
इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात आघाडीच्या जथ्यात राहिलेल्या चेन्नईन एफसीला गुणतक्त्यात तळाला असलेल्या दिल्ली डायनामोजने २-२ असे बरोबरीत रोखले. नेहरू स्टेडियमवर चेन्नईचा बर्थडे बॉय जेजे लालपेखलुआ याने दोन गोल करीत विजय जवळपास नक्की केला होता, पण अखेरच्या मिनिटाला दिल्लीने बरोबरी साधली.
नायजेरियाचा कालू उचे आणि नेदरलँड्सचा गुयॉन फर्नांडिस (९०वे मिनिट) या बदली खेळाडूंनी जेजेच्या आनंदावर विरजण ओतले. अखेरच्या मिनिटाला जेरॉएन लुमूच्या पासवर कालूने अचूक हेडिंग करीत गुयॉनच्या पायापाशी चेंडू मारला. गुयॉनने मग अलगद चेंडू नेटमध्ये घालविला. या बरोबरीसह चेन्नईने आघाडी घेतली. नऊ सामन्यांतून पाच विजय, दोन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १७ गुण झाले आहेत. त्यांनी एफसी पुणे सिटीला मागे टाकले. पुण्याचे १६ गुण आहेत. दिल्लीचे चार गुण झाले. त्यांचे तळातील स्थान कायम राहिले असले तरी सहा पराभवांची मालिका अखेर खंडित करणे दिल्लीसाठी जमेची बाजू ठरले. पूर्वार्धातील बरोबरीनंतर चेन्नईने उत्तरार्धात आघाडी घेतली. ५१व्या मिनिटाला डावीकडून ग्रेगरी नेल्सनने चाल रचली. त्याने जर्मनप्रीत सिंगला पास दिला. जर्मनप्रीतने जेजेसाठी संधी निर्माण केली. जेजेने (५१वे मिनिट) मग तोल सांभाळत वळून चेंडू मारत अफलातून गोल केला.
पूर्वार्धात जोरदार चुरशीच्या खेळाने रंग भरले. दिल्लीने खाते उघडत यजमान संघाला चकित केले. लालीयनझुला छांगटे याने चाल रचत नंदकुमार शेखरला पास दिला. शेखरने नेटसमोरच असलेल्या डेव्हिड एन्गाटेला हवेतून अचूक पास दिला. एन्गाटेने (२४वे मिनिट) हवेत झेप घेत अफलातून हेडिंंग करीत चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंगला चकविले. दिल्लीने मोसमात प्रथमच पूर्वार्धात गोल केला. तीन मिनिटे बाकी असताना जेजेने चेन्नईला बरोबरी साधून दिली. फ्री-किकवर करणजीत सिंगने मध्य रेषेच्या थोडे पुढून त्याच्या दिशेने चेंडू मारला. जेजेने (४२वे मिनिट) त्यावर अफलातून हेडिंग करीत दिल्लीचा गोलरक्षक झेबीयर इरुतागुएना याला लिलया चकविले. पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात चेन्नईने दिल्लीचे जोरदार आक्रमण परतावून लावले. आधी नंदकुमारने बॉक्समध्ये रोमिओ फर्नांडिसला पास दिला. त्याची अप्रतिम व्हॉली करणजीतने थोपवली. रिबाऊंडवर छांगटेने प्रयत्न केला, पण धनचंद्र सिंगने मैदानावर घसरत पायाने चेंडू ब्लॉक केला.
