Home बातम्या तीळगूळ घ्या अन् नेहमीच गोड बोला!

तीळगूळ घ्या अन् नेहमीच गोड बोला!

0

सौ. लक्ष्मी नारायण जोग

जानेवारी महिना लागला की सर्वांना सर्वात आधी वेध लागतात ते संक्रांतीचे! बहुतेक वेळा संक्रांत १४ जानेवारीलाच येते. पण क्वचित ती १५ जानेवारीलाही येते. यंदा तशीच ती आली आहे. असं सांगतात की, या दिवसापासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्री लहान होत जातात. शेवटी रथसप्तमीच्या दिवशी दिवस व रात्र सारखे होतात. पुढे दिवस मोठा मोठा होतच जातो. उन्हाळा वाढतो. थंडीचे दिवस मार्गशीर्ष म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून सुरू होतात. कडाक्याच्या थंडीत गोठल्यासारखे होते, तर सुखद थंडीत मन उत्साहित व आनंदीत होते. फळझाडांना मोहोर येऊन पुढे त्यांना फळांचा बहर येणार आहे हे सूचित होते. फुलझाडांना मात्र जास्त थंडी असली की कळ्या कमी येतात. आपल्यात संक्रांतीच्या काळाला ‘पर्वकाळ’ मानतात. म्हणजेच पवित्र काळ! भाविक लोक, साधुसंत मंगलस्नानासाठी पवित्र नद्यांच्या सान्निध्यात जातात व मंगलस्नान करतात. प्रयागसारख्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तिथल्या पवित्र भूमीला साधुसंतांचा पदस्पर्श होतो.

संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. या दिवशी स्त्रिया डोक्यावरून, उटणे वगैरे लावून स्नान करतात. गरम-गरम तीळ घालून केलेली भाकरी, मुगाच्या डाळीची वाफाळती खिचडी व वर साजूक तुपाची धार असा बेत जेवणाला करतात. संक्रांतीच्या दिवशी न्हाऊनमाखून सुघट पूजेची तयारी चालते. सूर्यामुळेच सर्व जीवसृष्टी चालते, म्हणून त्याचे प्रतीक म्हणून मातीच्या सुघटाची पूजा व नंतर त्याचे दान द्यायचे असते. सूर्याविषयी अतीव आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे करायचे असे जाणत्या मंडळींनी सांगून ठेवले आहे. पूजा करण्याआधी त्या घटात दक्षिणेबरोबरच, हळदीकुंकू व त्या काळात पिकणारी धान्ये-कडधान्ये, उसाचा तुकडा आणि तीळगूळ घालण्याचा प्रघात आहे. या दिवशी दुपारच्या जेवणात गुळाची पोळी करतात. संक्रांतीचा सण स्निग्धता म्हणजेच स्नेह व गोडवा-माधुर्य यांचे प्रतीक आहे. शरीरात थंडीमुळे उष्णता कमी झालेली असते, त्यासाठी तिळांचा उपयोग. ती वाढवण्यासाठी म्हणून तीळगूळ व गुळाची पोळी आहारात वापरायची योजना!

किती अभ्यास केला होता आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी सगळ्याबद्दल! नवीन लग्न झालेल्या मुली अनेक प्रकारची सौभाग्य-वायने संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनींना बोलावून त्यांना अर्पण करतात. सर्वच स्त्रिया हळदीकुंकू देण्या-घेण्यासाठी एकमेकींना आमंत्रित करतात. लहान मुलांना, म्हणजे नुकत्याच वर्ष होणार असलेल्या मुलांना बोरन्हाण घालतात. अशा मुलांना तसेच नवदांपत्याला हलव्याचे निरनिराळ्या प्रकारचे सुंदर दागिने करतात. त्यांना काळे वस्त्र (स्त्रियांना काळी साडी व मुलांना झबले) परिधान करतात. सासर-माहेरचे लोक भेटवस्तूंची देवाण-घेवाण करतात. या सगळ्यामुळे समाजात एकप्रकारची सात्त्विकता व सौहार्दभाव भरून राहतो. काही लोक घरी केलेल्या हलव्याचे दाणे पोस्टाने, शुभसंदेशासह इष्टमित्रांना पाठवून आनंद व्यक्त करतात.

समाजात आपण नेहमी पाहतो की कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच वादविवाद, भांडणे, तंटे, धुसफुस, द्वेष सतत चालू असतात. मग ते नातेसंबंधात असो किंवा कुटुंबात असो. ते सगळे विसरून माणसांनी एकमेकांशी स्नेहाने-सौहार्दाने-प्रेमाने वागावे, एकमेकांना समजून घ्यावे, मदत करावी, सुख-दुःखात सामील व्हावे म्हणूनच संक्रांतीसारखे सण साजरे करायचे असतात.

संक्रांतीला तीळगूळ देताना आपण ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणतो. पण हे नुसते सांगणे-म्हणणे असू नये. तसेच प्रत्यक्षात आपण वागावे. त्याचबरोबर ते ‘त्या’ एका दिवसापुरते नसावे. सदासाठी असावे. संक्रांतीच्या निमित्ताने त्याची प्रत्येकाला आठवण व्हावी हा हेतू आहे. व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत व कुटुंबापासून समाजापर्यंत ‘भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे’ असे वागावे. तसे झाले तर समाजातील बंधुभाव, प्रेम, मानवता वाढेल व हेवेदावे, भांडणे, द्वेष, मत्सर नक्कीच कमी होतील. असा सर्वगामी विचार करूनच पूर्वीच्या विचारवंतांनी, समाजअभ्यासकांनी सणांची योजना केली असावी.

नात्यागोत्यांच्या अनेक पदरांत स्त्रियाच जास्त गुरफटलेल्या असतात. अनेक प्रकारच्या स्वभावांच्या माणसांशी त्यांना जमवून घ्यावे लागते. सासर-माहेर, सगे-सोयरे, शेजारीपाजारी, आप्त-इष्ट या सगळ्यांशी असलेली नाती त्यांना निभावून न्यायची असतात. त्यांना न्याय द्यायचा असतो. ही कसरत करताना जिभेवरील गोडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादासुद्धा कटू शब्द नाते संपवायला कारणीभूत होऊ शकतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने गोड, मृदू, मधुर बोलण्याचा वसा घ्यावा. मी पाहिल्या आहेत की काही आया आपल्या मुलांशी इतक्या सौम्य व गोड बोलतात की ते ऐकून बरे वाटते. अंतरात्मा संतुष्ट होतो. ‘राजा, सोन्या’ अशा हाका मारून खूप समजूतदारपणे बोलतात. उलट काहीजणी जन्माचे वैर असल्यासारख्या खेकसत बोलतात. त्या असं का वागतात समजायला मार्ग नाही. पण ते पाहून ऐकणार्‍याला वाटते की स्वतःच्या मुलांशी या अशा बोलतात तर इतरांशी कशा बरे बोलतील? गोड शब्दांचे महत्त्व न जाणल्यामुळेच त्या तशा वागतात हे उघड आहे. म्हणूनच सर्वांनीच संक्रांतीचा योग साधून नेहमी गोड बोलण्याचा वसा घ्यावा. त्यामुळे त्या आपली मुले, कुटुंब संतुष्ट ठेवू शकतातच, शिवाय समाजातही त्यांना सन्मानाचे स्थान मिळते. हा स्वानुभव आहे. पण तसे होणे कठीण. कारण बर्‍याच जणींना वाटते की गोड बोलणे म्हणजे शामळूपणा, गोड बोलणे म्हणजे हार पत्करणे, कमीपणा घेणे. असा विपरीत अर्थ घेऊन त्या स्वतः तर सुखी होत नाहीतच, पण इतरांनाही दुःखी करतात, ही वस्तुस्थिती आहे.

माझ्या लहानपणी ग्रहण लागणे याचा विपरीत अर्थ आम्हा मुलांना सांगितला जायचा. तो असा की, राहू-केतू हे दुष्ट ग्रह सूर्य-चंद्राला ग्रासायला येतात. त्यामुळे ते थरथर कापतात. म्हणून या काळात सुतक आल्याप्रमाणे माणसाने राहावे. घरात कुठे शिवू नये. ग्रहण संपताच आंघोळ करावी. कपडे-अन्न दान करावे. घरात शेणसडा घालावा वगैरे वगैरे… आम्हाला त्यावेळी ते सगळे खरेच वाटायचे. भीती वाटायची. पण आता समजते की तो फक्त सावल्यांचा खेळ आहे. त्यामुळे हवामान दूषित होते म्हणून त्याकाळात खाऊ-पिऊ नये. संक्रांतीच्या संदर्भात असेच गैरसमज दोन वर्षांपूर्वी पसरवले होते. भोळ्या स्त्रिया बिचार्‍या ते खरे मानून भावांच्या दीर्घायुष्यासाठी वस्त्रे घेऊन माहेरी धाव घेत होत्या.

धार्मिकदृष्ट्या संक्रांतीचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. त्या दिवशी दान केलेले पुण्यप्रद असते. असे असले तरी ते नाही केले तर कुणाचे वाईट होईल असे सांगितलेले नाही. एकमेकींना निरर्थक भेटवस्तू देण्यापेक्षा भेटून हितगूज करणे महत्त्वाचे. पूर्वीची वाणे देण्याची बाब आज प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यात अहमहमिका, स्पर्धा होते आहे. मग त्यात तुलना, भेदभाव आलाच. कमी लेखणे आले. श्रीमंती मिरवणे आले. तुच्छता आली. म्हणजे मूळ हेतू बाजूला राहून समाजात द्वेष, धुसफुस, तेढ, मानखंडना वाढली. समाजातील सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे हा समन्वयाचा हेतू कुठे राहिला यात? हळदीकुंकूच्या निमित्ताने सौहार्दतेचे वाण प्रत्येकीने द्यावे. सद्भावनांनी ओटी भरावी. प्रेमाने हळदीकुंकू लावावे. एकमेकींना समजून घ्यावे. नाहीतर इथून आपण याशिवाय काय घेऊन जाणार आहोत वस्तुरूपाने? आपल्याकडील सर्व सणांना धार्मिक तसाच शास्त्रीय आधार आहे. संक्रांत हा सणसुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवूनच योजलेला आहे. शिवाय त्याला धार्मिक-आध्यात्मिक महत्त्वही आहेच. प्रत्येक सणातून आपल्याला काही ना काही संदेश मिळतो तसा तो या सणातूनही मिळतो. संक्रांत म्हणजे संक्रमण- परिवर्तन! सूर्य मकर राशीतून उत्तरायणात प्रवेश करतो, त्यामुळे त्याच्या कक्षेत येणार्‍या प्रदेशातील हवामानावर त्याचा परिणाम होतो. संक्रांतीनंतर थंडी कमी होऊ लागते.

हल्लीचे जीवन खूपच गतिमान झाले आहे. जो तो पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यांच्या मागे वेड्यासारखा धावत आहे. त्या मस्तीत माणूस माणसाला ओळखेनासा झाला आहे. दिखाऊपणा, ऐषआराम, स्वतःपुरते पाहाणे यालाच तो महत्त्व देतो आहे. पण आपली भारतीय संस्कृती त्याग, सद्भाव, परोपकार, साधी राहणी उच्च विचारसरणी यांच्या पायावर आधारलेली आहे. म्हणून अखिल विश्‍वात तिचा सुवर्णकलश तेजाने झळाळतो आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

आमच्या विद्यार्थिदशेत आम्ही संक्रांतीची फारच आतुरतेने वाट वाहत असू. कारण त्या दिवशी आम्हाला प्रत्येक शिक्षकाच्या घरी तीळगूळ द्यायला व घ्यायला मिळायचे. आपल्या गुरुजनांबद्दल मनात अत्यंत आदर व त्यांच्या घराविषयी उत्सुकता असे. तीळगूळ घेऊन झाल्यावर शिक्षक-शिक्षिका आमची आस्थेने विचारपूस करत. आम्ही त्यांना तीळगूळ देऊन नमस्कार करायचो. हे सगळे करताना अतिशय आनंद व्हायचा. त्यांची कौतुकभरी दृष्टी आमची ओवाळणी करायची. या सगळ्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आपुलकीची भावना निर्माण व्हायची. दर संक्रांतीला अजूनही मला हे सगळे आठवून आमच्या शिक्षकांबद्दलचा आदर दुणावतो.

हिंदू संस्कृतीत दानाला, म्हणजे दुसर्‍याला काही देण्याला खूप महत्त्व आहे. पूर्वी आईने सुघटपूजा केल्यानंतर मुलींनाही छोट्या मातीच्या चिटक्या (बुडकुल्या), त्यात हरभरे, उसाचे तुकडे, धान्ये घालून शेजारी जाऊन मैत्रिणींना द्यायला लावायची. आम्हीसुद्धा खणाचे परकर-पोलके घालून त्या देण्यासाठी गटागटाने शेजारी जायचो. त्यावेळी एक खूप चांगली कृती केल्यासारखे वाटे. माणसाने सदासर्वकाळ आनंदात राहावे यासाठीच आपल्या पूर्वजांनी सणांची तरतूद केली आहे. सण साजरे करताना माणसाला आपल्या दुःखाचा, समस्यांचा विसर पडतो. संक्रांतीच्या सणात आपण अनेक प्रकारांनी आनंद साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांना गोड बोलण्याचे आश्‍वासन देतो व घेतो. कोणी दान करतात, कोणी हळदीकुंकूत विविध वस्तू लुटतात. त्या निमित्ताने नव्या वस्तू, जिन्नस, वस्त्रे खरेदी करतात. या सगळ्यातून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. सण नसते तर जीवन नीरस झाले असते. चला तर! आपण संक्रांतीसारखाच प्रत्येक सण मनापासून साजरा करूया! आनंद लुटूया! इतरांना न दुखवण्याचा वसा घेऊया!

तिळातिळाने स्नेह वाढतो, वाणीने गोडी|

मृदू बोलणे सौम्य वागणे, कठोरता सोडी॥

सद्भावाचे हळदी-कुंकू द्यावे नि घ्यावे|

सहृदयतेने ओटी भरुनी अभीष्ट चिंतावे॥

वस्तू देणे-घेणे जगती फोल असे जाणा|

सदिच्छांची ओंजळ भरुनी देतो तो शहाणा॥