तिळारीप्रश्‍नी उभय राज्यांनी तोडगा काढावा : खलप

0
48

खानयाळे येथील फुटलेल्या कालव्याची पाहणी केल्यानंतर खलप पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संजय नाईक उपस्थित होते. ऍड. खलप पुढे म्हणाले, तिळारी प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकांची जवळीक वाढली आहे. हा प्रकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.

त्यामुळे कालवा फुटल्याने दोन्ही राज्यांनी एकमेकांवर बोट न दाखविता त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. निकृष्ट कामांची तपासणी तर झालीच पाहिजे. त्याचबरोबर असे प्रकार भविष्यात निर्माण होवू नयेत यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्रित बैठक घेवून त्यावर तोडगा काढला पाहिजे. तसेच अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात आणि उपाययोजनेबाबत दोन्ही राज्यांनी एक संयुक्त समिती नेमली पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ एकादा निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला असेल असे श्री. खलप म्हणाले. कालवा फुटल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी दोन्ही राज्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी कालवे कोसळण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी तत्काळ दुरुस्ती हाती घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण लवकरच दोन्ही राज्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ऍड. खलप यांनी सांगितले.