‘ती’ उर्वरित आठ घरेही पाडली

0
120

बायणा समुद्रकिनार्‍यावरील ‘त्या’ आठ बेकायदेशीर घरांवर काल (सोमवार दि. २१) कारवाई करण्यात आली.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वारंवार होणारी वाढ व खराब वातावरणामुळे धोकादायक ठरलेल्या बायणा समुद्र किनार्‍यावरील ७५ बेकायदेशीर घरांना धोका निर्माण झाला होता त्यानुसार गेल्या आठवड्यात शुक्रवार (दि. ११) रोजी सदर घरे खाली करून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली होती. दरम्यान, कारवाई करतेवेळी यमनव्वा मदार या नामक व्यक्तीने व इतर जणांनी हायकोर्टाचा स्थगितीचा आदेश दाखवल्यामुळे कारवाई बंद करण्यात आली होती. यामुळे ८ घरे जमीनदोस्त होता होता वाचली होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गुरुवारी या स्थगितीचा आदेश हायकोर्टाने फेटाळून लावल्याने उर्वरित ८ घरांवर कारवाई करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार काल सकाळी ८ वाजल्यापासून सदर कारवाई सुरू करून उर्वरित ८ घरे जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. तसेच मातीचा भराव हटावण्याचे काम पालिकेच्या कर्मचार्‍यांना घेऊन युद्धपातळीवर करण्यात आले. कारवाई दरम्यान, २०० पोलिसांचा फौजफाटका तैनात करण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, मामलतदार लक्ष्मीकांत देसाई, पोलीस उपअधीक्षक लोरेन्स डिसोझा, पोलीस निरीक्षक राजू राऊत देसाई, कुडचड्याचे निरीक्षक रविंद्र देसाई, वेर्णाचे निरीक्षक विश्‍वेस कर्पे, निरीक्षक वास्कोचे सागर एकोस्कर, मुरगावचे निरीक्षक संतोष देसाई, वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर, संयुक्त मामलेदार विनोद दलाल, मुरगावचे मुख्याधिकारी मेघनाथ परब, पालिका अभियंते विष्णू नाईक, उपजिल्हाधिकारी काणकोण सुधीर नाईक, लक्ष्मीकांत कुर्तीकर, संयुक्त मामलेदार केपे उपजिल्हाधिकारी सालसेत संगीता नाईक व इतर अधिकार्‍यांचा फौजफाटा यावेळी हजर होता. मुरगाव मधील उपजिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालानुसार वादळी हवामान व खवळलेला समुद्र तसेच समुद्री पाण्याची वाढलेली पातळी यामुळे सदर घरांना धोका निर्माण झाला होता. त्यानुसार येथील समुद्रकिनारी असलेली घरे लवकरात लवकर खाली करण्याचा आदेश दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी वेनेंसियू फुर्तादो यांनी दिला होता. दरम्यान, गेल्याच आठवड्यात काटेबायणा येथील एका घराला समुद्राच्या तडाख्याने पाण्याच्या विळख्यात ओढून गिळंकृत केले होते. तसेच एक क्रॉस व काही माडपण भुईसपाट झाले होते. त्याला आठवडा होतो न होतो काल आणखी एक घर समुद्राच्या विळख्यात सापडल्याचे दिसले.