तिळगूळ घ्या, गोड- गोड बोला…

0
20
  • – अंजली आमोणकर

कर संक्रांतीचा थेट संबंध शेतांमधून पिकलेल्या नव्या पिकांशी आहे. स्नान- दान व पतंग या तीन महत्त्वाच्या गोष्टींभोवती या सणाची गुंफण आहे. या दिवशी मुख्यतः गंगास्नानाचे महत्त्व अबाधित आहे. त्यानंतर येते दान. गूळ- तीळ- गरम वस्त्र, तूप, पोहे वगैरेचे दान या काळात शुभ मानतात.

हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक ‘मकर- संक्रांत’ आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर- संक्रांतीचा उत्सव साजरा होतो. खूप प्रांतात या सणाला ‘उत्तरायणी’ हे नावही आहे. पण ते बरोबर नाही कारण ‘उत्तरायण’ संक्रांतीच्या पाच-सहा दिवसानंतर सुरू होते. संपूर्ण भारतातच नव्हे तर थायलँड, कंबोडिया व नेपाळमध्येदेखील हा सण साजरा केला जातो.

वेगवेगळ्या ठिकाणी या सणाला वेगवेगळी नावे आहेत. हरयाणा, हिमाचल प्रदेश व पंजाबात तो ‘लोहडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. आसाममध्ये त्याला भोगाली बिहू, उत्तर प्रदेश व पश्‍चिम बिहारात त्याला खिचडी, कर्नाटकात ‘मकर संक्रमण’, थाईलँडमध्ये सोंगकरन, म्यॅनमारमध्ये थियांन म्हणून ओळखला जातो. ह्या सणाचा थेट संबंध शेतांमधून पिकलेल्या नव्या पिकांशी आहे. स्नान- दान व पतंग या तीन महत्त्वाच्या गोष्टींभोवती या सणाची गुंफण आहे. या दिवशी मुख्यतः गंगास्नानाचे महत्त्व अबाधित आहे. पण सर्वांनाच ते शक्य नसल्याने शक्य होईल त्या जवळपासच्या तीर्थस्थानाचे पुण्य जरूर पदरात पाडून घ्यावे असे शास्त्र सांगते. त्यानंतर येते दान. गूळ- तीळ- गरम वस्त्र, तूप, पोहे वगैरेचे दान या काळात शुभ मानतात.

‘‘माघे मासे महादेवः यो दास्यति घृत कम्बलम्
स भुक्त्वा सकलान् भोगान अंते मोक्षं प्राप्ससी’’…

  • असे शास्त्रवचन आहे. म्हणजे त्या दिवशी केलेले दान हजार पटींनी वाढून परत तुमच्याचकडे येते. त्यामुळे घरासमोर येणार्‍या कोणत्याही प्रकारच्या भिकार्‍याला या दिवशी विन्मुख पाठवले जात नाही. जसं गंगास्नानाच्या बाबतीत म्हटलं जातं की ‘सारे तीरथ बार- बार गंगासागर एक बार…’ कारण गंगेला ‘गंगासंगम’मानतात. गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा संगम आपल्याला इथे बघायला मिळतो. याच गंगातीरी मकर संक्रांतीला प्रचंड मेळा भरतो. ‘खर’ मास संपून चांगले दिवस सुरू झाल्याच्या आनंदात हा मेळा असतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच गंगा, भगीरथाच्या मागे मागे येऊन कपिल मुनींच्या आश्रमाला भेट देऊन समुद्राला जाऊन मिळाली होती- असे संदर्भ आपल्याला पुराणात वाचायला मिळतात. ह्याच पुराणांमध्ये असेही संदर्भ आहेत की या दिवशी सूर्यदेव, आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीदेवाच्या घरी एका महिन्याकरिता राहायला जातात आणि मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे.

कर्क व मकरेतला सूर्यप्रवेश अत्यंत फलदायी मानला जातो. याच दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा अंत केला होता. युद्ध समाप्तीची घोषणा केली होती व हरवलेल्या असुरांना, मंदार पर्वताखाली चिणलं होतं. ह्या कारणांपायीसुद्धा सर्व वाईट कृत्यांच्या समाप्तीचा हा दिवस मानतात. त्यापायीच कदाचित सांगतात की या दिवशी ‘ही काही’ कामं करू नयेत… एक म्हणजे कोणत्याही प्रकारची नशा करू नये, दोन- कुठल्याही भिकार्‍याला विन्मुख पाठवू नये. तीन- या दिवशी झाडांची कापणी वा छाटणी करू नये. चार – ह्या दिवशी मसालेदार जेवणाच्या ऐवजी सौम्य आहार घ्यावा (मुगाची खिचडी वगैरे). पाच – हा निसर्गाचा सण आहे त्यामुळे यादिवशी शेतातल्या धान्याची कापणी करू नये व शेवटी या दिवशी जिभेवर संयम ठेवावा; मधुर वाणीने सर्वांशी बोलावे. म्हणूनच कदाचित ‘तिळगूळ घ्या, गोड- गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत पडली असावी.
वैज्ञानिक कारणांप्रमाणे या दिवशी नद्यांचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे या दिवशी तीर्थस्नान केल्याने त्वचेचे तमाम रोग दूर व्हायला मदत होते. यावेळी थंडीचा ऋतू असतो. उत्तर भारतात तर प्रचंड प्रमाणातच थंडी असते. तीळ व गूळ- हे दोन्ही पदार्थ उष्ण. त्यांचे सेवन केल्यास शरीरात उष्मा व उर्जा, दोन्ही विपुल प्रमाणात तयार होते. खिचडी अत्यंत पाचक व हलक्या आहारात गणली जाते. आलं व मटार घालून, साजूक तुपातली खिचडी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, जी थंडीच्या दिवसात नैसर्गिकरीत्या मंदावलेली असते.
शास्त्र-वचनानुसार उजेडात मृत्यू पावणारा देह परत जन्म घेत नाही. त्याला मोक्षच मिळतो. परंतु अंधारात शरीर त्यागणार्‍या देहाला जन्माच्या विळख्यातच गरगर फिरावे लागते. इथे उजेड व अंधार, उत्तरायण व दक्षिणायनचे प्रतीक आहेत. म्हणूनच महाभारतात पितामह भीष्मांनी देह त्यागण्याकरता संक्रांतीचा दिवसच निवडला. तोपर्यंत शरशय्येवरच्या मृत्युयातना त्यांनी कितीतरी दिवस सहन केल्या.

ज्योतिषशास्त्रानुसार – तिळाचं दान दिल्याने शनीचा कुप्रभाव कमी होतो. तिळांत कॉपर-मॅग्नेशिअम, आयर्न, फॉस्फरस, झिंक, व्हिटामीन-बी सर्वाधिक प्रमाणात असते. त्यामुळे सर्दी- कफ- खोकला व संधिवाताच्या दुखण्यात तीळ फायदेशीर आहेत. आयुर्वेदात कोणत्याही प्रकारचा मसाज केवळ तीळ तेलानंच केला जातो.

गोमंतकाबाहेर अनेक ठिकाणी संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आंध्रप्रदेशमध्ये (तामिळनाडू) इंद्रदेवाची पूजा करतात. इंद्रदेव हा पाऊस व वर्षाऋतूचा देव मानला जातो. त्यामुळे ह्या दिवशी इंद्रदेवाची पूजा करून अपरिमित अन्नधान्याची पैदास व्हावी- अशी मागणी केली जाते. घरादाराची स्वच्छता करून रांगोळ्या- तोरणांनी घरं सजवून या सणाची तयारी केली जाते. खास पद्धतीच्या या ठिपक्यांच्या रांगोळीला ‘कोलम्’ म्हणतात. कोलममध्ये शेणाचा गोल सारवून त्यावर भोपळ्याच्या फुलांची सजावट केली जाते. आंध्रमध्ये हा सण चार दिवसांचा असतो. भोगी पोंगल, सूर्य-पोंगल, केनु किंवा मट्टू पोंगल व कन्या पोंगल अशी चारही दिवसांची नावे असतात. उडीसा राज्यात भोगीला मकरचौला म्हणतात. या दिवशी तांदूळ, नारळ, केळी यांचा गोड भात, रसगुल्ला व ताक यांचा प्रसाद दाखवला जातो. बालासुरात मकरमुनींचे देऊळ आहे. तिथे सूर्याची पूजा होते. हिमाचल प्रदेशात त्याला साजी म्हणतात व खिचडी व ताकावर सर्व राहतात. जावई व कन्या यांचा या दिवशी खास मान असतो. महाराष्ट्रात या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत यावर ताव मारला जातो. पहिली मकर संक्रांत असणार्‍या नवविवाहित जोडप्याला गोड हलव्यापासून बनविलेल्या दागिन्यांनी सजवून त्यांचा कौतुक सोहळा केला जातो. घरातील सुवासिनी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची मनोभावे पूजा करतात. ‘सुगड’ म्हणजे छोटे मडके. त्यात नऊ प्रकारची धान्ये, उसाचे करवे, गव्हाच्या लोंब्या, बोरं, तिळगूळ असे पदार्थ भरून त्यांची हळदकुंकू, गंध, फूल, हिरव्या बांगड्यांनी पूजा केली जाते. या पूजेनंतर – रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीचा दिवस निवडून, सुवासिनी हळदी-कुंकू समारंभ आखतात व इच्छेप्रमाणे वाणं लुटतात.

गेली वर्षानुवर्षे सुरू असणार्‍या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो. सध्या नोकरदार स्त्रिया उत्साहाने ग्रुप स्थापन करून एकत्रितरीत्या हळदीकुंकवाचे समारंभ करताना दिसतात.
पतंगबाजी ही मकर संक्रांतीनिमित्त पाळली जाणारी विशेष परंपरा आहे. लखनऊ- पटना- गुजराथ वगैरे प्रांतात ह्याचे विशेष महत्त्व आहे. पटनामध्ये गांधी मैदानात खास सरकारी स्तरावर पतंगबाजीचं आयोजन केलं जातं.

तर्‍हतर्‍हेच्या रंगाचे, आकारांचे, आकृतींचे पतंग बघणार्‍याचे भान हरपवून टाकतात. उत्तर प्रदेशच्या वाराणसी (बनारस) मध्ये गंगाकिनारी अनेक तास पतंग उडवले जातात. जरी पतंगाचा आविष्कार चीनने केला असे म्हटले जाते तरी ‘रामचरितमानस’मध्ये श्रीरामांनी पतंग उडवल्याची, त्यामुळे इंद्राची सून आकर्षित होऊन रामचंद्रांच्या दर्शनास गेल्याची कथा सुप्रसिद्ध आहे. म्हणजेच पंधराव्या शतकातही भारतात पतंगबाजी होती. आजकाल पतंगावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ‘स्वच्छ भारत’ वगैरे घोषणा लिहिलेल्या आढळतात.
संक्रांतीच्या दिवशी पांढर्‍या शुभ्र चांदण्यांचं डिझाइन असलेली काळी चंद्रकळा मुद्दामहून नेसली जाते. नाहीतर हिंदूंच्या इतर कोणत्याही सणाला काळी वस्त्रं शुभ मानली जात नाहीत व नेसलीही जात नाहीत. पूर्वी घरोघरी नाजूक काटेरी हलवा घरी केला जायचा. अत्यंत जिकिरीचा व करायला खूप दिवस लागणारा हलवा झाल्यावर मात्र इतका देखणा व सुंदर दिसतो की बस. आजकाल मात्र रेडिमेड घरगुती हलवा आणण्यावर भर दिला जातो.
याच सुमारास भारतात आलेले सर्व परदेशी पाहुणे पक्षी – परतीच्या उड्डाणाचा वेध घेताना दिसतात.

हिंदूंचे सर्वच सण दरवर्षी कॅलेंडर वर्षाच्या वेगवेगळ्या तारखांना येतात. मात्र मकर संक्रांत हा एकुलता एक सण आहे जो दरवर्षी ठरलेल्या तारखेला म्हणजेच चौदा जानेवारीलाच येतो.