तरुण तेजपाल यांचीसर्वोच्च न्यायालयात धाव

0
15

गोवा खंडपीठाच्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरवून 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशाला ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, शिक्षेचा आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे.

गेल्या 6 ऑगस्ट 2026 रोजी सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल यांना गोवा खंडपीठाने दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तरुण तेजपाल यांना शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या निकालानंतर तेजपाल यांनी गोवा खंडपीठाच्या शिक्षेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2013 मध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती. तेजपाल यांनी सहकारी महिला पत्रकारावर हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.

या प्रकरणात सप्टेंबर 2017 मध्ये म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने मे 2021 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. राज्य सरकारने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. गोवा खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल करून तरुण तेजपाल यांना शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने तरुण तेजपाल यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कमी आहे. या शिक्षेत आणखी वाढ करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.