तिसऱ्या टप्प्यात 61.45 टक्के मतदान

0
2

काल तिसऱ्या टप्प्यात 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांसाठी मतदान संपन्न झाले. या टप्प्यात गोवा (2) आणि गुजरातमधील (25) सर्व जागांवर मतदान झाले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयातील केंद्रात मतदान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये सर्वाधिक 75.26 टक्के मतदानाची नोंद झाली. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर गोव्यात 75.20 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे 54.77 टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये 56.55 टक्के, छत्तीसगडमध्ये 66.99 टक्के, दादरा व नगर हवेली आणि दमण-दीवमध्ये 65.23 टक्के, गुजरातमध्ये 56.76 टक्के, कर्नाटकमध्ये 67.76 टक्के, मध्यप्रदेशात 63.09 टक्के, उत्तरप्रदेशात 57.34 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 73.93 टक्के मतदान झाले.

बिहारमध्ये मतदानादरम्यान पीठासीन अधिकारी आणि होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये मतदानासाठी येत असताना एका वृद्ध मतदाराचा मृत्यू झाला. त्याच वेळी, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादचे भाजप उमेदवार आणि टीएमसी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला.
यापूर्वी 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 102 आणि 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांचा समावेश केल्यास काल 283 जागांवर मतदान पूर्ण झाले.