तव चरणौ प्रणमामः

0
7
  • मीना समुद्र

देवी सरस्वतीच्या मूर्तीकडे पाहून भान हरपते. मन एकाग्र होते. बुद्धीला अनेक प्रकारे चालना मिळते. नवनवीन कल्पनांचे धुमारे फुटतात. ही केवळ चौदा विद्यांची- ज्ञानाचीच नव्हे तर चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता आहे, त्यामुळे ती सर्ववंद्य ठरते.

नवरात्रात देवी नवरूपात अवतरते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही तिची नानाविध रूपं. अंबा, उमा, पार्वती, महालक्ष्मी, जगदंबा, काली, दुर्गा अशा कोणत्याही नावाने संबोधले तरी ती सर्व एकाच जगतजननीची रूपं! दुष्टदमन आणि मानवकल्याणार्थ देवीने अनेक ठिकाणी अनेक प्रकारची रूपं धारण केली. स्थान आणि कालपरत्वे भक्तांच्या भावनेनुसार, कल्पनेनुसार अशी विविधांगी रूपं दिसत असली तरी देवीतत्त्व एकच असते. भक्ताला ते-ते रूप दिसते, भावते आणि पावतेही. या देवीतत्त्वात शक्ती, भक्ती, ममता आणि ज्ञान सामावलेले दिसते. उग्र चण्डिका वा महाकालीचे रूप हे शक्तिस्वरूप असते. चंद्रघंटा, महागौरीचे रूप हे सौम्य असते. सरस्वतीचे किंवा देवी शारदेचे रूप हे नेहमीच आल्हाददायी, शांत, पवित्र वाटते.
भारतीय संस्कृतीत ज्ञानोपासनेला अत्यंत महत्त्व आहे आणि श्रीसरस्वती ही ज्ञानदात्री, बुद्धिदात्री म्हणून प्रसिद्ध आहे. पूज्य सानेगुरुजींनी म्हटले आहे, ‘भारतीय संस्कृती ही हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी संस्कृती आहे. उदार भावना आणि निर्मळ ज्ञान यांच्या योगाने जीवनाला सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे. विज्ञानाला हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे.’ कर्म-ज्ञान-भक्तीचा महिमा हा शरीर, बुद्धी आणि हृदयाला सतत सेवारत ठेवतो, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

श्रीज्ञानदेवी सरस्वतीची मूर्ती प्रथम कोणी घडविली असेल कोण जाणे! पण तिच्या मूर्तीकडे, चित्रातील प्रतिमेकडे पाहूनही भान हरपते. मन एकाग्र होते. बुद्धीला अनेक प्रकारे चालना मिळते. नवनवीन कल्पनांचे धुमारे फुटतात. ही केवळ चौदा विद्यांची- ज्ञानाचीच नव्हे तर चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता आहे. तिचे मोहक, मनोहर रूप बुद्धीचे नाना कल्पक आविष्कार व्यक्त करते आणि ती सर्ववंद्य ठरते. कार्यारंभी गणेशस्तवन होते, तसेच देवी शारदेचेही स्तवन होते.

हे सरस्वती, नमन तुझ्या पदकमली, तव ठायी वृत्ती रमली
विश्वाची चालक शक्ती, असशी तू प्रेमळ मूर्ती
देवादिक तुजला नमिती, गुण गाता रसना थकली।
चौसष्ट कला विद्येला, शास्त्र गुणी गुंफुनी माला
गणराज अर्पितो तुजला, करी वृष्टी सृष्टी सुफली
विद्येचा छंद जयाला, तो नमील देवी तुजला।
‘अशी प्रार्थना दररोज शाळेत आम्ही म्हणायचो’ असे बरेच जण सांगतात. अतिशय सुबोध, सुंदर अशी ही प्रार्थना!
आपले मूल पहिल्यांदा शाळेत घालताना पाटीवर ‘श्रीगणेशाय नमः’ लिहिले जाई आणि दसऱ्यासारख्या सुमुहूर्तावर पाटीवर आकड्यांची सरस्वती काढली जाई. हे मोरावर बसलेल्या सरस्वतीचे प्रतीक दूरदर्शननेही स्वीकारले आहे. नाना प्रकारच्या विद्या-कला तिथे दाखवल्या जात असल्याने ते अतिशय योग्य वाटते. अनेक कार्यक्रमांतून ज्ञानसंपादनही करता येते. आणि सरस्वतीच्या आराधनेमागे नाना प्रकारच्या विद्या आणि ज्ञान संपादन करण्याचाच हेतू आहे. ‘तेजस्विनावधी तमस्तु’- आमची बुद्धी तेजस्वी (होवो) राहो- हीच त्या प्रार्थनेतून मागणी आहे. म्हणूनच मला वाटते प्रत्येकाच्या बालपणी देवी शारदेचे/सरस्वतीचे वर्णन करणारा प्रसिद्ध संस्कृत श्लोक शिकविला जातो-
या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावर दण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युतशंकरः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा माम्‌‍ पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥
जी सुगंधी कुंदपुष्प, चंद्र आणि तुषारांच्या हाराप्रमाणे शुभ्र आहे; जी शुभ्रवस्त्रधारी आहे; जिच्या हातात वीणा आहे आणि जी वरदमुद्रा धारण केलेली आहे; जी शुभ्रकमलावर बसलेली आहे; ब्रह्मा-विष्णू-महेश हे जिला सदैव वंदन करतात अशी सरस्वती आमचे अज्ञान, जडता दूर करणारी आहे. ती आम्हाला पावो, आमचे रक्षण करो!
अत्यंत सुंदर अशा या श्लोकात सरस्वतीची अंगकांती आणि वस्त्राच्या शुभ्रतेचे वर्णन हे केवळ बाह्य वर्णन झाले; पण त्यात शुभ्र रंगाची निर्मलता, पावित्र्य, शुद्धता हे अनुस्यूत आहे. सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा तिन्ही देवांना ती वंद्य आहे, तिथे सर्वसामान्यांची काय कथा! अज्ञान, बुद्धिहीनता हे माणसाचे ‘जाड्य’ असते. त्याच्यात षड्रिपू कमी-अधिक प्रमाणात वास करीत असतात, त्यामुळेही बुद्धिभ्रष्टता येते. सरस्वतीच्या उपासनेने ज्ञानाच्या प्रकाशात अज्ञानांधकार दूर होतो. ज्ञानप्राप्तीने लाभलेले चैतन्य हे नवनवीन कल्पनांना प्रेरित करते. विश्वाची रहस्ये उलगडतात. फक्त प्रखर ज्ञानच नाही तर ही वीणावादिनी आहे. नाद-संगीत हे माणसाच्या वृत्ती प्रफुल्लित आणि प्रसन्न करतेच, त्याबरोबरच त्या नानाविध कलांचा आस्वाद देता-घेताना त्या समाधानी आणि शांतही होत जातात.

देवीनवरात्र हा संपूर्ण शारदोत्सव असतो. कोजागरीपर्यंत भराला आलेले चांदणे मनाला उल्हसित करते. शारदेच्या चेहऱ्यावर सौम्य शीतल हास्य असते. सरस्वती ही वाग्देवताही आहे. प्रवाही आणि प्रभावी वाणी हे तिचेच रूप आहे. सरस्वतीचे वाहन मोर आहे. अतिशय देखणा असा हा पक्षीराज सौंदर्यदृष्टीची साक्ष आहे. ती श्वेतकमलासना दाखवलेली असते. ते कमळ हे भारतीय फूल सौम्य सुगंधी, अनेक पाकळ्यांचे अत्यंत सुंदर, रसयुक्त, पंचतत्त्वांपैकी जळातून उत्पन्न होणारे, चिखलातून उगवले तरी त्यापासून अलिप्त राहणारे, चांगले तेच घेणारे, दृष्टीसुखद आहे. त्यावर बसलेली शारदा ही अशीच कोमल कलावती आहे. कधी ती हंसारूढाही दाखवलेली असते. हंस जलाशयात राहणारा, नीरक्षीरविवेक असणारा शुभ्र, आकारानेही सुंदर पक्षी. सारासार विवेक आणि शुद्ध सौंदर्यदृष्टी असे हे आसन निवडण्यात आले. श्रीमती शांता शेळके यांनी ‘ज्योत्स्नेपरी कांती तुझी, स्मितरम्य शारदचंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा’ म्हणत असताना तिच्या या रम्य भावरूपाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ललितकलामयी, ज्ञानविभामयी, वीणापुस्तकधारिणी, नादब्रह्ममयी शारदेचे, या देवी सरस्वतीचे, या वागेश्वरीचे स्तवन करीत आपणही ‘जय जय हे भगवति सुरभारती तव चरणौ प्रणमामः’ म्हणत वंदन करू आणि तिचा वरदहस्त प्राप्त करू.