तरुणावस्थेतील संस्कार

0
6

जीवन संस्कार- 8

  • प्रा. रमेश सप्रे

आजच्या चित्रविचित्र, आणीबाणी किंवा समरप्रसंगासारख्या परिस्थितीत तर अनेक प्रश्नांवर, समस्यांवर, व्याधिव्यथांवर रामबाण उपाय म्हणजे हा सहत्वाचा संस्कार जो खासकरून तारुण्यकालासाठी- तरुणांसाठी- तरुणाईसाठी अत्यावश्यक आहे.

तरुण कुणाला म्हणायचं? याविषयी एक अर्थपूर्ण विचार आहे.

कोणत्याही कठीण, आणीबाणीच्या परिस्थितीतून स्वतःला तरून इतरांना तारून नेतो तो तरुण!
आपल्या संस्कृतीत तरुणावस्थेच्या संदर्भात ‘इतरांना तारून नेणं’ हे अधिक महत्त्वाचं आहे. किंबहुना हा संस्कारच तारुण्यावस्थेचं प्रतीक आहे. पण काळाच्या ओघात यात कमालीचा बदल झालाय. अजूनही होतोय. अर्थात वाईट अर्थाने. स्वतःच्या जिवावर उदार होऊन प्रसंगी आत्मबलिदान करणारे तरुण आता जणू कालबाह्य झाले आहेत.

आगीनं चहुबाजूनं वेढलेल्या घरात अडकलेल्या असहाय व्यक्तींना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या वीर बापू गायधनीची सत्यकथा पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात होती. त्याच पुस्तकात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हौतात्म्य (मृत्यू) पत्करणाऱ्या बाबू गेनूची तसेच नंदुरबारच्या शिरिषकुमारचीही गोष्ट होती.
ही नावं आता ऐतिहासिक वाटू लागलीयत म्हणजे वर्तमानकाळाशी त्यांचा काहीही संबंध नाही. आताच्या पिढीची जणू मूल्यव्यवस्था (व्हॅल्यू सिस्टम्‌‍) बदलून गेलीय. काळाचा महिमा! दुसरं काय?
वीर बापू गायधनीनं आगीनं आपल्या ज्वालांनी जवळजवळ गिळलेल्या घरात घुसून वरच्या मजल्यावर अडकलेल्या दोन मुलांना गादीत गुंडाळून खाली फेकलं नि लोकांना ती गादी अलगद झेलण्याची फुकार दिली. त्यांचा जीव वाचवला खरा पण स्वतःचा? धाडसाने त्या जळत्या घरातून तो बाहेर पडला तेव्हा बराच भाजला होता. लोक त्याला रुग्णालयात नेत असताना आगीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी एक गाय बापूला दिसली. तशाही अवस्थेत तो धावत गेला. गायीच्या गळ्यातली दोरी सुटतही नव्हती नि तुटतही नव्हती. शेवटी बापूनं सारा जीवप्राण एकत्र करून जोरात ती खेचल्यावर खुंट्यासकट निघाली. मुक्त झालेली गोमाता वेगात पळून गेली, पण हा शूरवीर गायधनी मात्र मृत्युमुखी पडला. पण मेला नाही, अमर झाला. त्याचा पुतळा नाशिकमध्ये आहे. हा खरा आदर्श तरुण!
याच संदर्भात एका साप्ताहिकात आलेलं हे अभ्यासपूर्वक निरीक्षण पाहूया-
गजबजलेल्या रस्त्यावरचं एक धोकादायक वळण. अनेकदा तिथं छोटे-मोठे अपघात घडायचे. वाहनांना आतूनच आग लागायची. ती लगेचच पेटायची. अशाच बसला झालेल्या निरनिराळ्या काळातील अपघातांविषयीचा तो अभ्यास होता. अपघाताला जबाबदार असलेल्या रस्त्याची स्थिती, बसची अवस्था, चालकाची देहस्थिती (म्हणजे मद्यपान करून झालेली) इ. अपघात-घटकांवर चर्चा झाल्यावर अपघातानंतरचे एक निरीक्षण चिंतनीय होते. विशेष म्हणजे ते आपल्या विषयाशी सुसंगत होते.
गोष्ट आहे तीन बस अपघातांची. वीस वर्षांपूर्वी- दहा वर्षांपूर्वी- नि अलीकडे झालेल्या अपघातांची. निरीक्षण आहे आपात्कालीन (अपघातावेळच्या) वर्तनाबद्दलचे.

  • वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताच्या वेळी आतल्या तरुणांनी स्वतःला वाचवण्यापूर्वी बसमधील वृद्ध, महिला, मुलं यांना वाचवलं. यात दोन तरुण थोडेसे भाजले, एक जरा अत्यवस्थ झाला पण उपचारानंतर बरा झाला.
  • दहा वर्षांपूर्वी अशाच झालेल्या अपघातात तरुणांनी स्वतःला वाचवल्यानंतर बसमधील इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदत केली.
  • अलीकडच्या अपघातात तरुणांनी आधी स्वतःला वाचवलं. तसं करताना वृद्ध-महिला-मुलांना प्रसंगी मागेही रेटलं. स्वतःला वाचवल्यावर इतरांना मदत न करता सेल्फीबिल्फीत गुंगून गेले.

एकूण संस्कारांची अधोगतीच झालेली दिसत नाही का? असो.
एका तरुणांसाठी कार्य करणाऱ्या चिरतरुण नेत्याने तरुणांच्या कार्याविषयी काढलेले उत्स्फूर्त उद्गार लक्षणीय आहेत-
‘तरुण तो, जो वादळावर स्वार होऊन, आकाशातील विजेचा चाबूक हातात घेऊन- दशदिशांतून येणाऱ्या सर्व संकटांचे आव्हान स्वीकारून- सतत संघर्षमय जीवन जगून- समाजाचे, निसर्गाचे, मानवतेचे रक्षण करत असतो.’
अशा सर्व परिस्थितीचा विचार करता तरुणाईवर अनेक संस्कार करणे आवश्यक आहे. हे संस्कार काया-वाचा-मनावर म्हणजेच आचार-उच्चार-विचारावर घडवायला हवेत. तसेच त्यांनी स्वतःवर असे सुसंस्कार घडवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली पाहिजे.
काही महत्त्वाचे संस्कार असे-
राष्ट्र, कुटुंब, समाजसंस्था यांच्या कल्याणासाठी घडवायच्या महत्त्वाच्या संस्कारांत प्रमुख आहे तो ‘सह’त्वाचा संस्कार. ‘सह’ म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन व्यक्त करावयाचे, अनुभवायचे संस्कार. उदा. सहकार्य, सहयोग, सहजीवन, सहानुभूती असे अनेक ‘सह’त्वाचे संस्कार आपलं जीवन धन्य बनवतात. गमतीनं म्हणायचं तर ‘सहल’ या शब्दात हाच ‘सह’ अनुभव दडलेला आहे.
ऋग्वेदातील संज्ञानसूक्तातसुद्धा- ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्‌‍।’ हा मंत्रही ‘सह’त्वाचाच संदेश देतो.
आणि आपला लोकप्रिय शांतिपाठ-
ॐ सहाना ववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
हे मंत्र अनादिकालापासून सुसंस्कारांचा पुंज उद्घोषित करत आहेत.
आजच्या चित्रविचित्र, आणीबाणी किंवा समरप्रसंगासारख्या (क्रायसिस) परिस्थितीत तर अनेक प्रश्नांवर, समस्यांवर, व्याधिव्यथांवर रामबाण उपाय (पॅनासिया) म्हणजे हा सहत्वाचा संस्कार जो खासकरून तारुण्यकालासाठी- तरुणांसाठी- तरुणाईसाठी अत्यावश्यक आहे.
यासंदर्भात अलीकडील काळातील एक प्रसंगानुभव सांगण्यासारखा आहे. आफ्रिकेतील अनेक छोटेमोठे देश भूक- उपासमार- कुपोषण अशा अन्नविषयक समस्यांशी कितीतरी वर्षे झगडत आहेत. अशाच एका देशातील हातापायांच्या काड्या, पोटाचा नगारा, छातीचा अस्थिपंजर, डोळ्यांत अत्यंत अगतिक भाव नि कोणत्याही क्षणी मृत्यू येईल अशा अवस्थेतील मुलाचे छायाचित्र समाज-माध्यमातून खूप व्हायरल झाले होते. या छायाचित्राखाली विशेष म्हणजे या मुलामागे एक गिधाड (साक्षात मृत्यू) बसलेलं होतं. ते ज्यानं छायाचित्रात बंदिस्त केलं त्या छायाचित्रकाराने वारंवार ते दृश्य डोळ्यांसमोर आल्यामुळे डोक्यावर परिणाम होऊन आत्महत्या केली असं म्हणतात. अर्थातच मदतीचं आवाहन होतं- आर्त, मूक प्रार्थना जाणवत होती त्या चित्राच्या भयाण-भकास वास्तवातून. अनेक देश, श्रीमंत- उदार व्यक्ती, समाजसेवी संस्था सहाय्यासाठी पुढे सरसावल्या.

त्यात होती एक संस्था सर्व प्रकारच्या वाहनांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेली स्वीडनमधील ‘व्हॉल्वो.’ त्या संस्थेच्या प्रमुखाच्या मनात एक विचार आला. तो त्यानं सर्व कामगारांना व अधिकाऱ्यांना सांगितला. सर्वांना तो पटला. विचार असा- ‘अशा प्रकारच्या मानवतावादी कार्यासाठी आपण नेहमी आर्थिक किंवा वस्तूंची मदत करतो. आपण स्वतः काही वस्तू बनवून, त्या विकून ते पैसे कर्तव्यभावनेनं पाठवले पाहिजेत. दान म्हणून नव्हे.’ वस्तू बनवण्यासाठी अनेक कल्पना पुढे आल्या. सर्वानुमते एक कल्पना राबवायचं ठरलं. मेणबत्त्या (कँडल्स) बनवण्याचं. सर्व कामगारांनी एकत्र येणं, त्यांचे गट बनवणं, त्यांच्याकडे कामं वाटून देणं, काही काळानंतर कामांची आलटापालट करणं… सगळं कसं अगदी सहज, बिनबोभाटपणे पार पडलं. सर्वांसाठी फलाहार, अल्पोपहार यांचे मेन्यू बदलत गेले. धम्माल यायला लागली. काही कारणानं सकाळी गैरहजर असलेले कामगार संध्याकाळच्या मेणबत्त्या बनवण्याच्या कार्यक्रमाला मात्र हजर राहू लागले. सर्व कर्मचाऱ्यांतील असलेले द्वेष-मत्सर, हेवे-दावे, अनावश्यक स्पर्धेची भावना सारं वितळून गेलं… मेणवातीच्या मेणासारखं!
मुख्य म्हणजे कळत-नकळत या खेळीमेळीच्या वातावरणातून सुधारलेल्या भावबंधांचा प्रभाव कंपनीच्या उत्पादकक्षमतेवर, उत्पादनावर पडला.
विशेष म्हणजे त्या देशातील उपासमार, कुपोषण या समस्या कमी झाल्या. फार मदतीची गरज उरली नाही. तरीही मेणबत्ती उत्पादन सुरूच राहिलं. जणू व्हॉल्वो कंपनीचा तोच मुख्य व्यापार-व्यवसाय बनला. असो.
‘सह’त्वाच्या संस्काराचा महानायक किंवा महासंस्कारक जर कोण असेल तर तो गोपालकृष्णच! नित्याचं काम, खेळ, छंद या सर्वातून एकत्रित येऊन (सह) काम करण्याचा जीवनसंस्कार घडवावा तर कृष्णानंच! हेच कार्य आता घर-शाळा-मंदिर अशा समाजसंस्थांनी करायला नको का?