‘उटा’चे आंदोलन आणि त्यानंतरच्या बाळ्ळीतील हिंसाचाराचे प्रकरण आज एका ज्वालामुखीचे स्वरूप धारण करून राहिले आहे. या प्रकरणाला असलेले राजकीय कंगोरे आणि त्याचा आजवर एकूण तपासकामावर झालेला परिणाम यामुळेच हा विषय आज एक अत्यंत संवेदनशील विषय बनलेला आहे. अगदी सुरवातीपासून हा विषय हाताळताना त्याच्या राजकीय बाजू डोळ्यांपुढे धरल्या गेल्या, त्याचा हा परिणाम आहे. आँचल जळीतकांडातील एका आरोपीच्या आत्महत्येचे निमित्त घडले आणि परवा भडका उडाला. यानिमित्ताने काही गोष्टींची शहानिशा होणे आज आवश्यक आहे. स्वतःवर खुनाचा आरोप ठेवल्या गेल्याने मानसिक तणावाखाली येऊन केलेली ही आत्महत्या आहे की पोलिसांकडून छळणूक झाल्यानेच गजानन फळदेसाईने आत्महत्येचा मार्ग अनुसरला यातील सत्य आधी शोधले गेले पाहिजे. बाळ्ळीवासीयांच्या टीकेचा रोख पोलीस निरीक्षक सुनीता सावंत यांच्यावरच का आहे याचाही विचार व्हायला हवा. बाळ्ळी जळीतकांडातील आरोपींना हाताळताना चुकीच्या पद्धतीने तर हाताळले गेले नाही ना, वर्दीतली दांडगाई तर केली गेली नाही ना, याचा निष्पक्ष तपास व्हायला हवा.
फळदेसाई हा पोलिसांच्या अटकेत नव्हता, मग त्याचा छळ केला असे कसे म्हणता, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणत असले, तरी एखाद्या निरपराध्यामागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा लावणे हीही छळणूकच ठरते. वर्दीच्या गुर्मीत केलेली दमदाटीही छळणूकच म्हणावी लागते. कोणतीही शहानिशा न करता पोलीस प्रमुख आदित्य आर्य आपल्या कर्मचार्यांना क्लीन चीट देऊन कसे मोकळे झाले? त्यांच्या वक्तव्यामुळे आगीत नाहक तेल ओतले गेले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया अनावश्यक होती. ‘आपण प्रकरणाचा न्यायोचित तपास करू’ एवढी माफक प्रतिक्रिया त्यांनी देणे पुरेसे होते. आपल्याजवळ व्हिडिओ चित्रफितीचे पुरावे आहेत असा धाक बाळ्ळीवासीयांना दाखवण्याचे काही कारण नव्हते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे पुरावे पोलिसांपाशी आहेत, ते न्यायालयात सादर करणे पुरेसे आहे. कोण दोषी आहे आणि कोण नाही ते न्यायालय ठरवील. ते आर्य यांनी ठरवण्याचे काही कारण नाही. व्हिडिओ चित्रफितीमध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्ती ही खून प्रकरणातील आरोपी आहे असे कसे म्हणता येईल? एखाद्या ठिकाणी जेव्हा काही घटना घडते, तेव्हा तेथे मोठा जमाव स्वाभाविकपणे जमत असतो. त्यातील काही व्यक्ती आक्रमक झाल्या, तरी गर्दीत बघ्यांचे प्रमाणच अधिक असते. त्यामुळे जे काही व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांपाशी आहे, त्याची शहानिशा नीट झाली पाहिजे. बाळ्ळीवासीय संघटित आहेत आणि ते महामार्ग रोखून धरतात म्हणजे त्यांची बाजूच बरोबर आहे असे जरी म्हणता येणार नसले, तरी प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी हा विषय संयमाने आणि जबाबदारीने हाताळला गेला पाहिजे. फळदेसाईचा मृतदेह उतरवण्यासाठी जी क्लृप्ती लढवली गेली, त्यातून आंदोलकांची आपल्याला फसवले गेल्याची भावना झाली आणि त्यांनी महामार्ग रोखला. हे टाळता आले नसते का? सामोपचाराने आंदोलकांशी बोलणी करून आणि फळदेसाईच्या कुटुंबियांना परिस्थितीची कल्पना देऊन, विनंती करून झाडावरील कुजत चाललेला त्याचा मृतदेह खाली उतरवणे कठीण असेल, पण अशक्य तर नव्हते. फळदेसाईच्या डोक्यावर जखमा आहेत असा काहींचा दावा आहे. जनतेमधील संशयाचे निराकरण करण्यासाठी पोलिसी पंचनाम्यात जी पारदर्शकता अपेक्षित आहे ती ठेवली गेली आहे का, हेही पाहिले गेले पाहिजे. या विषयात अकारण नाक खुपसून घटनेचे राजकारण करू पाहणार्या प्रवृत्ती आम बाळ्ळीवासीयांना वेठीस धरत आहेत का, हेही तपासले जावे. या प्रकरणाचे निमित्त करून ‘सर्व आरोपींवरील आरोप काढून टाका’ ही मागणी समर्थनीय नाही आणि सरकारने त्या दडपणापुढे झुकण्याचे कारण नाही. खर्या गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यांची सजा मिळालीच पाहिजे, कारण आँचल इमारतीत जे काही घडले, ते अत्यंत नृशंस आहे. परंतु त्याचबरोबर जळीतकांडात सहभाग नसलेल्या निरपराध बाळ्ळीवासीयांनाही त्या प्रकरणात नाहक अडकवले गेलेले नाही ना, याचीही वस्तुनिष्ठ शहानिशा व्हायलाच हवी.