अनमोड घाटात ट्रक उलटून चालक ठार
धारबांदोड्यात दुचाकी अपघातात एकाचे निधन
काल रविवारी राज्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील दोन घटना धारबांदोडा तालुक्यात तर एक घटना बार्देश तालुक्यातील कळंगुट येथे घडली. धारबांदोड्यातील घटनेत एक युवकही जखमी झाला आहे. धारबांदोडा तालुक्यात शनिवारी कुळे येथे 4 युवकांचा बुडून मृत्यू तर रविवारी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात दोन दिवसांत 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कळंगुटमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा काल रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अनमोड घाटात अपघात,
ट्रकचालकाचा मृत्यू
अनमोड घाटात ट्रक दरीत कोसळून सुदीप कापोझ (पश्चिम- बंगाल) या ट्रकचालकाचा मृत्यू झाला. कुळे पोलीस हद्दीतील अनमोड घाटात शनिवारी रात्री वाळू वाहू ट्रक दरीत कोसळून सुदीप कापोझ या चालकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांमुळे अपघाताचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाळूत गाडलेल्या चालकाचा शोध लागला.
रविवारी सकाळी कुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी अनमोड घाटात गस्त घालण्यासाठी गेले होते. यात कुळे पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप गावस, हवालदार दिनेश सातपालकर आणी तुळशीदास गावकर, चालक रामा दमेकर व गृहरक्षक बारकेलो गावकर यांचा समावेश होता. घाटात ट्रक कोसळल्याचे दिसल्याने पोलिसांनी दरीत उतरून तपासणी केली. पण ट्रकचालक परिसरात आढळला नाही. सर्व परिसरात वाळू पसरलेली होती. तीत पोलिसांना एक लाल कपडा दिसून आला. त्याची तपासणी केली असता त्यात एक व्यक्ती दिसून आली. पोलिसांनी त्वरित फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला
आहे.
धारबांदोड्यात एकाचा मृत्यू
धारबांदोडा येथे दोन मोटरसायकलमध्ये समोरासमोर धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात विजय चव्हाण (69, पणसुले-धारबांदोडा) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालक निखिल नाईक (डोंगरी) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. धारबांदोडा येथील चैतन्य पेट्रोल पंपसमोरील राष्ट्रीय महामार्गावर काल रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास स्कुटर व दुचाकी यांच्यामध्ये हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या विजय चव्हाण यांना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालक निखिल नाईक हा गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 12 बी 1049 ही स्कूटर घेऊन विजय चव्हाण हे धारबांदोडा येथे दूध खरेदी करण्यासाठी गेले होते. दूध घेऊन माघारी जात असताना त्यांनी पेट्रोल घालण्यासाठी स्कूटर उजव्या बाजूने वळविली. त्यावेळी समोरून येणाऱ्या जीए 07 एएम 1472 या दुचाकीची धडक स्बसली. यात दोघेही चालक रस्त्यावर कोसळून जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून पिळये प्रथनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या विजय चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अंजली धुळापकर, आशिष वेळीप, सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोमकर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.

