तर क्रिकेट होणार कंटाळवाणे

0
133

>> थुंकीचा वापर न करण्यावर मिचेल स्टार्कचे वक्तव्य

थुंकी किंवा लाळेचा वापर चेंडूला लकाकी आणण्यासाठी करण्यावर घातलेल्या बंदीमुळे क्रिकेट ‘कंटाळवाणे’ होईल, अशी भिती ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याने काल मंगळवारी व्यक्त केली.

या बंदीमुळे युवा खेळाडू वेगवान गोलंदाज होण्यास धजावणार नाहीत, असे स्टार्कला वाटते. बंदीमुळे क्रिकेट या खेळाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. चेंडूद्वारे स्विंग प्राप्त करण्यासाठी थुंकीचा वापर फायदेशीर ठरत होता. परंतु, आता या ‘थुंकी’ला पर्याय देणे गरजेेचे आहे, असे स्टार्कचे मत आहे. मागील काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियातील खेळपट्‌ट्या फलंदाजांसाठी अनुकूल बनत चालल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. खेळपट्‌ट्या साथ देत नसतील व थुंकीबरही बंदी असेल तर वेगवान गोलंदाजांचे तग धरणे कठीण होईल. केवळ काही कालावधीसाठी ‘थुंकी’वर बंदी असेल तर या काळात गोलंदाजांना दुसरा सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे, असे स्टार्क म्हणाला.

भारताविरुद्ध मायदेशात गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास उत्सुक असल्याचे स्टार्क याने सांगितले. २०१८-१९ साली भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिका विजय संपादन केला होता. त्यावेळी मात्र भारताने दिवस-रात्र कसोटी खेळण्यास नकार दिला होता. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यत सात दिवस-रात्र कसोटी सामने खेळले असून भारताने बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव डे-नाईट कसोटी सामना खेळला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत मोसम सुरु होऊ शकतो. परंतु, याच कालावधीत आयपीएल स्पर्धा ठरल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना परवानगी द्यावी, असे स्टार्कला वाटते. स्टार्कने यापूर्वी आयपीएलच्या तेराव्या मोसमातून अंग काढून घेतले होते. परंतु, आता त्याने आपल्या निर्णयावर पूनर्विचार शक्य असल्याचे सांगितले आहे.