तारांकित हॉटेलमधील बेकायदा जुगारावर छापा

0
4

येथील पणजी पोलिसांनी शहरातील एका तारांकित हॉटेलमधील कॅसिनोमध्ये सुरू असलेल्या बेकायदा लाईव्ह गेमिंगवर छापा घालून २७ लाख रुपये जप्त केले असून ११ जणांना अटक केली आहे. पणजी पोलिसांनी बेकायदा जुगारावर केवळ दहा दिवसात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या ७ एप्रिल रोजी टोंक – पणजी येथे एका घराच्या टेरेसवर सुरू असलेल्या पोकर गेम जुगारावर छापा घालून २५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख २०,५८० रुपये, ८८३ पोकर चिप्स व इतर वस्तू जप्त केल्या आहेत. येथील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तारांकित हॉटेलमधील बेकायदा लाईव्ह गेमिंगवर छापा घालण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी रात्री पोलिसांनी हा छापा घातला. या छाप्यात २७ लाखांच्या रोख रक्कमेबरोबर वेगवेगळ्या मुल्यांचे ६७१ चिप्स व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ११ जणांना प्रकरणात अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सूरज गावंस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.