय मी फक्त ब्राह्मण व क्षत्रियांनाच शिकवू शकतो, शूद्रांना नाही असंही ते म्हणाले. खूप याचना केल्यानंतरही गुरू द्रोण ऐकत नाहीत हे पाहिल्यावर घायाळ अंतःकरणाने एकलव्य जंगलात परतला. तो निराश झाला होता, पण पराभूत नक्कीच नाही. द्रोणांच्या आश्रमाचा उंबरठा ओलांडतानाच त्यानं आपल्या आत्मशक्तीला साद घातली होती. गुरुदेव तुम्ही खुशाल नाही म्हणा… पण धनुर्वेद शिकेन तर तुमच्याकडूनच.
एकलव्यानं मातीपासून द्रोणाचार्यांचा एक पुतळा बनवला. जंगलातील एका पठारावर त्याची प्रतिष्ठापना केली. हा पुतळाच आपला गुरू आहे असं मानून धनुर्विद्येची साधना करायला त्यानं सुरुवात केली. द्रोणाचार्यांचा पुतळा खरं म्हणजे एकलव्याला काहीच सांगत नव्हता. बोलून चालून पुतळाच तो! एकलव्य बोलत होता स्वतःशीच. प्रश्न विचारायचा स्वतःलाच आणि उत्तरंही द्यायचा स्वतःच. पुतळा हे केवळ त्याच्या आत्मशक्तीचं प्रतीक होतं. इतर कुणीही असता तर कंटाळून अशा प्रकारची साधना त्यानं सोडून दिली असती. पण एकलव्य निग्रहापासून ढळला नाही. धनुर्विद्येतले सगळे बारकावे त्याने स्वतः संशोधन करून शिकून घेतले आणि द्रोणाचार्यांच्या आवडत्या शिष्योत्तमापेक्षा- अर्जुनापेक्षाही- श्रेष्ठ धनुधर म्हणून त्यानं नावलौकिक मिळवला. द्रोणाचार्यांना जेव्हा त्याच्या पराक्रमाचं प्रत्यक्ष दर्शन घडलं त्यावेळी अशा प्रामाणिक विद्यार्थ्याला विन्मुख पाठवल्याबद्दल त्यांनाही पश्चात्ताप झाला.
तुमच्या-आमच्या प्रत्येकातच असा एक एकलव्य दडून बसलेला असतो. पण आपण त्याची ओळख करून घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. एकलव्य राजघराण्यातला नव्हता. क्षत्रियही नव्हता. ज्ञानावर त्याचा अधिकार नव्हता. पण याविषयीचा कुठलाच न्यूनगंड त्याने आपल्या मनात रुजू दिला नाही! कुणाच्याही मार्गदर्शनाविना धनुर्विद्या त्यानं स्वतः शिकून घेतली. एक बाह्य प्रेरणास्थान असावं म्हणून त्यानं द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला खरा, पण तो बनवला नसता तरी एकलव्य धनुर्विद्या शिकला असता. कारण त्याची महत्त्वाकांक्षा जबर होती. जिद्द अमर्याद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंही उदाहरण याबाबतीत देता येईल. आपण दलित आहोत हा न्यूनगंड बाबासाहेबांनी बाजूला सारला. ज्ञान हे सर्व मानवांसाठी आहे आणि सार्यांचा अधिकार ज्ञानावरती आहे हे त्यांनी मानून घेतलं व त्याप्रमाणे कृती केली. त्याप्रमाणं भल्याभल्यांना त्यांच्यासमोर झुकावं लागलं.
मग आता सांगा, तुमच्यातल्या एकलव्याला तुम्ही जागवणार आहात ना? ज्ञानाचे पंख पसरून झेप घेण्याची आकांक्षा तुम्हीही आपल्या मनात रुजवणार आहात ना?
उठा तर मग! वळवा तुमच्या मुठी आणि करा वज्रनिर्धार! म्हणा स्वतःशीच… नाही, मी नियतीचा गुलाम होणार नाही! उलट मीच त्या नियतीला माझी दासी बनवीन! संकटांचे डोंगरच्या डोंगर कोसळले तरी त्यांच्या ढिगार्यावर उभा राहीन आणि आभाळाला गवसणी घालीन! मला माझ्या आत्मशक्तीची जाणीव झाली आहे. आता माझं भविष्य मीच घडवणार आहे! माझ्या स्वप्नांना मीच आकार देणार आहे. मला आता कुणाचीही गरज नाही… साधू, महाराज, बाबा, बैरागी, भगत, ज्ज्योतिषी कुणा-कुणापुढे मी नमणार नाही! आता माझ्यासोबत असेल ती माझी आत्मशक्ती! केवळ माझी आत्मशक्ती!(क्रमशः)

