सहकारी महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका काल सुनावणीला घेण्यात आली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. आता, या आव्हान याचिकेवर दि. 5 नोव्हेंबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
2013 मधील सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘तहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना गोवा खंडपीठाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सध्या ते कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
तेजपाल यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, राज्य सरकारने तेजपाल यांच्या 10 वर्षांच्या शिक्षेत वाढ करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात तेजपाल यांची याचिका काल सुनावणीला आली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. दुसऱ्या बाजूला तेजपाल यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी त्यांना दिवाळीसाठी घरी जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. मात्र, मेहता यांनी या विनंतीला विरोध दर्शवला.

