तरुण तेजपाल यांना 10 वर्षे सश्रम कारावास

0
14

>> महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरण; 10 लाखांचा दंडही ठोठावला

>> गोवा खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल; शरण येण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत

‘तहलका’ मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना 2013 मधील महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दोषी ठरवले. त्यांना 10 वर्षे सश्रम कारावास आणि 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तरुण तेजपाल यांना न्यायालयात शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात गोवा खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिले जाणार आहे, असे तरुण तेजपाल यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारने दाखल केलेली आव्हान याचिका मंजूर केली असून, म्हापसा येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाचा मे 2021 मध्ये तरुण तेजपाल यांची निर्दोष सुटका करण्याचा आदेश रद्द केला.

राज्य सरकारने एप्रिल 2022 मध्ये गोवा खंडपीठात पत्रकार तरुण तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी 30 जुलै 2026 रोजी पूर्ण करून निवाडा राखून ठेवला होता. या प्रकरणात सरकारची बाजू देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. तेजपाल यांची बाजू ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी मांडली. गोवा खंडपीठाने या आव्हान याचिकेवरील निवाडा काल जाहीर केला. त्यावेळी तरुण तेजपाल न्यायालयात हजर होते.
नेमके प्रकरण काय?
7 नोव्हेंबर 2013 मध्ये बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये तहलका मासिकातर्फे आयोजित ‘थिंक फेस्ट’ कार्यक्रमाच्या दरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपाल यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सहकारी महिला पत्रकाराने केला होता. या आरोपानंतर देशात मोठी खळबळ उडाली होती.

गोवा पोलिसांकडून स्वेच्छा दखल
गोवा पोलिसांनी या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन 22 नोव्हेंबर 2013 रोजी तरुण तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 30 नोव्हेंबर 2013 रोजी सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

पोलीस निरीक्षकाला दिली धमकी
यानंतर 28 जानेवारी 2014 मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनिता सावंत यांनी धमकी प्रकरणात तरुण तेजपाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 31 जानेवारीला गुन्हा अन्वेषण विभागाने तरुण तेजपाल यांच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला होता.

2014 मध्ये आरोपपत्र दाखल
फेब्रुवारी 2014 मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

2021 मध्ये निर्दोष ठरवले
यानंतर 21 मे 2021 रोजी सुनावणीअंती अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात निवाडा जाहीर केला. त्यात तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने पुराव्यांचा अभाव आणि पीडितेच्या वर्तनावर शंका उपस्थित करून तेजपाल यांची निर्दोष सुटका केली होती.

सर्वोच्च न्यायालयातही
भक्कम बाजू मांडू : पांगम

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल यांना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. तथापि, न्यायालयाने त्यांना कमीच शिक्षा ठोठावली आहे. तेजपाल यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तर तेथेही सरकारकडून भक्कम बाजू मांडून पीडितेला न्याय मिळवून दिला जाणार आहे. तेजपाल यांनी दंड भरल्यानंतर सदर रक्कम पीडितेला देण्याची सूचना करण्यात आली आहे, असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून निकालाचे स्वागत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या तरुण तेजपाल यांना दोषी ठरविणाऱ्या आदेशाचे स्वागत केले आहे. राज्य सरकार महिलांचे हक्क आणि न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. या निवाड्यामुळे पीडितेला न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

विविध कलमान्वये ठरवले दोषी
सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गोवा खंडपीठाने तरुण तेजपाल यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(एफ) अन्वये दहा वर्षांच्या सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
कलम 376(2)(के) अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंड आणि कलम 354 अन्वये 1 वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंड होणार आहे.
कलम 354 ए अन्वये 1 वर्ष कारावास, कलम 354 बी अन्वये 3 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंड, कलम 341 अन्वये 500 रुपये दंड आणि कलम 342 खाली 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
दंड न भरल्यास आणखी काही काळ साधा कारावास भोगावा लागेल. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत, असे निवाड्यात म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार : तेजपाल
गोवा खंडपीठाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे, असे तरुण तेजपाल यांनी या निवाड्यानंतर काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. तहलका या मासिकातील शोधपत्रकारितेमुळे राजकीय सूडबुद्धीने आपणाला लक्ष केले जात आहे. या प्रकरणात आपली यापूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती. आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून आपणाला वरिष्ठ न्यायालयात निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास तेजपाल यांनी व्यक्त केला.

गोवा खंडपीठाने आदेशात काय म्हटले?
पीडितेने सत्य कथन केले आहे आणि फिर्यादी पक्षाने प्रतिवादीविरुद्धचा खटला कोणत्याही वाजवी शंकेपलीकडे सिद्ध केला आहे. प्रतिवादीला त्यांच्यावरील आरोपांतून निर्दोष मुक्त करून कनिष्ठ न्यायालयाने चूक केली. कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यांचे केलेले मूल्यमापन केवळ अतार्किकच नव्हे, तर गैरस्वरूपाचे आहे. कनिष्ठ न्यायालयाने काढलेले निष्कर्ष टिकण्याजोगे नाहीत आणि प्रकरणातील स्थापित तथ्ये व परिस्थिती पाहता, कनिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेला दृष्टिकोन हा ग्राह्य धरण्याजोगा नाही, असे गोवा खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.