ताळगावातील रोजगार मेळाव्यावर तब्बल 2.61 कोटी रुपयांचा खर्च

0
9

राज्य सरकारने गेल्या 8 नोव्हेंबर 2022 रोजी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजित मेगा रोजगार मेळाव्यावर (जॉब फेअर) तब्बल 2.61 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाने या मेगा जॉब फेअरचे आयोजन केले होते. आरटीआय कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रीगीस यांनी माहितीचा अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत घेतलेल्या माहितीमध्ये हे उघड झाले आहे. कागदपत्रांनुसार मेसर्स सनलाईट मीडियाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 2,51,42,260 रुपये देण्यात आले आहेत. तसेच, मीडिया जाहिरातींवर 9,27,990 रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय कदंब परिवहन महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या वाहनांवर 75,754 रुपये खर्च करण्यात आले आहे.

या मेगा जॉब फेअरमध्ये किती जणांना नोकरी प्राप्त झाली यापेक्षा या जॉब फेअरवर झालेल्या कोट्यवधी रुपये खर्चाची चर्चा सुरू झाली आहे.
या भव्य रोजगार मेळाव्याच्या खर्चासाठी वित्त खात्याकडून मेळावा आयोजित करण्यापूर्वी आर्थिक मंजुरी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती उघड झाली आहे. वित्त खात्याला मेळावा आयोजित करण्यात आल्यानंतर खर्चाच्या मान्यतेसाठी फाईल सादर करण्यात आली.