तिळारी धरणाच्या डाव्या कालव्याच्या गेटच्या दुरुस्तीसाठी गोव्याचा पाणीपुरवठा बंद केला गेला होता. त्यानंतर ही गेट दुरुस्तही केली गेली. परंतु तिची गळती सुरूच आहे. हे पाणी आंदोलनस्थळी पोहोचू नये म्हणून वाळूच्या पिशव्यांचा बांध घातला गेला होता. मात्र, सततच्या गळतीमुळे हा बांध फुटून पाणी काल आंदोलकांपर्यंत पोहोचले. शेवटी आंदोलकांनी पुन्हा अडथळे उभारून हे पाणी रोखले.
दरम्यान, गेले वीस दिवस सुरू असलेल्या या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नसल्याने जोवर १२५४ बाधित कुटुंबाना न्याय मिळत नाही तोवर कालव्यातून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मात्र, त्यामुळे कालव्यातील पाणी रोखले गेल्याने गोव्याप्रमाणेच दोडामार्ग तालुक्यातील शेतीचेही नुकसान झाले आहे. साटेली, भेडशी, कुडासे, मणेरी, सासोली, दोडामार्ग आदी परिसरातील हजारो काजू, केळी, सुपारी, माडांना फटका बसला आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने बागायती धोक्यात आल्या आहेत.

