तुकाराम मुंढेंपासून शिका

0
18

समाजातील गैरगोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी कायदेकानून असतात, परंतु बहुतेक वेळा ते कागदोपत्रीच राहतात. मात्र, एखादा खमका प्रशासक ह्याच कायद्यांचा आणि नियमांचा वापर करून गैरगोष्टींवर बडगा उगारू शकतो. आज तुकाराम मुंढे यांच्या रूपाने महाराष्ट्रात एक ‘सिंघम’ प्रकटला आहे ज्यांनी अन्न व औषध प्रशासनाचा ताबा गेल्या मे महिन्यात आपल्याकडे आल्यापासून राज्यातील खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल, क्लबमधील अस्वच्छता आणि भेसळ ह्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी दुधासारख्या जीवनावश्यक गोष्टीतील रासायनिक भेसळ पकडून दाखवली. मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्यापासून प्रेरणा घेऊन इतर राज्यांतील अन्न व औषध प्रशासन विभागही जागे झाले आहेत. त्यांनीही भेसळयुक्त दूध, पनीर आणि इतर गोष्टींविरुद्ध, तसेच खाद्यपदार्थ निर्मितीतील अस्वच्छतेविरुद्ध कारवाई चालवली आहे. गोव्यातील अन्न व औषध प्रशासन विभागानेही तीनशेहून अधिक ठिकाणांची तपासणी करून 29 लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली गेली आहे. परंतु ही कारवाई अधिक व्यापक स्वरूपात आणि पारदर्शकरीत्या होणे जरूरी आहे, कारण अशा प्रकारची अस्वच्छता आणि भेसळ हा थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ असतो. गोव्याच्या सीमेवर खानापूरमध्ये काही काळापूर्वी रसायने मिश्रित दूध पकडले गेले होते. परंतु गोव्यात येणाऱ्या दुधाच्या शुद्धाशुद्धतेची तपासणी झाल्याचे कधी ऐकिवात नाही. गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिनसारख्या अक्षरशः मानवी मृतदेहाच्या जतनासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी रसायनामध्ये साठवली जात असे हे सप्रमाण उघडकीस आले, परंतु तेवढ्यापुरती कारवाई झाली, पण कोणीही आजतागायत गजांआड गेलेले नाही. सणासुदीच्या दिवसांत मिठाईच्या दुकानांवर छापेमारीचा देखावा होतो, केळी आणि आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर झाल्याचे कधी दृष्टीस पडते, परंतु ह्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाल्याचे ऐकायला मिळत नाही. त्यामुळे ह्यासंदर्भात सरकारने अधिक गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण आज गोव्यामध्ये कर्करोगाचे जे प्रचंड प्रमाण दिसते, त्यामागे सरळसरळ ही भेसळ आणि रसायनांचा वापर कारणीभूत आहे असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मिठाई असो, दूध, पनीर असो, फळे असोत, मासळी असो, प्रत्येक ठिकाणी आज भेसळीचा विळखा पडलेला दिसतो. गोव्यात लाखो पर्यटक येतात व जाताना गोव्याची आठवण म्हणून काजू घेऊन जातात. हा तथाकथित ‘काजू’ टनांवारी येतो कुठून? त्याची गुणवत्ता काय हे कोणी तपासायचे? सणासुदीला येणारा खवा, मावा निकृष्ट दर्जाचे असल्याचे दरवेळी आढळते, तरीही ही मिठाईची दुकाने बिनदिक्कत चालू राहतात ती कशामुळे? मुंढे यांनी महाराष्ट्रातील बड्या बड्या पंचतारांकित हॉटेल आणि क्लबांच्या स्वयंपाकघरांतील अस्वच्छतेचे बिंग फोडले. इतर राज्यांमध्ये देखील मग तशा प्रकारची कारवाई झाली तेव्हा तेच आढळले. गोव्यात तर रस्तोरस्ती कॅफे आणि फूड जॉईंटस्‌‍चा सुकाळ झाला आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणामध्ये अन्नपदार्थ बनवले आणि विकले जात आहेत. तेलाचा पुन्हा पुन्हा होणारा वापर कर्करोगास कारण ठरतो हे वैद्यकीय वास्तव असूनही रस्तोरस्ती तेलाचे घाणे अहोरात्र सुरू असतात. गोव्यात अळंब्यांसारखी उगवलेली हॉटेले आणि फूड जॉईंटस्‌‍ची झाडाझडती होणे आवश्यक आहे. आजकाल कोणीही उठते आणि खाद्यपदार्थ विकायला रस्त्यात बसते. सध्या बॉम्बोलिनो नावाच्या इटालियन डोनटची अचानक हवा केली गेली आहे. कोणीही उठून रस्त्यात बिनदिक्कत ते विकायला बसलेले दिसते. त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाचे परवाने आहेत काय? गोव्यातील दुकानांमध्ये सर्रास विकायला ठेवले जाणारे खाद्यपदार्थ हे कोणी, कुठे, कशा प्रकारच्या अस्वच्छ वातावरणात बनवलेले आहेत, त्यासाठी काय वापरले आहे त्याचा कोणताही आगापिछा नसतो. अनेकदा त्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव व पत्ताही नसतो. तरीही हे पदार्थ कसे काय विकले जाऊ शकतात? अन्न व औषध प्रशासनाने अधिक व्यापक कारवाई करणे आवश्यक आहे आणि ती केवळ ठराविक काळापुरती आणि तुकाराम मुंढेंच्या प्रभावामुळे होऊ नये. कारवाई जनतेच्या हिताच्या कळकळीने व्हावी. भेसळ आणि अस्वच्छता याविरुद्ध केवळ छापेमारी पुरेशी नाही. संबंधित गुन्हेगारांना जबर दंड व तुरुंगवासाची शिक्षा देता आली तरच अशा कारवाईला अर्थ राहील. त्यात काही अडचणी असतील तर त्याही दूर केल्या गेल्या पाहिजेत. अन्न व औषध प्रशासन विभाग सरकारने अधिक कार्यक्षम केला पाहिजे. गुन्हेगारांवरील कायदेशीर कारवाईत काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. जनतेच्या आरोग्याशी मांडला गेलेला खेळ रोखण्यासाठी सरकारने आत पुढे व्हावेच.