मुंबईवरील दहशतवादी हल्ला कटातील एक आरोपी तहव्वूर राणा अखेर अमेरिकेकडून भारताच्या हवाली झाला. तब्बल सतरा वर्षांनी का होईना, त्याच्याभोवती भारतीय न्यायसंस्थेचे पाश आवळले गेले. ह्या राणाचा मुंबई हल्ल्याशी संबंध म्हणजे हल्ल्याच्या नियोजनामध्ये ज्याने प्रमुख भूमिका बजावली, ज्याने प्रत्यक्ष भारतात येऊन हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणांची व्यवस्थित रेकी केली, त्या दाऊद सईद गिलानी ऊर्फ डेव्हीड कोलमन हेडलीला भारतात वावरण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत ह्या राणाने केली होती. त्यामुळे डेव्हीड कोलमन हेडलीच्या तुलनेत राणा हा तसा दुय्यमच मानायला हवा. याउलट हेडली हा मुंबई हल्ला कटात प्रत्यक्षपणे सामील होता. मात्र, अमेरिकेने हेडलीला भारताच्या हवाली केलेले नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. हेडली हा डबल एजंट होता. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा आणि पाकिस्तानची आयएसआय या दोन्हींसाठी तो काम करायचा. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती तो भारतीय तपास यंत्रणांपुढे ओकेल ह्या भीतीनेच अमेरिकेने त्याला भारताच्या हवाली न करता त्याला माफीचा साक्षीदार करून आपल्या ताब्यात ठेवले आहे. हेडली ताब्यात आला असता तर त्याला पोपटासारखा वदवून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे सगळे धागेदोरे जुळवण्याची संधी राष्ट्रीय तपाससंस्थेला लाभली असती. परंतु काही वर्षांपूर्वी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची जबानी घेण्याची एकमेव संधी भारताला देण्यात आली होती. त्यात त्याने ज्या अनेक गोष्टी उघड केल्या, त्यातूनच ह्या तहव्वूर राणाचे नावही समोर आले. तेव्हा हेडलीने मुंबईवरील हल्ल्याचा सगळा पाढा घडाघड वाचला होता. हल्ल्याची रेकी करण्यासाठी आपण भारतात कसे आलो, गोव्यासह वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी कशी केली, भारतात येण्यासाठी पैसा आणि अन्य साधनबळ तहव्वूर राणाने कसे उपलब्ध करून दिले, पाकिस्तानात आपल्याला आयएसआयने कशी मदत केली, तो सगळा तपशील हेडलीने तेव्हा उघड केला होता. आयएसआयचा मेजर अली आणि मेजर इक्बाल यांनी आपली गाठ साजीद मीर ह्या हँडलरशी घालून दिली असेही त्याने सांगितले होते. आता तहव्वूर राणाच्या जबानीतून हेडलीने दिलेल्या माहितीला दुजोरा मिळू शकेल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामधील पाकिस्तानच्या आयएसआयच्या सहभागावर तहव्वूर राणा अधिक प्रकाश टाकू शकतो. परंतु त्यासाठी एनआयएला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. हेडली आणि राणा हे दोघेही मूळचे पाकिस्तानातील शाळकरी मित्र. दोघेही नंतर अमेरिकेत वास्तव्यास गेले. राणाने कॅनडात फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कंपनी चालवली. तिच्याच माध्यमातून त्याने हेडलीला भारतात पाठवले होते. भारतात एक कार्यालय उघडून त्या आडून भारतविरोधी कारवाया करण्याचे हे कारस्थान होते. येथे कोण कोण त्याच्या संपर्कात आले होते आणि आयएसआयचे कोणते हस्तक त्याला येथे मदत करीत होते ही माहिती तहव्वूर राणापाशीही असेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार असलेले हाफीज सईद आणि झाकीउर रेहमान लखवी यांनी आयएसआयच्या सहभागानिशी हा कट कसा आखला आणि त्याचे नियोजन कसे केले. अमेरिकेपर्यंत त्यांचे धागेदोरे कसे पोहोचले ह्या सगळ्या कथानकाची माहिती तहव्वूरला असू शकते. त्यामुळे ती माहिती सप्रमाण उघड झाली तर पाकिस्तानच्या पदराखालून आजवर हुलकावणी देत आलेल्या दहशतवादी म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीनेही भारताला प्रयत्न करता येतील. मुंबईवरील हल्ल्याचा कट काही एक दोन महिन्यांत शिजलेला नाही. वर्षानुवर्षे त्याची तयारी सुरू होती. हेडली भारतात 2005 साली आला होता, यावरून ह्या कटाची तयारी कशी चालली होती हे लक्षात येईल. हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. त्याला पस्तीस वर्षांची शिक्षा झाली आहे. अजमल कसाब पकडला गेला आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यात आणि तिची कार्यवाही करण्यात आपण यशस्वी ठरलो. तहव्वूर राणा अनायासे भारताच्या ताब्यात आला आहे. अमेरिकेत तो मुंबई हल्ला प्रकरणात पुराव्यांअभावी सुटला होता. केवळ हेडलीच्या जबाबामुळे तो गोत्यात आला हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे तहव्वूर राणा केवळ भारतात येणे पुरेसे नाही. त्याला त्याच्या मुंबई हल्ल्यातील सहभागाच्या गुन्ह्याची कठोरातील कठोर सजा आपल्याला देता आली पाहिजे. राष्ट्रीय तपास संस्थेवरील ती मोठी जबाबदारी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचा बुरखा आता फाडला गेलाच पाहिजे. आयएसआयने भारतात आजवर प्रचंड रक्तपात घडवला. दहशतवादी शक्ती सगळे करून नामानिराळ्याच राहिल्या. आता त्या सगळ्याचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे.