तिघांच्या मुदतपूर्व सुटकेलासर्वोच्च न्यायालयात आव्हान

0
9

>> राज्य सरकार आणि वडिलांकडून विशेष याचिका दाखल; प्रतिवादींना नोटीस जारी

2006 मधील मंदार सुर्लकर खून व अपहरण प्रकरण

मंदार सुर्लकर याचे अपहरण आणि खून प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या तिघांची मुदतपूर्व सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. स्व. मंदार सुर्लकर याचे वडील दीपक सुर्लकर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे. तसेच, राज्य सरकारने सुध्दा गोवा खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादी रोहन धुंगट, जोवितो रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांना नोटीस जारी केली आहे.
तसेच, दीपक सुर्लकर यांनी एका स्वतंत्र याचिकेद्वारे तिन्ही दोषींच्या मुदतपूर्व सुटकेची शिफारस करणाऱ्या गोवा राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

गोवा खंडपीठाने 6 ऑगस्ट 2026 रोजी मंदार सुर्लकर खून व अपहरण प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या रोहन धुंगट, जोवितो रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांची मुदतपूर्व सुटका करण्याचा आदेश दिला होता.
गोवा राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने त्या तिघांची मुदतपूर्व सुटका करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे तिन्ही दोषी या प्रक्रियेसाठी पात्र नव्हते; कारण त्यांनी खटला चालवणाऱ्या न्यायालयाने ठोठावलेला दंड भरलेला नव्हता, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

रोहन धुंगट, जोवितो रायन पिंटो आणि शंकर तिवारी यांच्या मुदतपूर्व सुटकेचे आदेश देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या 6 ऑगस्टच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका गोवा सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे दाखल केल्या आहेत.
पणजी येथील बाल न्यायालयाने जून 2014 मध्ये रोहन धुंगट, नफियाझ शेख, शंकर तिवारी आणि जोवितो रायन पिंटो यांना 17 वर्षीय मंदार सुर्लकर याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मार्च 2019 मध्ये, उच्च न्यायालयाने या सर्व दोषींची शिक्षा आणि दोषसिद्धी कायम ठेवली होती.