तिसऱ्या टप्प्यातील खाणींचा ई-लिलाव लवकरच ः मुख्यमंत्री

0
4

राज्यातील खाण पट्ट्याच्या तिसऱ्या टप्प्यातील ई लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण खात्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील नऊ खाण पट्ट्यांचा दोन टप्प्यांत लिलाव करण्यात आला आहे. आता, तिसऱ्या टप्प्यात खाण पट्ट्याचा लिलाव केला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात लिलावातील खाण पट्ट्यांची संख्या अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. खाण खात्याने खनिजाची 28 वी ई लिलाव प्रक्रिया पूर्ण केली आहे. खनिज डंप धोरण अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील चिरे खाणींना पर्यावरण दाखला दिल्यास कायदेशीर चिरे खाणी सुरू होण्यास मदत होणार आहे. चिरे खाणी आणि रेती उपशासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
म्हादई प्रवाह प्राधिकरणाला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यावर विचार विनिमय करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.