तस्मात्‌‍ सर्वेषु कालेषु मां अनुस्मर…

0
12

गीता-मानस ः 27

  • प्रा. रमेश सप्रे

नामस्मरण करणारी मंडळी जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा अंतकाळी त्यांच्या मनात जे विचार, ज्या कल्पना, ज्या इच्छा किंवा वासना करतात, त्यानुसार त्यांची पुढची गती (पुढचा जन्म) ठरते. अशी व्यक्ती मुक्त होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला पुनर्जन्म घ्यावा लागतो.

भगवंत आणि त्यांचा सखा अर्जुन यांच्यातील मधुर नात्याचा प्रत्यय गीतेतील अमृत-संवादात वारंवार येतो. ‘या जन्मात करत असलेली साधना जर अपूर्ण राहिली तर पुढे गती काय?’ या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणतात- ‘कोणत्याही योगाची साधना मृत्यूच्या वेळेस अपुरी राहिली तर पुढच्या जन्मात ज्या कुटुंबात जन्म होईल तेथे आधीची साधना पुढे चालू ठेवण्याची संधी माणसाला मिळते. यासाठी आधीच्या (पूर्व)जन्मातील उपासनेतील आस्था, आर्तता, उत्कटता महत्त्वाची असते.’

यापुढे भगवंत अध्यात्मशास्त्रातला एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. त्यांच्याच शब्दात-
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌‍ ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥8।5॥
याचा अर्थ- जो (माणूस) अंतकाळी माझंच स्मरण करत शरीर सोडून जातो तो माझ्या स्वरुपाला प्राप्त होत असतो; यात काहीही संशय नाही. शेवटच्या श्वासाला (क्षणाला) जर परमेश्वराचं (भगवंताचं) स्मरण करत देहत्याग केला तर तो माणूस (मृत्यूनंतर) माझ्याशी एकरूप होतो, माझ्या स्वरुपात येऊन मिळतो. त्याला पुनर्जन्म नाही. यात काहीही संशय नाही.

अंतकाल म्हणजे अखेरचा क्षण, अखेरचा श्वास हेच समजणं योग्य होईल. परीक्षितानं यासंदर्भात शुकदेवांना एक प्रश्न विचारलाय (तो प्रश्न आपल्या वतीनंच विचारलाय). तो म्हणतो, ‘मी अनेक व्यक्तींना मृत्यूपूर्वी अत्यंत असहाय झालेलं पाहिलंय. त्यांची अनेक इंद्रियं निकामी होतात. नीट ऐकू येत नाही, नीट दिसत नाही आणि एखादी व्यक्ती वा वस्तू दिसली तरी ती ओळखता येत नाही. स्मृती अत्यंत क्षीण होते. अनेकांना तर पूर्ण विस्मृतीच होते. अशा अवस्थेत शेवटच्या क्षणी तोंडात भगवंताचं नाम कसं येणार किंवा तुझं स्मरण तरी कसं होणार? आणि अशा परिस्थितीत जर मृत्यू आला तर त्या व्यक्तीची मृत्यूनंतरची गती कशी असते?’
परीक्षिताचं निरीक्षण अगदी अचूक आहे. आजकाल वैद्यकीय उपचारपद्धती एवढी सुधारलीय की डॉक्टर, उपचार नि औषधं यांच्या मदतीनं व्यक्तीचा मृत्यूशी चांगला संघर्ष चालू राहतो. श्वास अगदी मंद झाला तर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्राचा (व्हेंटिलेटर) उपयोग किंवा प्रयोग केला जातो. या सर्व झटापटीत नि खटपटीत शेवटच्या श्वासाला किंवा क्षणाला भगवंताचं स्मरण कसं शक्य असणार आहे? परीक्षित असंही विचारतो की ‘एवढा अवघड नियम भगवंतांनी का केला?’
यावर शुकमुनींचं उत्तर लक्षात ठेवण्यासारखं आणि तर्कशुद्ध (लॉजिकल) आहे. ते म्हणतात- जोपर्यंत सर्व इंद्रियं, विशेषतः स्मृती कार्यक्षम असते त्या अवस्थेच्या अखेरच्या क्षणी भगवंताचं स्मरण झालं तरी ते पुरेसं असतं.
अलीकडच्या काळातील संत पू. गोंदवलेकर महाराज यासंदर्भात एक महत्त्वाचं रहस्य सांगतात. त्यांच्या मते अखंड ईश्वराच्या स्मरणात किंवा नामस्मरणात असलेल्या माणसाच्या शेवटच्या क्षणी तो ज्याच्या निरंतर स्मरणात असतो, तो देव किंवा सद्गुरू त्याला शुद्धीवर आणतो, त्याची स्मृती जागृत करतो नि शेवटचा श्वास ईश्वरस्मरणात जाईल याची व्यवस्था करतो.

‘मनाचे श्लोक’ या आपल्या अपूर्व रचनेत समर्थ श्रीरामदास स्वामी म्हणतात-
काशीला ज्याला मरण येतं तो मुक्त होतो, कारण अंतकाळी-
स्वये नीववी (शांत करतो) तापसी चंद्रमौळी (शंकर)।
तुम्हां (जना) सोडवी राम हा अंतकाळीं ॥ श्लो. 85॥
आणखी एका श्लोकात समर्थ रामदास म्हणतात-
जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी।
मुखे नामनामावळी नित्य काळीं।
जिवां हीत सांगे सदा चंद्रमोळी (काशी विश्वेश्वर) ॥99॥
अशी जनसामान्यांची धारणा (विश्वास) आहे की काशीत मरणाधीन असलेल्या व्यक्तीच्या अखेरच्या क्षणी प्रत्यक्ष काशीनाथ (महादेव) त्या व्यक्तीच्या मनात रामनामाचा उच्चार करतात आणि त्याचा मुक्तीचा मार्ग सोपा करतात. शेवटी स्वतःच्या नामाचा उच्चार न करता रामनामाचा उच्चार करतो, याचं कारण शिवशंकर सदैव रामनामच जपत असतो. असं म्हटलं जातं-
एकवीस सहस्र सहाशे जप।
हे बोलिले शिवाचे (रामनामाचे) माप॥
आरोग्यवान व्यक्ती संपूर्ण दिवसात (चोवीस तासांत) एकूण एकवीस हजार सहाशेवेळा श्वास घेतो. शंकर तेवढं नाम घेतो याचा अर्थ प्रत्येक श्वासावर त्याचं ‘राम-राम’ (रामनाम) चालू असतं. अनेकांच्या नित्यपाठातील अतिशय मधुर स्तोत्र म्हणजे ‘श्रीरामरक्षा.’ या स्तोत्राचे लेखक जरी बुधकौशिक ऋषी असले तरी प्रत्यक्षात सदाशिव शंकरच आहेत. मुळात रामरक्षा हा शंकर-पार्वती यांच्यातीलच हृद्य संवाद आहे, ज्याचा उत्कर्षबिंदू (क्लायमॅक्स) आहे अखेरचा (निर्वाणीचा) श्लोक, ज्यात शंकराची रामनाम भक्ती प्रत्ययकारक रीतीनं व्यक्त होते-
राम रामेति रामेति, रमे रमे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने॥
याचा अर्थ स्पष्ट आहे. विष्णुसहस्रनाम स्तोत्रात जरी एक सहस्त्र (हजार) भगवान विष्णूची नामं असली तरी त्यांतील एक ‘राम’ नाम हे हजार नामांएवढे तुल्यबळ (समर्थ) आहे.

इथे रामनामाचा उल्लेख आहे याचा अर्थ असा नव्हे की फक्त रामनाम शेवटच्या क्षणी घेतलं तर मुक्त होता येतं. इथं नामापेक्षा नामावरची श्रद्धा, निष्ठा नि नामसाधना महत्त्वाची आहे. मग ते नाम कोणत्याही देवदेवतेचं वा संत-सद्गुरूचं असो.
यासंदर्भात भगवंत अर्जुनाला पुढं सांगतात-
यं यं वापि स्मरन्‌‍ भावं त्यजति अन्ते कलेवरम्‌‍।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥8।6॥
म्हणजे, हे अर्जुना, अंतकाळी ज्या-ज्या काही भावाचे (ईश्वरभावाचे) स्मरण करत माणूस शरीराचा त्याग करतो, त्या-त्या भावाचं तो सदैव चिंतन करीत असल्यामुळे त्यालाच प्राप्त होतो. किंवा ज्याचं नाम घेतलं जातं त्या देवदेवतेच्या लोकाला तो प्राप्त होतो. म्हणजे शिवाचं नाम घेणारा ‘कैलासलोकांत’, विष्णूचं नाम घेणारा ‘वैकुंठात’, श्रीकृष्णाचं नाव घेणारा ‘गोलोकात’, श्रीरामाचं नाम घेणारा ‘साकेत श्लोकात’ इ. प्रवेश करतो. याचं कारण स्पष्ट आहे की मनुष्य सदा ज्या नामाचं (भावाचं) चिंतन करतो त्याचेच स्मरण त्याला अंतकाळीही होते.
इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नामस्मरण करणारी मंडळी जेव्हा मृत्यू पावतात तेव्हा अंतकाळी त्यांच्या मनात जे विचार, ज्या कल्पना, ज्या इच्छा किंवा वासना करतात, त्यानुसार त्यांची पुढची गती (पुढचा जन्म) ठरते. अशी व्यक्ती मुक्त होत नाही. म्हणजे त्या व्यक्तीला पुनर्जन्म घ्यावा लागतो.

अनेकांना पूर्वजन्म- पुनर्जन्म ही कल्पनाच मान्य नसते. त्याविषयी आग्रह नसावा. प्रत्येकानं आपल्या श्रद्धेनुसार जीवन जगावं. सध्याच्या समाजमाध्यमांच्या युगात, संगणक महाजालाच्या (इंटरनेटच्या) जमान्यात जगातील सर्व टोकांच्या, दिशांच्या घटना, वार्ता आपल्यापर्यंत पोचतात. यात आधीच्या जन्मातल्या स्मृती जाग्या झालेल्या नि त्याचे पुरावे प्रत्यक्ष मिळत असलेल्या काळात अनेकांना पुनर्जन्माच्या सिद्धांतात काही तथ्य (सत्य) असावं असं वाटू लागलंय. पण तो आपला विषय नाही.

या सर्व चर्चेतून आपण नाम घेण्याचा प्रयास अन्‌‍ अभ्यास करायचा संकल्प केला तर आपल्यालाच आपल्या आतून शांतीचा, तृप्तीचा, समाधानाचा अनुभव येईल. पण ‘केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे॥’ या सूत्रानुसार आधी नामाचा अभ्यास करून जो अनुभव आपल्याला येईल त्यावरून हे ठरवावे. कारण पुनर्जन्माचा सिद्धांत जसा सिद्ध करता येत नाही तसा तो असिद्धही करता येत नाही. असो.
भगवंताचं अंतकाळच्या (मृत्युसमयीच्या वेळेचं) नामामुळे जन्म-मृत्यू चक्रातून मुक्ती मिळते हे ऐकून अर्जुनाला वाटलं हे सारं किती सोपं आहे! मृत्यूच्या शेवटच्या क्षणी, अखेरच्या श्वासाला ‘कृष्णा’ या नामाचा उच्चार केला की कृष्णातच विलीन होऊन जायचं. पुनर्जन्म वगैरे काही नाही, हा अर्जुनाच्या मनातला भाव समजून भगवंत म्हणतात- ‘तू विचार करतोयस तो अगदी बरोबर आहे. शेवटच्या श्वासाला परमेश्वराचं स्मरण केलं, नाम घेतलं की मुक्ती मिळालीच. यात एकच अडचण आहे ती म्हणजे, आपला शेवटचा श्वास कुठं-कधी-कसा (कोणत्या परिस्थितीत) घेतला जाईल याची कुणालाही कल्पना असू शकत नाही.’

आपल्या विचारातली चूक लक्षात आल्यावर अर्जुनानं प्रश्नार्थक नजरेनं भगवंताकडे पाहिल्यावर भगवंत यावर बाहेरून एक अतिशय सोपा पण आतून तितकाच कठीण उपाय सुचवतात. ते म्हणतात-
तस्मात्‌‍ सर्वेषु कालेषु मां अनुस्मर युध्य च ।
मयि अर्पित मनोबुद्धिः मामेवैष्यस्यसंशयः ॥8।7॥
अत्यंत महत्त्वाचा हा सिद्धांत आहे. भगवंतांनी जीवनातील आनंदासाठी, अंतकाळीच्या शांत, तृप्त मनोवृत्तीसाठी एक अमोघ उपाय सांगितलाय. ते अर्जुनाला सांगतात- म्हणून सर्व काळी (प्रत्येक श्वासाला) भगवंताचं (नाम)स्मरण करत राहावं. म्हणजे केव्हाही- कुठेही- कसाही अखेरचा श्वास घेतला गेला तरी त्याच्यावर भगवत्‌‍स्मरणाची नाममुद्रा उमटलेली असेलच.
कोणत्याही दिव्य शक्तीचं (नाम) स्मरण हे आकाशापेक्षा सूक्ष्म असल्याने सर्व काळी- सर्व स्थळी- सर्व व्यक्ती पशुपक्षी-वनस्पती-वस्तू यांच्या सान्निध्यात असताना; सर्व क्रियांत, सर्व कृतींत नि जीवनातील सर्व घटनाप्रसंगात ते (दिव्य स्मरण) अखंड चालू राहू शकतं. -खरा अभ्यास याचाच तर करायचाय. तोही निश्चयपूर्वक संकल्प करूनच. यासाठी तो भगवंतच किंवा ती दिव्य शक्तीच आपल्याला योग्य ती बुद्धी नि संधी देईल हे निश्चित!
हे सारं सांगताना भगवंत ‘माम्‌‍ अनुस्मर युध्य च’ सांगायला विसरले नाहीत. कारण साधन (नामस्मरण) नि साधना; तसेच उपासना (परमार्थ) नि जोपासना (प्रपंच) दोन्हीही एकाच वेळी चालू राहिले पाहिजेत. यातच व्यक्तीचं नि समाजाचं हित आहे. बघा विचार करून.