तामीळनाडूचा कौल

0
11

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील एकूण 102 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यामध्ये अर्थातच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते तामीळनाडूकडे. तामीळनाडूच्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व 39 जागांसाठी पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडले आहे. उत्तराखंडच्या पाचपैकी पाच जागांवरही मतदान पूर्ण झाले. उत्तर प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत विविध राज्यांतील मोजक्याच जागांवरही पहिल्या टप्प्यात मतदान झाले. अर्थात, तामीळनाडूतील जनतेचा कौल काय लागतो त्याला यावेळी विशेष महत्त्व असेल. अबकी बार चारसौ पारची जी घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे, ती साकार करायची असेल तर उत्तर भारतातील आपली गेल्यावेळची पैकीच्या पैकी कामगिरी कायम राखतानाच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील पाच राज्यांपैकी सर्वाधिक जागा असलेल्या तामीळनाडूत चंचूप्रवेश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गेली पाच वर्षे जे आकाशपाताळ एक केले, त्याला तेथील द्रविडी संस्कृतीचा अभिमानी मतदार साथ देतो की नाही हे हा निकाल सांगणार आहे. तामीळनाडूच्या जनतेमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी भाजपने आणि स्वतः पंतप्रधान मोदी यांनी गेली पाच वर्षे अथक प्रयत्न चालवले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भारतभेट थेट दक्षिण भारतात ममलापुरममध्ये भरवून ह्या दक्षिणायनाची सुरूवात झाली होती. त्यानंतर नव्या संसदेच्या शुभारंभी सेंगोल वापरणे असो, अथवा काशी – तामीळ संगमसारखा प्रयत्न असो, स्वतः पंतप्रधानांच्या डझनावारी झालेल्या भेटी, सभा आणि रोड शो असोत, किंवा सनातन धर्माचा उपस्थित केला गेलेला वाद आणि अलीकडेच वर आणले गेलेले कच्चिथिवू बेटाचे प्रकरण असो, तामीळनाडूच्या ह्या आजवर अजिंक्य राहिलेल्या जागा खेचून घेण्यासाठी भाजपने जी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे, तिचा कौल मतदारांनी शुक्रवारी मतपेटीत बंद केलेला आहे. पंतप्रधानांनी स्वतः वेष्टी आणि थुंडू परिधान करून उत्तर – दक्षिण भारतामधील राजकीय दरी संपुष्टात आणण्याचा जो विडा उचलला आहे, त्याची फलनिष्पत्ती काय होणार ह्याबाबत खरोखरच कुतूहल आहे. गेल्या निवडणुकीत अभाअद्रमुकचे पानीपत करून तेथे द्रमुक सत्तेवर आली. काँग्रेससाठी द्रमुकशी असलेली युती ही तेथील मोठी उपलब्धी आहे. खुद्द राहुल गांधींच्या न्याययात्रेच्या सांगता सोहळ्यातील स्टालीन यांची उपस्थिती आणि आपला बंधू म्हणून राहुल याचा त्यांनी केलेला उल्लेख यामुळे काँग्रेस – द्रमुकच्या ह्या मैत्रीला ह्यावेळीही भरघोस मतांची फळे मिळणार का हे पहावे लागेल. तिला काटशह देण्यासाठी भाजपने साथ सोडून गेलेल्या अभाअद्रमुकला जवळ आणण्याच्या फंदात न पडता छोट्या छोट्या तामिळी पक्षांशी हातमिळवणी करून ह्या निवडणुकीत उडी घेतली आहे. दक्षिण भारतातील दोन महत्त्वाची राज्ये – कर्नाटक आणि तेलंगण यावेळी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे काँग्रेसची उरलीसुरली आशा ह्या दोन राज्यांवर स्थिरावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतातील पाच राज्यांतील एकूण 130 जागांपैकी भाजपला ज्या 29 जागा मिळाल्या, त्यापैकी तब्बल 25 कर्नाटकने मिळवून दिल्या होत्या, तर 4 तेलंगणाने. आता ही दोन्ही राज्ये भाजपजवळ नाहीत. कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने वोक्कळिगांच्या मतांचे कैवारी म्हणवणाऱ्या देवेगौडांच्या जेडीएससी हातमिळवणी केली आहे, परंतु त्याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा वाढवायला किती होतो हे पहावे लागणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपची रेवडी उडवताना 130 पैकी त्यांना फार तर 12 ते 15 जागा मिळतील असे भाकीत केले आहे. भाजपने यावेळी केरळवरही भर दिला. डावे आणि काँग्रेस यांच्या सत्तांतराच्या खेळात भाजपने गेल्यावेळी शबरीमलाच्या वादाचा आधार घेत उडी घेतली होती, परंतु तेव्हा अपयशच पदरी पडले होते. मात्र तेव्हा मतांची टक्केवारी वाढली. त्यामुळे यावेळी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, परंतु अजूनही दक्षिण भारतीय जनता भाजपला स्वीकारताना दिसलेली नाही. आंध्र प्रदेशात तेलगू देसम आणि पवनकल्याणच्या जनसेनेवर भाजपची भिस्त दिसते. एकूण स्वतःच्या 370 आणि रालोआच्या जागा 400 पार न्यायच्या असतील, तर त्यासाठी दक्षिण भारतात अस्तित्व निर्माण करण्यावाचून भाजपला तरणोपाय नाही. केवळ मतांची टक्केवारी वाढली यावर समाधान मानून चालणारे नाही. पहिल्या टप्प्यात बंदिस्त झालेला तामीळनाडूचा कौल म्हणूनच भाजपसाठी आपले चारशे पारचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.