तिस्क-उसगावात मद्य तस्करीचा पर्दाफाश; चौघांना अटक

0
2

अवैध मद्यसाठ्यासह दोन ट्रक, 29 वाहनक्रमांक पट्ट्या अन्‌‍ दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सोमवारी मध्यरात्री तिस्क-उसगाव येथील एका गोदामावर छापा टाकत मद्यतस्करीचा पर्दाफाश केला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यसाठा, दोन कंटेनर ट्रक, वेगवेगळ्या राज्याच्या 29 वाहन क्रमांक पट्ट्या व इतर ऐवज जप्त केला असून, या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण सुमारे दीड कोटींचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल दिली.
गुन्हा अन्वेषण विभागाला मद्य तस्करीबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणात गोविंद सिंग राजपूत (24, रा. गिंगला, राजस्थान), मुकेश आदिवासी (50, रा. सालुंबर, राजस्थान), महेंद्रसिंग राजपूत (28, रा. अहमदाबाद, गुजरात) आणि प्रकाश शंकर मीना (28, रा. उदयपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या छाप्यात संशयित आरोपींना बनावट आणि भेसळयुक्त मद्यसाठ्यासह ताब्यात घेतले. पोलिसांनी 12040 मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच, वेगवेगळ्या राज्यांच्या 29 वाहन नोंदणी क्रमांकपट्ट्या, प्रिंटर मेक एप्सन एल-3250, ट्रक आयशर (क्र. एमएच-40-सीडी-1933), ट्रक अशोक लेलँड (क्र. एमएच-40-सीटी-2814), एक रबर स्टॅम्प, चार इनव्हॉइस आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 1,50,00,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
गुन्हा विभागाने या प्रकरणात बीएनएस कायदा, 2023 च्या कलम 125, 274, 318(4), 335, 336(2), 336(3), 340(2) आर/डब्ल्यू 29 आणि गोवा दमण आणि दीव उत्पादन शुल्क कायदा, 1964 च्या कलम 30 (अ) आणि (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा विभागाचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, कमलेश धारगळकर, संदेश वळवईकर, क्रितेश किनळेकर, आदर्श गवस, सुदेश मठकर, होमगार्ड नीतम खोत यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.