तांत्रिक पूजेतील श्रीगणेश

0
422

– दत्ता चंद्रकांत परब 

सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्रीगणेश ही सर्व देवतांआधी पूजण्यात येणारी देवता आहे. सर्व कार्यारंभी गणेशाचे पूजन करून विघ्नांचा विनाश करण्याचे त्याला आवाहन करण्यात येते. सर्व विघ्नांचा विनाश करणार्‍या या देवतेची आराधना करून मानव कोठलेही कार्य करावयास तत्पर होतो. जनमानसातील त्याच्यावरील ही श्रद्धा गणेशाचे महात्म्य वाढवते व त्याला अधिकाधिक लोकप्रिय करते.
विघ्नहर्ता गजानन हा विनायकाच्या रूपांतूनच पुढे मान्यता पावलेला देव आहे. विनायक हे एक दैवत नसून ती समाजाला त्रास देणारी तत्त्वे आहेत असेही काहीजणांचे मत आहे. कोणतीही चांगली गोष्ट घडणार्‍या ठिकाणी ही तत्त्वे विघ्न निर्माण करत होती. चांगल्या कामात अडथळा आणीत होती. वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी मानवांना त्यांना प्रसन्न करून घेण्याव्यतिरिक्त इतर उपायच नव्हता. त्यामुळेच या विनायकांना लोकांनी लोकदेवतांच्या रूपात स्वीकारले व विघ्नकर्त्या विनायकांनाच विघ्नहर्त्या गणेशाचे रूप दिले व सर्व कार्यारंभी त्याची पूजाअर्चा करू लागले.
गणेश या देवतेला सहाव्या शतकापूर्वी तेवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती. त्यावेळी फक्त ब्रह्मा, विष्णू आणि महेश हीच दैवते खूप लोकप्रिय होती. नंतर गणेशाला शिवपार्वतीपुत्र रूपात लोकांनी स्वीकारले आणि त्यालाच प्रथम देवतेचा मान दिला. त्या वेळेपासून तो सर्व देवांआधी पूजनीय ठरला.
विघ्नांचा विनाश करणारे हे दैवत आहे. ज्ञानसिद्धीचे, पराक्रमाचे, शौर्याचे हे दैवत आहे. गणेशभक्तांनी या गणेशाला त्याच्या पित्याच्या रूपातच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ शिवाने धारण केलेले अलंकार, खास करून सर्प किंवा मस्तकावर असणारी चंद्रकोर, नृत्य करणार्‍या शिवाप्रमाणे आढळून देणारी नृत्य करणारी गणेशमूर्ती हेच सूचित करते.
तांत्रिक गणेश उपासनेत गणेशमूर्तीत मात्र विविधता वा वेगळेपण आढळून येतो. महत्त्वाचे म्हणजे विविध संख्येत सापडणारे गणेशमूर्तीचे हस्त. तांत्रिक गणेशमूर्तीत गणेश सपत्निक असतो. सपत्निक गणेश मूर्तीत तो एका किंवा दोघा पत्नींबरोबर असतो. ऋद्धी-सिद्धीसमवेत असणारा गणेश हा भक्ताचा तारणहार आहे. तांत्रिक गणेश उपासनेतील गणेशाच्या मूर्तीत प्रत्येक वेळी सापडणारे त्याचे वाहन मूषक वा उंदीर सापडत नाही. गणेश बहुधा पद्मासनावर वा कमळावर बसवलेला दर्शवतात.
शंकरकृत प्रपंचासारा हा पारंपरिक मंत्रशास्त्राचा सगळ्यात जुना संदर्भग्रंथ मानला जातो. यात गणेशाच्या तीन रूपांना मान्यता देणात आलेली आहे. शरदतिलक तंत्रात गणेशाच्या सात रूपांचा स्वीकार केला आहे. श्री विद्यार्नव तंत्र हे मंत्रशास्त्रातील महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. त्यात गणेशाच्या चौदा रूपांचा उल्लेख आहे.
गणेश संप्रदायात मंत्र व विधीद्वारे पूजा करण्यात येणारे तांत्रिक पूजेतील गणपती म्हणजेच महागणपती, हेरंब, हरिद्रगणपती, उचिष्ठ गणपती, नवनीत गणपती आदी गणपती आहेत. त्यातील महत्त्वाचे गणपती-
महागणपती ः महागणपतीला वल्लभेष म्हटले जाते. वल्लभेष उपनिषधामध्ये गणेश रूपाचे वर्णन सापडते. महागणपती हा उसाच्या रसाच्या महासागरातील रत्नदीप बेटावर वास्तव्य करून आहे. तो वर्णमालेच्या पसरलेल्या पाकळ्यांच्या मध्यावर त्रिकोणरूपी सिंहासनावर आरूढ झालेला असतो. त्याचे सिंहासन सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या पारिजात वृक्षाखाली आहे. त्याच्या दहा हातांत वेगवेगळ्या वस्तू आढळतात. त्यातील महत्त्वाच्या- १) डाळिंब ः या फळात आढळणार्‍या बिया (बी) ही त्याच्या निर्मितीक्रियेची साक्ष आहे. २) धनुष्यबाण ः हे त्याच्या राजशाहीचे चिन्ह आहे. ३) भाताचे कणीस ः हे त्याच्या बाणाचे टोक, जे निर्मितीचे निशाण आहे. ४) रत्नांनी भरलेला कलश ः हा त्याच्या सोंडेत असतो. रत्नांनी भरलेला कलश ही कुबेराची निशाणी आहे. कारण तो धनाचा रक्षक आहे. गणपतीही त्यामुळेच धनाचा रक्षक मानला जातो.
गणपतीच्या हातांत सापडणारी आयुधे वा वस्तू त्याच्या देवदेवतांनी भेट दिल्या आहेत. वराहाने त्याला गदा भेट दिलेली आहे. कामदेवाने त्याला धनुष्यबाण, विष्णूने चक्र व भूदेवीने त्याला भाताचे कणीस भेट दिलेले आहे असा संदर्भ सापडतो. शिवाप्रमाणेच त्याचे तीन मंत्र असून ते सूर्य, चंद्र व अग्नी असल्याचे म्हटले आहे.
महागणपती हे गणपतीभक्तांच्या संप्रदायातील महत्त्वाचे गणेश रूप आहे. त्याचे हे रूप खूपच प्रसिद्ध झाले आहे. अरुण छायेसारखा वर्ण असलेल्या गणेशाच्या/गणपतीच्या मस्तकावर चंद्रकोर असते. तो त्रिनेत्रधारी असून त्याच्या कपाळावर त्याचा तिसरा नेत्र असतो. महागणपतीसोबत त्याची पत्नीही त्याच्याबरोबर त्याच्या मांडीवर बसवलेली दर्शवतात. तिच्या हातात कमळ असते.
महागणपती दशभूजाधारक असून त्याच्या हातात डाळिंब, गदा, उसाचे धनुष्य, चक्र, निलकमल, भाताचे कणीस, तुटलेला दंत वा सुळा व रत्नांनी भरलेला कलश असतो व एका हाताने त्याने पत्नीला जवळ घेतलेले असते.
पंचमुखी हेरंभ गणेश ः हेरंभ गणेशाला पंचमुखे असतात. ही पाच मुखे सरळ वा एका ओळीत असतात किंवा चार बाजूनी चार तोंडे व त्यांच्यामध्ये पाचवे तोंड असते. हेरंभ या नावामागील खरा अर्थ स्पष्ट होत नाही. ब्रह्मवैवर्त पुराणात हेरंभचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. ‘हे’ या शब्दाचा अर्थ असहाय्य तर ‘रंभ’ या शब्दाचा अर्थ रक्षण असल्याचे म्हटले आहे. हेरंभ या शब्दाचा अर्थच त्यामुळे असहाय्य लोकांचा रक्षक होतो.
हेरंभच्या पाच मुखांचा रंगही वेगवेगळा असतो. हा वेगवेगळा रंग शिवाच्या पंचब्राह्मण तत्त्वाशी गणेशाचे साम्य दर्शवतो. ती मुख्य तोंडे ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव व सदयोजटा या रूपांशीही साम्य दर्शवतात. शिवाची ही पंचमुखे एकत्र स्वरूपात सदाशिव रूपात आढळतात.
गौरवर्णीय हेरंभ हा दशभुजाधारक असून तो सिंहावर आरूढ झालेला असतो. शंकर विजयात हेरंभ रूपावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हेरंभ हा त्याच्या पत्नीसोबत दर्शवतात. हेरंभाबरोबर त्याची पत्नी त्याच्या मांडीवर बसलेली असून ती तिला कवेत घेत असल्याचे म्हटले आहे.
एका ध्यानश्‍लोकात दशभुजाधारक हेरंभाच्या हस्तमुद्रेचे व विविध वस्तूंचे वर्णन आढळते. त्यानुसार त्याचा मुख्य उजवा हस्त अभयमुद्रेत व डावा हस्त वरदमुद्रेत असतो. त्याच्या इतर उजव्या हातांत त्याचा एक दात (सुळा), त्याचप्रमाणे गदा, अक्षयमाला व अंकुश असतो. त्याच्या डाव्या हातांत फळ, लाडू, मोदक, परशू व पाश असतो. हेरंभाचे हे रूप भारतापेक्षा नेपाळातच अधिक लोकप्रिय आहे.
हरिद्र गणपती ः गणेशाच्या या रूपाला रात्रीगणपतीही म्हणतात. हरिद्र गणपती हा हळदीसारखा पिवळ्या वर्णाचा असतो. तो चतुर्भुज असून त्याच्या हातांत पाश, अंकुश, तुटलेला सुळा व मोदक असतो. हरिद्र गणपती हा आपल्या भक्तांचा रक्षणकर्ता आहे. त्यामुळेच भक्तजनांचा तो प्रिय गणेश आहे.
दक्षिणामनया शास्त्रात तो पिवळ्या रंगाचा असल्याचे म्हटले आहे. त्याने पिवळे पितांबर धारण केलेले असते. तो रत्नजडित सिंहासनावर बसलेला असून सहा भुजाधारक आहे. त्याच्या उजव्या बाजूकडील हातात अंकुश व इतर दोन हस्त अभयमुद्रेत व क्रोधमुद्रेत असतात तर डाव्या हातात पाश, परशू व एक हात वरदमुद्रेत असतो.
विघ्नहर्ता गणेश हा सर्व भक्तांचा रक्षक आहे. शुरांना तो शक्ती देतो, बुद्धिवंतांना बुद्धी देतो तर कलावंतांना कला देतो. सर्व विद्यांचा तो दाता आहे. त्याच्या चरणी समर्पित होऊन शरण गेल्यास तो आपल्या भक्तांना कधीच रिक्तहस्ते पाठवीत नाही. वाटेत आलेली कसलीही विघ्ने क्षणार्धात नष्ट करण्याची शक्ती त्याच्यापाशी आहे.
भक्तांचा तारक श्री गणेश ऋद्धीसमवेत वा ऋद्धी-सिद्धीसमवेत पुजल्यास तो सार्‍या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. गणेशाच्या या रूपाला शक्तीगणेश असेही म्हटले जाते. भक्तांचा तारक म्हणूनच सार्‍या भारतात व भारताबाहेरही गणेश अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा कृपा वर प्राप्त करण्यासाठी सगळीकडे त्याचे मनःपूर्वक पूजन करण्यात येते.
महोत्कट विनायक
महोत्कट हे विनायकाचे महत्त्वाचे रूप आहे. भक्तरक्षणासाठी व देवदेवतांवरील अन्याय दूर करण्यासाठी विनायकाने हे रूप धारण केले होते. फार वर्षांपूर्वी पृथ्वीवर रुद्रकेतू ब्राह्मण व त्याची पत्नी अरण्यात ध्यान करत होती. त्या सत्‌शील व सुस्वभावी दांपत्याच्या पोटी नरान्तक व देवान्तक हे दोन पुत्र जन्माला आले. दोघेही अत्यंत गुणवान व रूपवान होते. त्यांच्या जन्मामुळे पती-पत्नीला धन्यता वाटू लागली. दोघांनाही त्यांनी न्याय-नीतीचे व धर्माचरणाचे शिक्षण दिले.
नरान्तक व देवान्तक या दोघाही भावांनी तारुण्यात पदार्पण करताच शिवाला प्रसन्न करून घ्यायचे ठरवले. शिवप्राप्तीसाठी त्यांनी घराचा त्याग करून अरण्यात प्रस्थान केले व घोर तपश्‍चर्या केली. शिव त्यांच्या तपश्‍चर्येवर प्रसन्न झाला व त्यांना वर मागण्यास सांगितले.
नरान्तक व देवान्तक या दोघाही भावांनी अजरामर होण्यासाठी देव, दानव, मनुष्य, पशुपक्षी यांच्या हातून आपल्याला मरण येऊ नये असा वर मागितला. शिवाने त्यांना वर देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण केले. वर प्राप्त झाल्यामुळे दोघाही भावांना गर्व झाला. त्यांनी देवांनाही पराजित केले. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांवर त्यांनी कब्जा मिळवला. सगळीकडे त्यांनी अराजक माजविले. त्यांच्या राज्यात शांततेने राहणार्‍या, देवदेवतांना मानणार्‍या नागरिकांवर अन्याय होऊ लागला. आसुरी आनंद मिळवण्यासाठी दोघेही भाऊ अराजकतेने सत्ता गाजवू लागले. देवलोकांतही हाहाकार पसरला.
देवमाता कश्यपपत्नी अदितीने इंद्रादी देवांना जन्म दिला होता. परंतु ती त्यावर समाधानी नव्हती. तिला इंद्रापेक्षाही ताकदवान, बुद्धिमान पुत्र हवा होता. सार्‍या पृथ्वीवर अधिराज्य गाजवणारा देवांचा देव व सर्व सृष्टीचा कर्ता असणारा आत्माच तिला पुत्ररूपी हवा होता. तिने आपली मनोकामना कश्यप ऋषींना सांगितली. कश्यपानी तिला त्यासाठी तप करण्याची सूचना केली. पतिआज्ञेनुसार ती तपश्‍चर्येसाठी वनात गेली व तपश्‍चर्या करू लागली.
अदितीच्या तपश्‍चर्येवर प्रसन्न होऊन गणेश मूळ रूपात तिच्यासमोर प्रगट झाला. विनायकाचे वा गणेशाचे मूळ रूप पाहून अदितीचा विश्‍वासच बसत नव्हता. गजमुखी विनायकाचे रूप कामदेवाहून मोहक होते. त्याच्या कानातील कुंडले अतितेजाने चमकत होती. गजमुखी विनायकाला दहा हात होते व त्याच्या गळ्यात रत्नजडित हार होता. त्याच्या हातांत इतर शस्त्र-अस्त्रांबरोबर परशू व पद्म होते, तर गळ्यात सर्परूपी यज्ञोपवीत होते. सार्‍या अंगावर त्याने विविध आभूषणे धारण केली होती.
विनायकाचे ते तेजस्वी रूप अधिक पाहणे शक्य न झाल्याने अदितीने डोळे मिटून आपले तेज कमी करण्याची विनायकाला विनंती केली. ती त्याचे गुणगान करू लागली. विनायकाने प्रसन्न होऊन अदितीला वर मागण्यास सांगितले. अदितीने विनायकाला आपल्या पोटी पुत्ररूपी जन्माला येऊन अराजकता माजवणार्‍या दैत्यांचा संहार कर अशी विनंती केली. अदितीची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असा वर देऊन विनायक गुप्त झाला.
नरान्तक व देवान्तक या दोघाही भावांनी सगळीकडे अराजकता माजवली होती. देवदेवतांची पूजा, यज्ञयाग यांवर त्यांनी बंदी घातली. यज्ञयाग केल्यास त्याचा ते विध्वंस करत. यज्ञयाग करणार्‍यांना मारून टाकत. त्यांच्यापुढे सारे देव हतबल झाले. त्यांनी विनायकालाच साकडे घालायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी विनायकाचे ध्यान करून त्याला प्रसन्न करून घेतले व नरान्तक व देवान्तक यांच्या जाचातून सर्वांना मुक्त करण्याची विनंती केली. विनायकाने देवांची विनंती मान्य करून त्या दोघाही दैत्यांचा नाश करण्यासाठी आपण पृथ्वीवर अवतार घेणार असल्याचे सांगितले.
विनायकाने काही दिवसांनी आदितीच्या पोटी पुत्ररूपी जन्म घेतला. अदितीला त्या बालकाच्या दिव्य रूपाने मोहिनी घातली. हत्तीचे मस्तक व त्याची सोंड पाहून तो विनायकच जन्माला आल्याचे तिला समजले.
तिने त्या बालकाचे नाव महोत्कट ठेवले. नरान्तक व देवान्तक यांच्या वधासाठी विनायकाने महोत्कट रूप धारण केल्याचे सर्वांना समजले. बालरूपी विनायकाच्या बाललीला पाहण्यासाठी वसिष्ट वगैरे ऋषींनी कश्यप ऋषीच्या आश्रमास भेट दिली व बालविनायकाचे दर्शन घेऊन ते तृप्त झाले.
विनायकाच्या महोत्कट रूपामागचे रहस्य नरान्तक व देवान्तकाला समजले. त्यांनी दैत्यसभा बोलावली व देवांचे कपटकारस्थान सर्वांना सांगितले. बालविनायक मोठा होऊन नरान्तक वा देवान्तक यांना मारण्यापूर्वीच त्याचा वध करावा असे त्यांनी ठरविले. विराझा या राक्षशिणीने बालविनायक वा महोत्कटास मारून टाकण्याचे आश्‍वासन देऊन ती कश्यप ऋषीच्या आश्रमात आली. आजूबाजूला कोणी नाही असे पाहून तिने सुंदर स्त्रीचे रूप घेतले व ती आश्रमात शिरली. महोत्कटाला उचलणार तोच महोत्कटाने तिच्यावर लाथ मारली. महोत्कटाच्या एकाच लाथेने ती यमसदनास पोचली व तिचा विशाल देह आश्रमात पडला.
बलिष्ठ अशा विराझा राक्षशिणीच्या मृत्यूने नरान्तक व देवान्तकाला खूपच राग आला. मग महोत्कटास मारण्यासाठी त्यांनी उद्धाट व धुंधुरा या राक्षसांना पाठविले. या दोघानी मायावी विद्येद्वारे पोपटाचे रूप धारण केले. पोपटाचे मोहक रूप घेऊन महोत्कटाला ते आपल्याकडे आकर्षित करत होते. त्यांचे कपट महोत्कटाच्या लक्षात आले. त्याने मातेची नजर चुकवून त्या पोपटांचा पाठलाग केला व त्यांच्या माना पकडून त्यांना ठार मारले. पोपटांचा मृत्यू होताच त्या दोघांचेही रूपांतर राक्षसात झाले. त्याचवेळी अदिती तेथे पोचली. महोत्कटाशेजारी मरून पडलेले राक्षस पाहताच अदितीने महोत्कटास उचलून घेतले व ती आश्रमात गेली.
महोत्कट मोठा होत असताना कित्येक लहान-मोठ्या घटना होत होत्या. त्यातून त्याचे दिव्य तेज अधिकच प्रगट होत होते. एक दिवस अदिती महोत्कटाला घेऊन तलावावर कपडे धुण्यासाठी गेली. त्या तलावात रक्तपिपासू भयंकर मगरी राहत होत्या. त्या मगरी माणसे, पशुपक्षी जे काही मिळेल ते पकडून गिळंकृत करीत होत्या. ऋषींनाही त्याठिकाणी स्नान करताना सावधगिरी बाळगावी लागत असे.
अदिती महोत्कटाला किनार्‍यावर बसवून कपडे धुण्यात मग्न झाली. मातेचे आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून महोत्कट तलावाच्या पाण्यात उतरला. त्याचवेळी एका मगरीने त्याला पकडले व ती त्याला खोल पाण्यात घेऊन गेली. ते दृश्य पाहून लोकांनी आरडाओरड केली. अदिती तर बेशुद्धच पडली. काही क्षणांतच डोळ्यांवर विश्‍वास न बसणारे दृश्य सर्वांना दिसले. महोत्कट आपल्या पाठीवर मगरीला घेऊनच वर आला. नदीच्या काठावर येताच मगरीच्या ठिकाणी एक तेजाने तळपत असलेला माणूस दोन्ही हात जोडून उभा असलेला सर्वांना दिसला. त्याने महोत्कटास नमस्कार केला व आपले नाव गंधर्वराज चित्रगंधर्व असल्याचे सांगितले. भृगू ऋषींच्या शापामुळे आपण मगर बनून येथे राहत होतो. तुझ्या स्पर्शानेच आपली शापातून मुक्तता झाल्याचे त्याने सांगितले. भृगू ऋषीने दिलेल्या शापामागची कथाही त्याने सांगितली. गंधर्वांचा राजा चित्रगंधर्वाने आपल्या लग्नप्रसंगी मोठ्या समारंभाचे आयोजन केले होते. देवदेवता, ऋषीमूनीना त्याने आमंत्रण दिले होते. भृगू ऋषीही त्याच्या या समारंभास हजर होता. चित्रगंधर्वाने सर्वांचे स्वागत, आदरातिथ्य केले, पण भृगू ऋषीकडे त्याने पाहिलेही नाही. भृगू ऋषीना चित्रगंधर्वाच्या या वागण्याचा राग आला व रागानेच त्याने चित्रगंधर्व मगर होऊन पृथ्वीवर राहणार असल्याचा शाप दिला. चित्रगंधर्वाने विनंती केल्यावर कश्यपपुत्र महोत्कट तुला या शापातून मुक्त करेल असे सांगितले. शापातून मुक्त झाल्याने चित्रगंधर्वाने महोत्कटाचे आभार मानले व तो गंधर्वलोकी निघून गेला.
महोत्कट लहान असताना घडलेली आणखी एक घटना त्याच्या देवत्वावर प्रकाश टाकून गेली. एके दिवशी कश्यप ऋषीच्या आश्रमात गंधर्वलोकांतून तुंबरू व इतर गंधर्व आले होते. कश्यप ऋषीनी त्यांचे स्वागत व आदरातिथ्य केल्यावर सर्व ऋषींनी नदीत स्नान करून शिव, पार्वती, विष्णू, विनायक व सूर्य या देवतांच्या मूर्ती मांडून त्यांची पूजा आरंभली. महोत्कट हा स्वभावाने खोडकर होता. सर्वजण डोळे मिटून देवाची आराधना करताहेत हे पाहून त्याने सर्वांच्या नकळत सर्व मूर्ती काढून फेकून दिल्या.
गंधर्वांना काही वेळाने आपल्या देवतांच्या मूर्ती नाहीशा झाल्याचे दिसले. त्यांनी आपली कैफियत कश्यप ऋषीकडे मांडली. कश्यप ऋषीना यावेळी महोत्कटाचाच संशय आला. त्याने महोत्कटास भीती घातली, त्याला दटावले व सत्यस्थिती कथन करण्यास सांगितले. महोत्कटाने आपल्याला काही महीतच नाही असे भासवले. कश्यप ऋषी त्यामुळे त्याच्यावर अधिकच रागावले. महोत्कटाने त्यावेळी मी त्या मूर्ती गिळल्या असतील असे तुम्हाला वाटत असेल तर माझ्या तोंडात पाहा असे सांगून तोंड उघडले. अदितीने त्याच्या तोंडात पाहिले तर सारे ब्रह्मांडच त्याच्या तोंडात होते. महोत्कटाच्या तोंडात ब्रह्मांड पाहून अदिती बेशुद्धच पडली. कश्यप व गंधर्वांनाही महोत्कटाच्या तोंडात ब्रहांड दिसले. त्यामुळे त्याला शिक्षा करणे उचित होणार नाही हे त्यांना कळून चुकले. दैवी अंश असलेले हे बालक आहे याची त्यांना परत एकदा प्रचिती आली. गंधर्वांनी महोत्कटाची माफी मागितली व ते गंधर्वलोकी निघून गेले.
महोत्कट मोठा होत असताना राक्षस त्याला मारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतच होते. कश्यप ऋषीनी महोत्कटाची मुंज करायचे ठरविले. त्याचवेळी राक्षसांनी त्याला मारण्यासाठी कारस्थान रचले. वेगवेगळ्या ठिकाणांहून मुंज कार्यक्रमासाठी ब्राह्मणांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या ब्राह्मणांमध्ये राक्षस ब्राह्मणाचा वेष धारण करून मिसळून राहिले. त्यांनी आपल्या कमंडलूमध्ये शस्त्रास्त्रे लपवून ठेवली होती. मुंज कार्यक्रमास सुरुवात होत असताना हे ब्राह्मणरूपी राक्षस महोत्कटास मारण्यासाठी तत्पर झाले. महोत्कट सावध होता. त्याने हातात तांदूळ घेऊन राक्षसांवर मारले आणि तत्‌क्षणी ते ब्राह्मणरूपी राक्षस मरून पडले. त्यानंतर महोत्कटाचा मुंज कार्यक्रम संपन्न होऊन त्याने यज्ञोपवीत धारण केले.
महोत्कटाने लहानपणापासूनच आपले दैवीगुण दाखविले होते. अराजकता पसरविणार्‍या दैत्यांना, अधर्मी लोकांना शिक्षा देण्यासाठी त्याने जन्म घेतला होता. वयात येताच महोत्कटाने नरान्तक व देवान्तक या दैत्यबंधूंवर हल्ला करून त्यांना मारून टाकले व इंद्रादी देवांना स्वर्गलोक परत मिळवून दिले. सर्व लोकांना अन्यायी, अराजकता पसरविणार्‍या दैत्यांच्या छळापासून मुक्ती मिळवून देणारा हा महोत्कट म्हणजे गणेशाचेच मूळ रूप आहे.