29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

तुझे माझे जमेना

समविचारी पक्ष या नात्याने येत्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजपासोबत जाईल अशी अटकळ काही घटकांकडून व्यक्त होत आली असली, तरी प्रत्यक्षामध्ये दोन्ही पक्षांची पावले एकमेकांसोबत जाण्याच्या दिशेने नव्हे, तर विरोधातच जात असल्याचे आता पुरेपूर स्पष्ट झाले आहे. भाजप आणि मगोमध्ये दोहोंची गरज म्हणून शेवटच्या क्षणी तडजोड होणारच नाही असे जरीस सांगता येत नसले, तरी मगोने आम आदमी पक्षाशी युतीसंदर्भात चालवलेली आणि निष्फळ ठरलेली बोलणी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांच्यात नुकतेच झडलेले वाक्‌युद्ध लक्षात घेतले, तर अशा प्रकारच्या हातमिळवणीची शक्यता सध्या तरी धूसर झाली आहे.
विरोधी पक्षांनी एकजुटीच्या दिशेने पावले टाकायला सुरू केलेली असताना भाजपने एकाकी निवडणूक लढणे हा आत्मघात ठरेल, त्यामुळे मगोसारख्या समविचारी पक्षाशी हातमिळवणी केली तर सन २०१२ ची पुनरावृत्ती करता येऊ शकते अशी भाजपमधील अनेकांची भावना आहे. पण भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला त्याची गरज वाटत नाही आणि त्यांच्यामध्ये एकहाती स्वबळावर विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास आहे हेच त्या पक्षाच्या सध्याच्या एकूण रणनीतीवरून दिसून येते आहे. अर्थात, ह्या आत्मविश्वासामागे बाबूश मोन्सेर्रात, विश्वजित राणे, मायकल लोबो अशा बाहुबली उमेदवारांकडून घाऊकपणे मतदारसंघ मिळवून दिले जातील हा विश्वास अधिक आहे. तो प्रत्यक्षात किती खरा, किती खोटा ठरतो हे निवडणुकीत दिसेलच, परंतु मगोला दूर ठेवण्याच्या निर्णयाप्रत भाजप नेतृत्व सध्या आलेले आहे ही वस्तुस्थिती ह्या घडामोडींतून स्पष्ट झाली आहे. येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी युती करणार नाही असे विधान ढवळीकर यांनी केले आहे. अर्थात, आम आदमी पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतरच ह्या भूमिकेपर्यंत ते आलेले आहेत हे उघड आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये अर्थातच गेल्यावेळचे शिवसेना, गोवा सुरक्षा मंच यांच्याशी मगोची हातमिळवणी होऊ शकते. गोवा फॉरवर्ड जरी मगोसमवेत सरकारमध्ये होता, तरी दोन्ही पक्ष परस्पर विरोधी विचारधारांचे आहेत आणि दोन्हींच्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेता ते एकत्र येणे कठीण आहे. परंतु ‘महाराष्ट्रवादी’ गोमंतक पक्ष यावेळी ‘गोंय, गोंयकार, गोंयकारपण’ची भाषा बोलू लागलेला असल्याने त्या आधारावर आणि भाजपने सरकारमधून दोघांचीही हकालपट्टी केलेली असल्याने समदुःखी म्हणून हे पक्ष एकत्र येण्याचा विचार करू शकतात.
मगो खरे तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. आपले बारा उमेदवार निश्‍चित झालेले आहेत आणि आपण एकूण २४ जागा लढवणार आहोत असे ढवळीकर म्हणत आहेत. विविध मतदारसंघांमध्ये या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्यता दिसत असल्याने अशा ‘संभाव्य’ उमेदवारांना आपल्या निवडणूक चिन्हावर रिंगणात उतरविण्यास मगो उत्सुक आहे आणि त्यांची मगोला प्रतीक्षा आहे हे यावरून स्पष्ट होते. कोणताही राजकीय पक्ष टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठी सत्ता अत्यावश्यक ठरते. त्यामुळे सत्तेत सामील होण्यासाठी दावेदार बनायचे असेल तर त्यांना आपले संख्याबळ कसेही करून वाढवावे लागणार आहे आणि मगो पक्षाचे अस्तित्व ढवळीकर बंधूंच्या पलीकडे आहे हेही यावेळी सिद्ध करावे लागणार आहे.
भाजप आणि मगोचे नाते खरे तर ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशाच स्वरूपाचे राहिली आहे. भाजपची राज्यातील आजवरची प्रगती ही खरे तर मगोचा चुराडा करूनच झालेली आहे. मगोने २०१२ साली भाजपशी युती करून सत्ता उपभोगली आणि निवडणूक जवळ येताच कुरबुरी सुरू करीत शेवटच्या क्षणी विरोधात उडी घेतली. पण २०१७ च्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपचे सरकार घडताना दिसताच पुन्हा सत्तेत उडी घेण्यासही कमी केले नाही. पुढे उपद्रव सुरू होताच भाजपाने सरकारमधून हकालपट्टी तर केलीच, परंतु आमदार पळवून जन्माचा धडाही शिकविला. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वार्थी’ हे विशेषण वापरून मगो नेतृत्वाला पुन्हा एकवार फटकारले आहे. परंतु ह्या ‘स्वार्थी’ मंडळींना उद्या भाजप सरकार स्थापनेसाठी संख्येची गरज भासली तर पुन्हा सत्तेत घेणार नाही कशावरून? पुन्हा साबांखा आणि वाहतूक खात्यासारखी अर्थपूर्ण खाती बहाल करणार नाही कशावरून? पक्षासाठी कार्यकर्ते भांडतात, एकमेकांच्या उरावर बसतात, परंतु राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो आणि सत्तेसाठी वाट्टेल तशा तडजोडी करता येतात हेच शेवटी खरे असते.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION