तीन महिन्यांपेक्षा जास्त का निवडणुका लांबणीवर नकोत

0
19

>> विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची भूमिका

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्यास विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना अनुकूलता दर्शविली आहे. सोबतच ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडता कामा नये, अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. तीन महिन्यात ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक अहवाल तयार करून ओबीसी आरक्षण जाहीर झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने पावसाळा आणि ओबीसी आरक्षण रखडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राज्यातील पंचायत निवडणुका तीन महिन्यापेक्षा जास्त काळ लांबणीवर पडता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट अहवाल लवकर तयार करून राज्य निवडणूक आयोगाला सादर झाला पाहिजे. ओबीसी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी ट्रिपल टेस्ट अहवालाची नितांत गरज आहे. पंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू न झाल्याने तीन महिने पुढे ढकलली जाऊ शकते, असेही लोबो म्हणाले.

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने १८ जूनला पंचायत निवडणूक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, सरकारने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. तसेच सरकारने निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याची शिफारस आयोगाकडे केली आहे.