कथक सम्राट तालमार्तंड पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे ते लयबद्ध पदन्यास थांबले. चाळांचा तो नाद थांबला. त्या विलोभनीय भावमुद्रा लोपल्या. मागे उरली एक निःशब्द सुन्नता. तालमार्तंड ही पदवी त्यांना दिल्लीच्या वसंतोत्सवात पं. रविशंकरांनी दिली होती. पं. बिरजू महाराज काय, पं. रविशंकर काय, उस्ताद बिस्मिल्ला खॉं काय, पं. हरिप्रसाद चौरसिया काय, ही माणसे मुळात माणसे नव्हेतच. त्या होत्या चालत्या बोलत्या संस्था. आपल्या देशाची ही खरी संपत्ती, हे खरे वैभव. एक निदिध्यास घेऊन अविचल निष्ठेने एखाद्या कलेला सर्वस्व समर्पण करणार्या अशा महान कलाकारांनी पिढ्यान्पिढ्या मानवी जीवन सुखकर केले. अपरिमित दैवी आनंद दिला. हजारो शिष्य घडवले. प्राचीन काळापासून चालत आलेली कलापरंपरा प्रवाही करीत नव्या पिढीच्या हाती दिली. पुढच्या पिढ्यांनी त्या कलेला लोकाभिमुख केले, प्रतिष्ठा दिली. पं. बिरजू महाराज हे त्यातलेच. कथकला वाहून घेऊन थाप, तत्कार आणि चक्करच्या पलीकडे या प्राचीन नृत्यप्रकारात खूप काही आहे हे अवघ्या जगाला दाखवून देणारे हे अवलिये कलाकार.
संगीत आणि नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तामीळनाडूचे भरतनाट्यम, केरळचे कथकली, आंध्रचे कुचिपुडी, ईशान्येचे मणिपुरी, उडिशाचे ओडिसी आणि उत्तर भारतीय कथ्थकने अवघा भारत जणू एका सूत्रामध्ये गुंफलेला आहे. या प्रत्येक नृत्यप्रकाराची शैली वेगळी, भाव वेगळा, त्यामागील प्रयोजन वेगळे, संस्कार वेगळा, परंतु पिढ्यानपिढ्या परंपरेने चालत आलेल्या या नृत्यप्रकारांतून एका कलासंपन्न, कलाश्रीमंत देशाचे संचित सामोरे येते. बिरजू महाराज खरे तर सकल तालवाद्यांतही माहीर, परंतु त्यांनी वाडवडिलांनी जोपासलेल्या कथकला वाहून घेतले. अलाहाबादेजवळच्या हदियाच्या ईश्वरीप्रसादांनी हा नृत्यप्रकार विकसित केला. कृष्ण म्हणे त्यांच्या स्वप्नात आला होता. दुष्काळ आणि महामारीमुळे हे घराणे लखनौत स्थायिक झाले, तेथे त्यांच्या परिवाराने तो पुढे चालवला. रायगढपासून रामपूरपर्यंतच्या दरबारांमध्ये कथक पोहोचवले. पं. बिरजू महाराज हे त्या परंपरेचे सातव्या पिढीचे वारसदार. पिढ्यानपिढ्या राजेरजवाड्यांच्या दरबारांमध्ये नृत्य करून त्यांना रिझवत आलेल्या आपल्या वडील, काका, आजोबा, पणजोबांच्या ह्या परंपरेला पं. बिरजू महाराजांनी राजे आणि नवाबांच्या दरबारांमधून लोकदरबारात आणले. देशविदेशातील बड्या बड्या मंचांवर कथकचा भव्यतम आविष्कार घडविला. राजेरजवाडे अस्तंगत झाल्यानंतर उपजीविकेसाठी आपल्याजवळचे कलाप्रकार तवायफांना शिकवण्याची पाळी मोठमोठ्या कलाकारांवर आलेली होती. राजदरबारानंतर कोठ्या आणि हवेल्यांत घुसमटलेल्या या कलांना बिरजू महाराजांसारख्या अलौकिक कलावंतांनीच जनमानसात सुप्रतिष्ठित केले. पुन्हा सन्मान मिळवून दिला. राधाकृष्णाच्या कहाण्या नुसत्या नृत्यातून नजाकतीने सादर करूनच ते थांबले नाहीत. एकाहून एक भव्य नृत्यनाट्यांद्वारे अलौकिक नृत्याविष्काराबरोबरच तेवढाच अलौकिक भावाविष्कारही घडवता येऊ शकतो याचा साक्षात्कार रसिकांना घडवला. कथक म्हणजे केवळ गतिमान लयबद्ध नृत्य आणि पदन्यास किंवा गोल गोल चकरा नव्हेत, तर भावाभिनयालाही त्यामध्ये तेवढेच महत्त्व आहे हे स्वतःच्या कलाविष्कारांतून दाखवून दिले. बिरजू महाराजांचे मोठेपण हे आहे. परंपरेच्या ओघात गौण बनलेल्या भावाभिनयाला त्यांनी पुन्हा कथकमध्ये सुप्रतिष्ठित केले.
वयाच्या सातव्या वर्षापासून पित्याच्या मांडीवर बसून तिहाया आणि तुकडे ऐकत गीत, नृत्याचे साक्षी राहिलेले दुखहरन ऊर्फ ब्रिजमोहन केवळ त्या ब्रजवासी कृष्णाच्या प्रेम आणि शृंगाराच्या कहाण्या नृत्यातून, नृत्यनाट्यांतून सादर करूनच थांबले नाहीत. कौरव पांडवांच्या आणि राम – रावणाच्या वीररसयुक्त युद्धापासून अगदी दिल्लीत भरलेल्या एशियाडच्या निमित्ताने नृत्याविष्काराद्वारे कबड्डी, खोखो आणि रस्सीखेचीपर्यंतच्या खेळांचे दर्शन घडवण्याचे धाडसी प्रयोगही त्या प्राचीन परंपरेचा अनादर होणार नाही याची काळीज घेत केले. कथकची ताकद त्यांनी जागतिक मंचांवर सिद्ध केली. ते एक निपुण नर्तक तर होतेच, परंतु तितकेच उत्तम नृत्यगुरूही होते याची पोचपावती त्यांनी घडवलेले त्यांचे देशविदेशांतील शिष्य देत आहेत. बॉलिवूडपटांसाठी नृत्यदिग्दर्शन करणेही त्यांनी कमीपणाचे मानले नाही. देवदासमध्ये जेव्हा माधुरी ‘काहे छेड मोहे’ किंवा बाजीराव मस्तानीमध्ये दीपिका ‘मोहे रंग दो लाल’ करीत पं. बिरजू महाराजांच्या पदन्यासांवर थिरकते तेव्हा भारतीय नृत्याची तीच प्राचीन परंपरा नव्या पिढीला जणू आलिंगन देत असते!
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.