तिस्क वेली-उसगाव येथे रविवारी नवीन वीज खांब घालण्याचे काम सुरू असताना वीज खांब कोसळून खेमलाल (36) या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवारी सकाळपासून परिसरात नवीन वीज खांब घालण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी रस्त्यापासून दूर असलेल्या ठिकाणी एक वीज खांब घालण्यात येत होता. त्याठिकाणी क्रेन नेण्यासाठी मिळत नसल्याने अनेक कामगार एकत्रितपणे वीज खांब घालत होते. यावेळी वीज खांब घसरून कामगाराच्या डोक्यावर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.

