– लाडोजी परब
‘गझल किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला धीरगंभीर तरीसुद्धा रेशमी आवाजाचा जादूगार, ज्याने ७० व्या दशकातच रसिक मनाला भुरळ घातली. अभिजनांच्या गझलतेतील अभिजाततेला धक्का न लागता ‘गझल’ लोकाभिमुख करण्याची करामत जगजीत सिंह यांनी केली. काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्यांची गझल ‘होठों से छुलो तुम…’ अशीच राहणार आहे.
आखिरी हिचकी तेरे, जानो पे आये|
मौत भी मैं शायराना चाहता हूँ…
आ तुझे मैं गुनगुनाता चाहता हूँ|
अशी निर्भय आर्त साद मृत्यूला घालणारे गझल सम्राट जगजित सिंग हे कुणाला, काहीही न सांगताच हे जग सोडून गेले! गेली चाळीस वर्षे आपल्या मुलायम, मोहक गझल गायकीने गझल रसिकांना झपाटून टाकणार्या, त्यांच्यावर अधिराज्य गाजवणार्या जगजित सिंह यांचा मृत्यू असा अनपेक्षित होईल, असे वाटले नव्हते! २३ सप्टेंबरला मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये गझलचे बादशहा गुलाम अली आणि हरिहरन यांच्या समवेत ते गझल गायकीची अनोखी संयुक्त मैङ्गल रंगवणार होते. पण त्याच दिवशी मेंदूतल्या रक्तस्त्रावाच्या विकाराने त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आधी १९८८ मध्ये हृदयविकाराच्या आलेल्या झटक्यातून ते बरे झाले होते. २००० मध्ये रक्तवाहिनीतल्या गुठळ्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही आजारातून ते बरे झाले. दोन वेळा मृत्यूला चकवा देणार्या मृत्यूने यावेळी मात्र त्यांनाच चकवा दिला. आधुनिक गझल गायकीचे अग्रदूत असलेल्या जगजित सिंह यांनी गझल गायकीला नवी दिशा आणि नवा साज चढवला. गझल म्हणजे जगजित सिंह आणि जगजित सिंह म्हणजे गझल! अशी एकरुपता निर्माण झाली होती. आपल्या गझल गायकीने त्यांनी लाखो दु:खी माणसांच्या जीवनात आनंद निर्माण केला. त्यांना जगायची, झुंजायची प्रेरणा दिली. मृत्यूच्या छायेत असलेल्या हजारो रुग्णांना त्यांच्याच मुलायम स्वरांनी, आनंदाच्या डोहात डुंबवले. त्यांचे व्यक्तिगत जीवन मात्र सांसारिक दु:खाने भरलेले होते. दु:खाचे कढ हृदयातच साठवून, हा महान गायक रसिकांना रिझवत राहिला.
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम हैं|
जिसको छुपा रहे हो…
अशी आर्त साद देत गात राहिला. अंतरात साठवलेले अङ्गाट दु:ख आणि वेदनांची कल्पनाही त्यांच्या रसिकांना ङ्गारशी नव्हती. व्यक्तिगत जीवनात दु:खाचे डोंगर कोसळल्यावर गझल हेच आपले जीवन सर्वस्व मानले आणि गझलांच्या सुरा–स्वरात लाखोंचे आयुष्य आनंददायी केले.
मेरी जिंदगी किसी और की….
मेरा नाम कोई और है|
या त्यांनी गायलेल्या गझलेचा अर्थ रसिकांना समजला, पण तो असा वेदनामयी!
दुनिया जिसे कहते है| जादू का खिलौना है|
मिल जाए तो मिट्टी है| खो जाए तो सोना है|
ही गझल जगजित सिंह यांनी अजरामर केली. चित्रा सिंग या त्यांच्या पत्नी. त्याही गझल गायिका. दोघांनी मिळून गझल गायकीचे अनेक कार्यक्रम देश–विदेशात केले. दोघांच्याही गायकीचे अनेक अल्बमही प्रकाशित झाले, गाजले, लोकप्रिय झाले. गायकीच्या क्षेत्रात उदंड कीर्ती, उदंड धन, या दांपत्याला मिळाले. कोट्यवधी रसिकांचे प्रेमही मिळाले. पण यशाच्या शिखरावर असतानाच, त्यांचा एकुलता एक मुलगा विवेकचे मोटार अपघातात निधन झाले. अचानक कोसळलेल्या या महासंकटाने जगजित आणि चित्रा हे दोघेही साङ्ग कोसळले. हताश झाले. त्यांच्या जगण्यातला आनंदाचा ठेवा हरपला. मुलाच्या निधनानंतर निराश झालेल्या चित्रांनी गझल गायकीकडे कायमची पाठ ङ्गिरवली. त्यांनी या घटनेनंतर कधीही गझल गायली नाही. जगजित सिंह यांनी मात्र दु:खाचे ते विष धैर्याने पचवून, आपल्या वेदनांचा बाजार न मांडता, पुन्हा गझल गायकीला सुरुवात केली. विवेकच्या मृत्यूनंतर गझल गायकी हाच त्यांचा श्वास आणि प्राण ठरला. १८५७ च्या स्वातंत्र्य समराच्या १५० व्या संसदेत झालेल्या जयंती समारोहात जगजित सिंह यांनी शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जङ्गर यांची गझल गायली होती. लता मंगेशकर यांच्या समवेत ‘सजदा’, जावेद अख्तर यांच्या समवेत ‘सोझ’ यासह पन्नासच्यावर त्यांचे गझल गायकीचे अल्बम प्रकाशित झाले आहेत. इंग्लंड, अमेरिकेसह जगभरात गझल गायकीच्या शेकडो मैङ्गिलीही त्यांनी रंगवल्या. हिंदी, उर्दू, पंजाबी, भोजपुरीसहित अनेक भाषांत गझला गायिल्या. गेल्या काही वर्षांत त्यांनी भजन गायकीतही आपल्या जादूभरी आवाजाचा रंग भरला होता. कबीर, सूरदास, मीराबाईचे दोहे त्यांनी गायिले होते. परमेश्वराशी समरस होत त्यांनी अंतरात्म्याला हाक घालीत, गायिलेले हे अभंग ऐकतानाही त्यांच्या आर्त स्वरांनी रसिक हरपून जात. कवी–दिग्दर्शक गुलझार आणि जावेद अख्तर यांच्या समवेत त्यांनी दूरदर्शनवर ‘मिर्झा गालिब’ ही मालिकाही सादर केली होती. गालिबच्या अनेक गझलांना त्यांनी स्वरांचा नवा साज चढवून, गालिबचे अंतरंग रसिकांना उलगडून दाखवले होते. ‘ये दौलत भी लेलो, शोहरत भी लेलो|’ ‘होशवालों को क्या खबर है’, ‘तुम को देखा तो ये खयाल आया’, ‘झुकी झुकी सी नजर, तेरा चेहरा, ओ कागज की कश्ती, वो बारिश का पानी’, ‘होठों से छुलो तुम’, ‘हर एक बात पे तुम कहते हो, तू नया है’, या गालिबसह अन्य गझलकारांच्या गझलांचे शब्द जगजित सिंह यांनी आपल्या मधुर आवाजाने जिवंत केल्याचा साक्षात्कारही रसिकांना घडला. पत्नी चित्रा समवेत गालिबच्या, ‘आह को चाहिए’, ‘ये नाभी हमारी किस्मत’, गायिलेल्या गझल प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. राजस्थानातल्या श्री गंगानगर येथे १९४० मध्ये जन्मलेल्या जगजित सिंह यांच्या वडिलांची संगीतकार व्हायची इच्छा पूर्ण झाली नव्हती. ती त्यांच्या मुलाने पूर्ण केली.
गझल गायकीमध्ये सारंगी आणि तबला या पारंपरिक वाद्यांबरोबरच आधुनिक वाद्यांचा वापर करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली, त्यामुळे ते आधुनिक गझलेचे उद्गाते होते. पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर उस्ताद जमाल खॉं यांच्याकडे सहा वर्षे ख्याल, ठुमरी, ध्रुपद हे प्रकार आत्मसात केले. ते जालंधरला डीएव्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच आकाशवाणीच्या जालंधर स्टेशनने त्यांना ‘ब’ दर्जाचे कलाकार म्हणून वर्षाला सहा कार्यक्रम करण्याची मुभा दिलेली होती. आपले नशीब अजमावण्यासाठी ते १९६१ ला मुंबईत आले. परंतु त्यावेळी ते निराश होऊन परत जालंधरला गेले. १९६५ मध्ये पुन्हा मुंबईत आले. एचएमव्हीसाठी दोन गझल गाण्याची संधी त्यांना मिळाली. याचदरम्यान चित्रा यांच्याशी त्यांची मैत्री झाली. १९७० मध्ये त्यांनी लग्न केले. त्यानंतर यशाचे अनेक दरवाजे त्यांच्यासाठी खुले होत गेले. १९७५ मध्ये प्रथमच एचएमव्हीने स्वतंत्र अल्बम काढण्याची संधी मिळाली. त्यांच्या ‘अनफरगटेबल’ या पहिल्याच अल्बमला रसिकांनी डोक्यावर घेतले. मग अल्बम आणि संगीत मैफली रंगत गेल्या. याचदरम्यान ते पार्श्वगायन आणि संगीतरचना करण्याकडे वळले. संगीतरसिकांना त्यांची खरी ओळख फिल्मी गझलांनी झाली. ‘प्रेमगीत’ या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत आणि विशेष म्हणजे ‘होठों से छुलो तुम’ ही गझल आजही लोकप्रिय आहे. सुरवातीच्या या यशानंतरही त्यांचे चित्रपट क्षेत्राशी फारसे संबंध जुळले नाहीत. प्रख्यात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे जगजीतसिंह यांचे समकालीन. मात्र, दोघांच्या गायकीत आणि गझलांमध्ये खूप फरक होता. गुलाम अली यांच्या गझलांचा आशय वेदनेशी निगडीत असला तरी त्यांचा मूड खेळकर असे. जगजीतसिंह यांची गझल नेहमी धीरगंभीरच असायची.
जगजीतसिंह यांनी गझल गायनात मोठा दबदबा निर्माण केला होता. हिंदी चित्रपटात त्यांनी गायिलेल्या गझला खूपच गाजल्या. मराठीत मात्र त्यांनी कधी गायिले नव्हते. तो योगही जुळून आला होता. ‘आनंदाचे डोही’ या चित्रपटाच्यानिमित्ताने ‘तुझ्यामुळे आला नवा अर्थ जीवनाला’ हे गाणे त्यांनी गायिले. अमर हळदीपूर यांनी संगीत दिलेले हे गीत दिलीप प्रभावळकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. त्यांचे हे अखेरचे चित्रपटगीत ठरले. वयाच्या सत्तराव्या वर्षीही गाण्याची पूजा करणार्या या महान कलाकाराची जिद्द, त्यांच्यातील उल्हास आणि श्रोत्यांच्या काळजात हात घालणार्या त्यांच्या गझल प्रवासास कोटी कोटी प्रणाम!
गाजलेले अल्बम
द अनफरगेटेबल्स
बिरहा दा सुलतान
लाइव्ह इन पाकिस्तान
अ माइलस्टोन
मैं और मेरी तनहाई
द लेटेस्ट
ऐ मेरे दिल
लाइव्ह ऍट रॉयल आल्बर्ट हॉल
एक्स्टसीज
अ साउंड अफेअर
एकोज
बियॉंड टाइम
मिर्जा गालिब
गझल्स फ्रॉम फिल्मस्
इमोशन
मन जिते जगजीत
मेमोरेबल गझल्स ऑफ जगजीत अँड चित्रा
समवन समव्हेअर
होप
सजदा (लता मंगेशकर यांच्यासह)
व्हिजन्स
इन सर्च
रेअर जेम्स
फेस टू फेस
चिराग
डिझायर्स
इनसाइट
क्राय फॉर क्राय
मिराज
युनिक
कम अलाइव्ह इन ए कॉन्सर्ट सिलसिले (जावेद अख्तरसोबत)