Home बातम्या तापमान वाढतंय… वाढतंय….?

तापमान वाढतंय… वाढतंय….?

0

– अरुण हेबळेकर

अधूनमधून मला अशा एका जागी जावं लागतं जिथं टीव्ही नाही, वर्तमानपत्रं नाहीत, या जगात राहूनही इतर जगाशी संपर्क नाही. आणि खरं सांगू? मी तिथं सुखी असतो. तिथंही उकाडा असतो, पाऊस असतो, थंडी असते. त्यावरील थोडीङ्गार चर्चा होते. परंतु कोणी (मी सोडून) कशाचं भाकीत करत नाहीत अथवा आपल्या तुटक्या-ङ्गुटक्या ज्ञानाचं प्रदर्शन करत काहीतरी भयानक घडणार असल्याचं सांगत नाहीत. बरं वाटतं.

२०१२ साली जगबुडी होणार आहे असं भाकीत केलं गेलंय. वर्षाच्या सुरुवातीला भयानक थंडी पडू लागली. वाटलं, नवीन हिमयुगाची सुरुवात झालीय. शीतलहर मार्चपर्यंत चालणार असं भाकीत केलं गेलं. मी जिथं त्यावेळी राहत होतो तिथं बिचारी ती कशीबशी ङ्गेब्रुवारीच्या पहिल्या तारखेपर्यंत तग धरून राहिली. मुंबईत तिनं एक चाळीस वर्षांचा विक्रम मोडला खरा; परंतु वैज्ञानिक भाकीत कितपत आणि क्षेत्राच्या कुठल्या सीमेपर्यंत खरं ठरू शकलं याचं अजून मूल्यमापन झालेलं नाही. १९७५ च्या दरम्यान कुणा एकानं जगबुडीचं भाकीत केलेलं होतं. तारीखही दिली होती. जगबुडी सोडा; मी त्यावेळी जिथं राहत होतो त्या रायबंदर पाट्यावर पूरदेखील आला नाही. ग्रहणं, ग्रहांच्या युती व्यवस्थित भाकीत केल्यावेळी शंभर टक्के घडत जातात, परंतु त्यांवर आधारून केलेलं भौतिकी घटनांचं भाकीत शंभर टक्के खरं ठरू शकलेलं नाहीय असं दिसतं. खग्रास सूर्यग्रहणांची आपणा सर्वांनाही धास्ती आहे. इतकी की सरकारी स्तरावरदेखील त्यावेळी काही खबरदारी घेतली जाते. सुट्टीदेखील दिली जाते. का ते नेमकं माहीत नाही. ग्रहणांची भाकितं अचूक ठरतात; परंतु त्यांच्या परिणामांची भाकितं अचूक ठरू शकत नाहीत. का? कदाचित या प्रश्‍नाचं उत्तर हवामानाच्या भाकिताशी थोडंङ्गार संबंधित असावं असं वाटतं.

कशाचंही भाकीत करण्यासाठी त्याला अचूक गणिताचा अथवा अचूक तत्पूर्वक प्रायोगिक अथवा प्रत्यक्षात घातलेल्या घटनांच्या निरीक्षणांचा आधार असावा लागतो. ग्रहणांचं भाकीत ग्रहांच्या गतींचं अचूक गणित करून केलं जातं. त्यांना अनेक प्रायोगिक आणि प्रत्यक्ष निरीक्षणांचा आधारही आहे. भौतिक घटनांच्या भाकितासाठी गणिताचा आधार नाही. प्रत्यक्ष घटनांचा इतिहासही उपलब्ध नाही. मानवी जीवनावर अशा गोष्टींचा परिणाम होत असल्यास त्याचा नेमका नोंदीव इतिहास नाही. जो काही उपलब्ध आहे तो केवळ काल्पनिक अथवा तार्किक आहे; आणि त्याचमुळे अनेक भौतिकशास्त्रज्ञांचा ङ्गलज्योतिषशास्त्रावर विश्‍वास नाही. हवामानाच्या भाकिताबाबतीत आपण किंचित भाग्यशाली आहोत. आपल्याकडे भूतकाळातील निरीक्षणांचा संचय आहे. त्या निरीक्षणांचा आणि त्यानंतर घडून आलेल्या घटनांचा इतिहास उपलब्ध आहे. आता एक प्रश्‍न उभा राहतो. आपण हवामानाची नाडी ओळखू शकलेलो आहोत का? उत्तर थोडंसं अस्पष्ट आणि अनाकलनीय आहे. म्हटलं तर आहोत, म्हटलं तर नाही. जसाजसा अभ्यास होत जातोय, नवे नवे दुवे मिळत जात आहेत. परस्पर संबंध अनाकलनीय असले तरी काहीतरी संबंध असल्याचा भास होत आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर अल् निनो नावाच्या एका गूढ वातावरणीय परिणामाचं घेऊया. या ‘छोट्या’ मूर्तीनं दक्षिण प्रशांत महासागरात राहूनही आपल्या पावसावर परिणाम केलेला आहे. गेल्या शीतलहरीवर परिणाम केलेला आहे, आणि न जाणो आणखीन किती घटनांवर परिणाम होणार आहे. दरवर्षी एखाद्या पुस्तकाच्या उघडत जाणार्‍या पानांप्रमाणे सावकाश उलगडा होत चाललेला आहे. अजून कितीतरी घटनांचा उलगडा व्हायचा आहे. एका बाजूला हिवाळ्यात वातावरणाचं किमान तापमान घटतंय तर दुसर्‍या बाजूला उन्हाळ्यात तापमान वाढतंय. कधी अतिवृष्टी होतेय तर कधी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षाही कमी होतंय. कधीकधी भयानक प्रमाणात पाऊस पडून नंतर नाहीसा होतोय तर कधी अचानक येऊन भयानक थैमान घालून जातोय. कधी आपल्याला वाटतंय की त्याची नाडी सापडलीय, तर कधी काहीच समजत नाही. शेवटी आपण एका गोष्टीच्या आधारावर एकंदर सर्वच गोष्टींचा उलगडा करू पाहतो आहोत- वृक्षहानी आणि हरित वायूंचं अतिक्रमण. आणि आपल्या या विधानाला कुठंही आपण नेमकं गणित अथवा प्रायोगिक घटनांच्या निरीक्षणांच्या आधाराचा दाखला देऊ शकलेलो नाही. कदाचित आपला शोध अजून संपलेला नाहीय! कसा संपेल? भारतात घडणारे वातावरणांमधील बदल इतर ठिकाणी काय घडतंय त्यावरही अवलंबून आहेत. पृथ्वीचं वातावरण देशांच्या सीमांवर अचानक देशाच्या नावाप्रमाणे बदलत नाही. बदल झालेच तर ते काही क्षणात इतरत्रही पसरत जातात. अमेरिकेत एखादी सिगरेट पेटवणारा माणूस भारतातील तापमानावर थोडातरी बदल घडवतो. आपली सध्या उपलब्ध असलेली उपकरणं तो अतिशय सूक्ष्म बदल मापू शकत नाहीत. जसजशी तसा अतिसूक्ष्म बदल मोजणारी उपकरणं उपलब्ध होत जातील तसतशी अधिक माहिती मिळत जाईल आणि आपल्या भाकितांत अधिक अचूकता येत जाईल.

आपणा मानवांचा एक समज आहे की आपण या पृथ्वीचे राजे आहोत. कदाचित राजकारणाच्या नजरेतून ते थोडंफार खरं असू शकेल; परंतु पृथ्वीवरील नैसर्गिक घटनांकडे पाहिल्यास कुठंही मानवाचं त्यांवर नियंत्रण असलेलं दिसून येत नाही. त्यांचं पूर्ण आकलनही झाल्याचं जाणवत नाही. पृथ्वीवरील हवामान आणि ऋतू यांमधील बदल नियमित असतात. त्यांच्या स्थूल बदलांचं आपल्याला आकलन झालेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हा क्रम आपल्याला माहीत आहे. परंतु नेमक्या स्थित्यंतरांमधल्या, नेमक्या सीमा आपण अजूनही ओळखू शकलेलो नाही. तशा सीमा असणं कठीण आहे हे जाणवतं. परंतु त्या पुढेमागे झाल्या तर त्या का झाल्या ते कळत नाही. असे बदल अलीकडेच होऊ लागले आहेत, का या आधीही होते, हे आणि या आधी या काल-सीमेची नेमकी जागा कोणती होती हे आपल्याला माहीत नाही. ढोबळपणेदेखील आपण काही सांगू शकत नाही. दर खेपेला वृक्षतोडीवर दोष लादून आपण मोकळे होतो. त्याचं मूल्यमापन करणं आपल्याला जमलेलं नाही. किंबहुना नीटसं केलं गेलेलं नाही. दरवर्षी नियमित होणारे ऋतुमानातील बदल कुठल्याही शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये निरीक्षणांद्वारे नोंदले जाऊ शकतात आणि त्यांवर विश्‍लेषण होऊ शकतं. आणि ते विश्‍लेषण आपल्याला काहीतरी नेमकं सांगू शकेल.

अलीकडे, दरवर्षी तापमानात वाढ होऊ लागली आहे असं एक मोघम विधान आपण करतो. परंतु गेल्या हिवाळ्यात तापमानानं खालचा नीचांक गाठला. अल् नीनोच्या माथ्यावर त्याचा दोष थापला गेला. नेमकं काय खरं आहे? तापमानानं आपल्याला आकलेल तसं वागणं बंद केलंय हे खरंय. पावसाचं बेशिस्त वागणं तर सर्वख्यात आहे. वृक्षतोड, खाणउद्योग आणि रस्त्यांचं रुंदीकरण यांसारख्या मानवी कृतींमुळे होणारी ही ऋतुमानाची अवहेलना नीटपणे उलगडायला हवीय. ती दोन स्तरांवर उलगडायला हवीय. एक सूक्ष्म स्तरावर, दुसरी स्थूल स्तरावर. स्थूल स्तरावरील बदल सूक्ष्म स्तरावरील बदलांवर अवलंबून असतात हे समजायला कठीण नाही. त्यांमधला संबंध समजणे आवश्यक आहे. त्यासाठी एका दीर्घ कालांतराचा अभ्यास असायला हवा. नैसर्गिक बदलांबरोबर मानवी कृतींमुळे होणारे बदलही त्या अभ्यासात अंतर्भूत करावे लागतील. हा एक अतिशय मोठा आणि दीर्घकालीन प्रकल्प होऊ शकतो. परंतु त्यात विद्यालयीन, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय मनुष्यबळाचा उपयोग केल्यास ते शक्य आहे. इतकेच नव्हे तर अत्यंत उपयुक्त ठरेल; समाजाच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून. कदाचित हा प्रकल्प अभ्यासक्रमात सामावून घ्यावा लागेल; आणि ते शक्य आहे. ब्लेज पास्कल, ज्याच्या नावावरील वायूंच्या आंशिक दाबांचा कायदा आजही रसायन आणि भौतिकशास्त्रात शिकवला जातोय. त्यानं आयुष्यभर हवामानाच्या तापमानादी परिमाणांच्या नित्य नोंदी केल्या. विद्यार्थ्याला वैज्ञानिक शिस्तीची सवय करायला अशा निरीक्षणांचा अत्यंत ङ्गायदा होऊ शकतो.

पृथ्वीवरील मानवी जीवनाचा ज्ञात इतिहास केवळ तीन ते पाच हजार वर्षांचा आहे. त्यांमधील वैज्ञानिक निरीक्षणांचा आणि तत्संबंधी नोंदींचा इतिहास ङ्गक्त तीनशे वर्षांचा आहे. त्या तीनशे वर्षांतील अनेक वर्षे एकमेकांपासून संपर्कहीन अवस्थेत गेली आहेत. संपर्क युगाची ही तर नुकतीच सुरुवात आहे. हवामानावरील नोंदींपासून काही निष्कर्ष काढायला लागणारी निरीक्षण केंद्रं, उपग्रह ध्यानात घेऊनही ङ्गारच अल्प आहेत. त्यांची निरीक्षणं पसरलेली आणि विरल आहेत. त्यांवरून निसर्गाच्या बदलांचा कालावधी कळणं सोपं नाही. परंतु जर हे बदल सूक्ष्म स्तरावर नोंदले गेले आणि संपर्क माध्यमांचा उपयोग करून त्यांचं संकलन केलं गेलं तर केवळ राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरांवरील अचूक भाकितं करणंही जमू शकेल.

जागतिक स्तरावरील सरासरी तापमानात वाढ होत चाललीय हे प्रथमदर्शनी तरी खरं वाटतंय. परंतु ही वाढ दर शंभर वर्षांमधली आहे; आणि ती गेल्या तीनशे वर्षांच्या संकुचित निरीक्षणांच्या अभ्यासातून मिळवली गेलीय. नेमके संबंध पूर्णपणे प्रस्थापित झालेले नाहीत. कारणं अनेक असू शकतात. वृक्षहानी, खाणकाम, बांधकामं, धरणं, वाढती विमान वाहतूक, वाढती वाहनं आणि कदाचित आपल्या हातातील मोबाइल ङ्गोन यांनीही त्यात आपलं योगदान दिलेलं असू शकतं. आपला दर ङ्गोन कॉल शून्य पूर्णांक शून्य शून्य शून्य शून्य (असं दहा बारा वेळा) एक दशांश डिग्री सेल्सिअंश तापमानाची भर घालत असेल. कुणी सांगावं? परंतु हे मोघम विधान झालं. त्यावर अभ्यास व्हायला हवा, आणि हा अभ्यास आपणापैकी प्रत्येक विद्यार्थ्याने करायचा आहे. तापमान वाढणारच. त्यावर आपलं नियंत्रण येणं कठीण आहे. परंतु त्यावरील अभ्यास कदाचित आपल्याला तापमानाच्या वाढदरावर नियंत्रण मिळवून देऊ शकेल.

बिना कारवॉं की कारवॉंसालार होता है

किसी के चल पानेसे ही कारवॉं होता है॥