खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीतील संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात डॉ. सिंग यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने खाण अवलंबितांच्या समस्यांचे सादरीकरण केले. या शिष्टमंडळात मंचचे निमंत्रक ऍड. सुहास नाईक, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, अतुल जाधव, प्रकाश राऊत देसाई, सत्यवान गावकर, प्रमोद गाड, सुरेश देसाई, शांबा गावस, गीताली नाईक, प्रमिला घाडी यांचा समावेश होता.
शिष्टमंडळाच्या नेत्यांनी पंतप्रधानांना सर्व स्थितीची कल्पना दिल्यानंतर पंतप्रधानांनी खाण अवलंबितांप्रती आपल्याला सहानुभूती असल्याचे सांगितले. गोव्यातील खाणी लवकर सुरू करण्यासाठी आपल्या सरकारचे पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देतानाच त्यांनी पर्यावरण जतनाच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. तसेच गरिबी हा फार मोठा प्रदूषक असल्याचेही ते म्हणाले. या मंचचे शिष्टमंडळ गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असून या दरम्यान त्यांनी विविध राजकीय नेते, खासदार आदींची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली. केंद्रीय खाणमंत्री दिनशा पटेल यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर करण्यात आले.